Join us  

Uddhav Thackeray: 'मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी, जनता याचा बदला घेईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:39 AM

आपल्याच पक्षातील निष्ठावंत नेत्यांनी साथ सोडल्यामुळे राजीनामा देण्याची वेळ आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा शेवट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने झाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेनं इतिहासातील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाचा सामना केला. संयमी नेतृत्व म्हणून गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं गेलं. बुधवारी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्याच्या भाषणानंतर सोशल मीडियावरुन भावूक पोस्ट फिरू लागल्या. अनेकांनी त्यांच्या भाषणानंतर भाजप नेत्यांवर आणि शिंदे गटावर टिका केली. शिवसेना नेत्यांनाही याचं दु:ख झालं. त्यामुळेच, जनता याचा बदला घेईल, अशा शब्दात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

आपल्याच पक्षातील निष्ठावंत नेत्यांनी साथ सोडल्यामुळे राजीनामा देण्याची वेळ आल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले. अजिबात चीडचीड न करता अत्यंत संयमी असं उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण होतं, अशा प्रतक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत. शिवसेना नेत्यांकडूनही या भाषणानंतर संयमी आणि भावनिक प्रतिक्रिया येत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही भाषणावर प्रतिक्रिया देताना हे भाषण आमच्यासाठी भावनिक आणि डोळ्यात अश्रू आणणारं होतं, असे म्हटले. त्यानंतर, आता भास्कर जाधव यांनीही या भाषणावर मत मांडलं आहे.  

सत्ता हे माझं सर्वस्व नाही, सत्ता हे जनसेवेचं साधन आहे. त्या परिस्थितीत मला जो निर्णय घ्यावा लागला हे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताना जी भावना व्यक्त करुन दाखवली, ती पाहून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. तेच पाणी मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, त्याच भाजपकडून आनंद साजरा केला जात आहे. एकमेकांना पेढे भरवून जल्लोष होत आहे. निश्चितपणे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता याचा बदला घेईल, असेही जाधव यांनी म्हटले. 

राजीनामा दिल्यानंतर निरोपाचं भाषण कसं असावं

उद्धव ठाकरेंनी भाषणात दाखवलेल्या संयमी आणि शांतपणाचं सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसंच आपल्या पक्षप्रमुखावर नामुष्की ओढावल्यामुळे आक्रमक शिवसैनिकांची समजूत काढणं आणि रस्त्यावर न उतरण्याचं आवाहन करणं याबद्दलही उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचं सोशल मीडियात स्वागत केलं जात आहे. काहींनी तर आपल्या विरोधात परिस्थिती असल्यामुळे राजीनामा देण्याची वेळ आल्यावर देखील निरोपाचं भाषण कसं असावं याचं उद्धव ठाकरेंच कालचं संबोधन उत्तम उदाहरण असल्याचंही म्हटलं आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुंबईभास्कर जाधव