Join us

2019 च्या निकालांतही ‘कर्नाटकी कशिद्या’ची छाप दिसेल काय? - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 8:53 AM

देशातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपा पराभव झाल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सामना संपादकीयमधून चांगलाच निशाणा साधला आहे.

मुंबई - देशातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपा पराभव झाल्याचं वारंवार पाहायला मिळत आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सामना संपादकीयमधून चांगलाच निशाणा साधला आहे. ''2014च्या निवडणुकीत 282 जागा जिंकून भाजपने सर्वांनाच चकित केले होते. मात्र, पोटनिवडणुकांतील सततच्या अपयशामुळे भाजपचे लोकसभेतील संख्याबळ आता 10 जागांनी घटून 272 वर येऊन पोहोचले आहे. कर्नाटकातील पोटनिवडणुकांचे निकाल ही तर भाजपसाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. कर्नाटकातील सुबक कशिदाकारीची कला जगप्रसिद्ध आहे. साड्यांसह विविध वस्त्रांवर होणाऱ्या कशिद्याच्या कामाने लावणीसारख्या लोककलेलाही वेड लावले. तोच कर्नाटकी कशिदा आता राजकीय पटलावरही अवतरला आहे. 2019 च्या निकालांवर पोटनिवडणुकांतील याच ‘कर्नाटकी कशिद्या’ची छाप दिसेल काय?'', अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे :- पोटनिवडणुकांच्या निकालांतील भाजपच्या पराभवाची मालिका मागच्या पानावरून पुढच्या पानावर सुरूच आहे. मागे उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांच्या पोटनिवडणुकांत जे घडले, तेच आता कर्नाटकातही घडले आहे. 5 जागांपैकी केवळ एकच जागा भाजपने कशीबशी जिंकली. -  मतविभाजन हाच भाजपच्या विजयाचा मूळ आधार आहे आणि तेच होऊ द्यायचे नाही, याची पक्की खूणगाठ आता भाजपविरोधी पक्षांनी बांधलेली दिसते. त्यामुळेच उत्तर प्रदेशात जसे सपा आणि बसपाने एकत्र येऊन पोटनिवडणुकांत भाजपला अस्मान दाखवले, तोच प्रयोग आता कर्नाटकातही काँग्रेस आणि जेडीएसने यशस्वी करून दाखवला आहे. - 2019 च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना कर्नाटकात जो सपाटून मार खावा लागला, तो भाजपसाठी तर धक्कादायक आहेच, पण त्याहीपेक्षा काँग्रेसच्या निप्राण देहात प्राण फुंकणारा हा निकाल आहे. - भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बेल्लारी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार व्ही.एस. उगरप्पा 2 लाख 43 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. बेल्लारी म्हणजे कर्नाटक भाजपचे नाक मानले जाते. गेली 14 वर्षे ही जागा भाजपच्या ताब्यात होती. मात्र, हे नाकच आज भाजपकडे राहिले नाही. - सातत्याने होणाऱ्या पोटनिवडणुकांतील दारुण पराभवाचे विश्लेषण, मंथन आणि चिंतन पराभूत पक्ष त्यांच्या परीने करीलच; मात्र देशात इतक्या सगळय़ा चांगल्या गोष्टी होत असण्याचा आणि क्रांतिकारक वगैरे बदल घडत असल्याचा सत्तारूढ पक्षाचा दावा असताना त्यांचा असा पराभव का व्हावा, हे कोडे नाही म्हटले तरी जनतेला पडले आहे. - चार वर्षांपूर्वी उसळलेल्या लाटेचे अचानक हे काय झाले? तोडफोड आणि जोड-तोड पितळयात विशेष प्रावीण्य असणारे पांडित्य आता काम का करत नाही, असे प्रश्न सरकार पक्षाच्या समर्थकांनाही पडले असणारच. 2014 साली मिळालेला जनाधार आता किमान 50 वर्षे तरी सरकणार नाही, अशी छातीठोक खात्री देणाऱ्यांनाही चार वर्षांतच घसरणीला लागलेल्या जनाधाराने चिंतेत टाकले आहे. - देशातील सर्वसामान्य जनता ‘अच्छे दिन’च्या शोधात असली, तरी पोटनिवडणुकांच्या निकालांतून मात्र काँग्रेसचेच ‘अच्छे दिन’ परतून येत असल्याचे सूचक चिन्ह डोकावताना दिसते आहे. - राममंदिर, जम्मू-कश्मिरातील 370 कलम रद्द करणे आणि समान नागरी कायदा या मूळ विषयांना बगल देऊन भलताच अजेंडा राबविल्याचा देखील हा परिणाम असू शकतो.  

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीभाजपा