Uddhav Thackeray: ऑनलाइन संवादानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’ला ‘जय महाराष्ट्र’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 08:16 AM2022-06-23T08:16:16+5:302022-06-23T08:17:26+5:30
Uddhav thackeray: बाहेर राहून बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगा की तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको आहात, मी मुख्यमंत्रिपद सोडून देईन. माझ्याऐवजी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला मान्य आहे, अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना घातली आहे.
मुंबई : बाहेर राहून बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगा की तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको आहात, मी मुख्यमंत्रिपद सोडून देईन. माझ्याऐवजी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला मान्य आहे, अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना घातली आहे. तसेच शिवसेना नेत्यांनी, माझ्या शिवसैनिकांनी मी लायक नसल्याचे सांगितले तर शिवसेनेचे पक्षप्रमुखपदही सोडेन, असे ठाकरे यांनी जाहीर केले. दरम्यान, रात्री उशिरा ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या वर्षा या बंगल्याचा त्याग केला.
एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे यांनी सायंकाळी जनतेशी ऑनलाइन संवाद साधला. ‘‘आमदार म्हणाले की तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री म्हणून नको आहात तर मी पद सोडेन, वाटल्यास मी आताच माझा मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतो. मी राजीनाम्याचे पत्र तयार ठेवत आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल? परत लढू. जोपर्यंत सोबत शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असे जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल, की मी शिवसेनेचे पक्षप्रमुखपद सांभाळायला नालायक आहे, तर मी पक्षप्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवे. मी मुख्यमंत्रिपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
माझ्याच माणसांना मी नकोसा असेन तर काय करणार?
मुख्यमंत्री तुम्हालाच व्हावे लागेल, तरच हे सरकार नीट चालेल, असे शरद पवारांनी मला सांगितले. मी तयार नव्हतो. मात्र पवारांनी विश्वास दाखवला. काँग्रेस अध्यक्षांनीही विश्वास दाखवला. आजही ते पाठीशी ठामपणे उभे आहेत. पण माझ्याच माणसांना मी नको असेन तर काय बोलणार? त्यामुळे मी मुख्यमंत्रिपद सोडायला तयार आहे. फक्त त्यांनी प्रत्यक्ष येऊन मला हे सांगावे, असे ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांनंतरची शिवसेना तेव्हाही होती, आताही आहे
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना राहिली नाही, अशी टीका होते. पण बाळासाहेबांच्या काळातील व आताच्या शिवसेनेत काय फरक आहे, हे सांगावे. बाळासाहेब गेल्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या. त्यानंतर अनेकजण मंत्री झाले. आता अनेकजण बाळासाहेबांची शिवसेना हवी असे म्हणत आहेत. पण मधल्या काळात तुम्हाला मिळालेली मंत्रिपदे बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेमुळे मिळाली, हे ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले.
सहानुभूती मिळणार?
आजच्या भाषणातून भावनिक साद घालत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर गुगली टाकल्याचे मानले जाते. आपल्याकडील मुख्यमंत्रिपद गेले तर एकनाथ शिंदे हे भाजपशी हातमिळवणी करून शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळवून देऊ शकणार आहेत का, असा प्रश्न एकप्रकारे उपस्थित करून त्यांनी शिवसैनिकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला.