शिवसेनेने लोकसभा, विधानसभेचे स्वबळी रणशिंग फुंकले तर इतकी भिरभिरी यायचे कारण काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 07:45 AM2018-01-24T07:45:37+5:302018-01-24T08:23:21+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray Comments on bjp | शिवसेनेने लोकसभा, विधानसभेचे स्वबळी रणशिंग फुंकले तर इतकी भिरभिरी यायचे कारण काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

शिवसेनेने लोकसभा, विधानसभेचे स्वबळी रणशिंग फुंकले तर इतकी भिरभिरी यायचे कारण काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे. राज्य आणि केंद्रातील सत्तेतून बाहेर पडण्याचा सातत्याने इशारा देणा-या शिवसेनेने तूर्त सत्तेत राहण्यास पसंती दिली आहे. मात्र, 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव मंगळवारी (23 जानेवारी) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला. ''भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही २०१९ साठी लोकसभेच्या ३८० जागा जिंकण्याचा अश्वमेधी घोडा फिरवायला सुरुवात केलीच आहे. म्हणजे पाचशे-साडेपाचशे जागा देशभरात घुसळतील तेव्हाच ‘३८०’ ग्रॅम विजयाचे लोणी तागडीत पडेल ना! मग त्यांच्याबरोबर जे ‘एनडीए’ म्हणून घटक पक्ष आहेत त्यांना टांग मारूनच ३८० चा ‘गनिमी कावा’ खेळला जात असेल तर शिवसेनेने लोकसभा, विधानसभेचे स्वबळी रणशिंग फुंकले तर इतकी भिरभिरी यायचे कारण काय? महाराष्ट्रासह देशभरातच शिवसेनेचे वादळ घोंघावत आहे. आता जगायचे व लढायचे ते स्वाभिमानासाठीच'', असा टोला उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला हाणला आहे. 


- काय आहे आजचे सामना संपादकीय?
सध्या देशभरात ‘संविधान’ म्हणजे घटनेच्या रक्षणार्थ मोर्चे निघत आहेत. आंदोलनाचे नगारे झडत आहेत. त्याच संविधानानुसार शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकरिणी मंगळवारी पार पडली आहे. निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या मानगुटीवर ही आचारसंहितारूपी घटना मारल्यापासून शिवसेनेसही हे उपचार पार पाडावे लागत आहेत. नाही तर एक नेता, एक विचार व एकमेव शुद्ध भगवा ध्वज याच भूमिकेतून शिवसेना स्वाभिमानाच्या मार्गाने पुढे जात राहिली. न थकता, न डगमगता शिवसेना एका हिमतीने राष्ट्रकार्य करीत राहिली. राजकीय चढ-उताराचा काळ शिवसेनेच्या वाट्याला आलाच नाही असे नाही. पण वैयक्तिक, राजकीय स्वार्थापेक्षा शिवसेनेने महाराष्ट्राचे व हिंदुत्वाचे हित महत्त्वाचे मानले. म्हणून अनेक आमिषांना ठोकरून व संकटांना पायदळी तुडवून शिवसेनाप्रमुखांची ही अभेद्य संघटना आम्ही पुढे घेऊन निघालो आहोत. मंगळवारच्या कार्यकारिणीत अनेक विषयांवर ठराव मांडले. त्यावर चर्चाही झाल्या. अगदी शेतमजुरापासून महिलांपर्यंत आणि हिंदुत्वापासून शत प्रतिशत शिवसेनेचे राज्य आणण्याच्या रणनीतीपर्यंत. 

भारतीय जनता पक्षाने ‘शत प्रतिशत’चा नारा याआधीच दिला आहे. अगदी प्रमोद महाजन यांनी ही गर्जना केली तेव्हा त्यांना हा प्रश्न का विचारला गेला नाही की, ‘काय हो प्रमोदजी, आपली तर शिवसेनेबरोबर युती आणि मैत्री आहे. महाराष्ट्रात व देशातील सत्तेत तुम्ही ‘साथ साथ’ आहात. तरीही शिवसेनेस टांग मारून शत प्रतिशतचा नारा देणे हा काय प्रकार?’ पण हे असले दळभद्री प्रश्न शिवसेनेच्याच वाट्यास येत राहिले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही २०१९ साठी लोकसभेच्या ३८० जागा जिंकण्याचा अश्वमेधी घोडा फिरवायला सुरुवात केलीच आहे. म्हणजे पाचशे-साडेपाचशे जागा देशभरात घुसळतील तेव्हाच ‘३८०’ ग्रॅम विजयाचे लोणी तागडीत पडेल ना! मग त्यांच्याबरोबर जे ‘एनडीए’ म्हणून घटक पक्ष आहेत त्यांना टांग मारूनच ३८० चा ‘गनिमी कावा’ खेळला जात असेल तर शिवसेनेने लोकसभा, विधानसभेचे स्वबळी रणशिंग फुंकले तर इतकी भिरभिरी यायचे कारण काय? महाराष्ट्रासह देशभरातच शिवसेनेचे वादळ घोंघावत आहे. आता जगायचे व लढायचे ते स्वाभिमानासाठीच. महाराष्ट्राचे खायचे व कानडी मुलखात जन्मास येण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांची अवलाद शिवसेनेची नाही. शिवसेना ही सामाजिक मोक्षासाठी स्थापन झालेली संघटना आहे. 

राष्ट्राचे, महाराष्ट्राचे कल्याण हाच शिवसेनेचा उद्देश आहे. त्यामुळे आम्हाला राजकीय नफ्या-तोट्यांची चिंता कधीच वाटली नाही. आपल्या कार्याची दिंडी भरधाव वेगाने पुढे जाईल व साफल्याची पंढरी तिला निश्चित सापडेल अशा मार्गावर शिवसेना उभी आहे. आम्ही एका निश्चयापर्यंत आलो आहोत. वाटल्यास ती प्रतिज्ञा समजा. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हाही ‘तिकडे मोगलांचे राज्य आहे. ते केवढे विराट आहे. दक्षिणेकडील राज्ये किती मोठी आहेत. त्यांच्याकडे अफाट धनसंपत्ती आहे. पण शिवाजी राजांजवळ सैनिकांचे पगार द्यायला पैसे नाहीत. हे कसली स्वराज्याची स्थापना करतात? यांच्या मागे कोण येतो,’ असे महाराष्ट्रातील वतनदार, जहागीरदार व सुभेदार म्हणत होते. मात्र तरीही शिवाजी महाराजांनी आपले कार्य पुढे नेले. याचे कारण, आपल्यामागे मावळे म्हणजे ‘शिवसेना’ उभी राहणार यावर त्यांचा विश्वास होता. शिवसेनाप्रमुखांनादेखील शिवाजी राजांप्रमाणेच विरोध झाला आणि त्याच विरोधाची शिदोरी आमच्याही हाती पडली आहे. विरोध पत्करूनही जो सत्कार्यावर विश्वास ठेवतो तो कार्य सिद्धीला तर नेतोच, पण इतिहासाला जयस्तंभ आणि मानस्तंभ देऊन पुढे चालतो. त्याच ऐतिहासिक मार्गावरून शिवसेना पुढे निघाली आहे. संकटांची व अडथळ्यांची पर्वा आम्हाला नाही. महाराष्ट्र व देश शिवसेनेच्या प्रतीक्षेत आहे!

Web Title: Uddhav Thackeray Comments on bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.