शेतक-यांसाठी नाहीत, पण आमदारांना विकत घेण्यासाठी भाजपाच्या तिजोरीत व मंत्र्यांच्या खिशात कोट्यवधी रुपये आहेत - उद्धव ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 07:45 AM2017-11-17T07:45:16+5:302017-11-17T07:46:21+5:30
अहमदनगरमध्ये शेतक-यांचे ऊस दरासाठीचे आंदोलन चिघळले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आलंय. शेतक-यांच्या या उग्र आंदोलनावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
मुंबई - अहमदनगरमध्ये शेतक-यांचे ऊस दरासाठीचे आंदोलन चिघळले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आलंय. शेतक-यांच्या या उग्र आंदोलनावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ''राज्यात सध्या सत्तेवर असलेल्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आकाशातून चंद्र-सूर्य आणून देऊ अशा घोषणा केल्या होत्या, पण आज शेतकरी हमीभावासाठी रोज मरण पत्करत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला पैसे नाहीत, पण आमदारांना विकत घेण्यासाठी भाजपाच्या तिजोरीत व मंत्र्यांच्या खिशात कोट्यवधी रुपये आहेत'', अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला हाणला आहे. सामना संपादकीयमधून हा टोला हाणण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपाप्रवेशासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट केला होता. यावरुन शिवसेनेनं भाजपावर खोचक टीका केली आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
महाराष्ट्रातील शेतकरी संपूर्ण कर्जमाफीसाठी संपावर गेला तेव्हाही त्याच्या छाताडावर बंदुका रोखून धमकावण्याचा प्रयत्न झाला. हा संप फोडताना जी आश्वासने सरकारने दिली ती पूर्ण झाली नाहीत. म्हणून काल शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरला. मात्र त्या शेतकऱ्यांवरदेखील पोलिसांनी अमानुष गोळीबार केला आहे. सरकारचे हे कृत्य अमानुष आहे. निर्लज्जपणाचे आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे बुधवारी हा प्रकार घडला. शेतकऱ्यांची मागणी काय आहे? उसाला प्रतिटन ३१०० रुपये भाव मिळावा व प्रश्न सामोपचाराने मिटावा. ही मागणी असेल तर त्यात काय चुकले? या मागणीसाठी शेवगाव-पैठण रस्त्यावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखून धरली. रात्रभर आंदोलन केल्यानंतरही सरकारतर्फे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू झाले. त्यात पोलिसांनी अटकसत्र सुरू केल्याने आंदोलक संतप्त झाले. खानापूर येथे लोकांनी रस्त्यावर लाकडे, दगड, टायर फेकले. उसाने भरलेल्या ट्रक्टर्सच्या टायरमधील हवा सोडली. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र तरीही जमाव आटोक्यात येत नसल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला असे सांगण्यात येत आहे. संबंधित
साखर कारखान्याची भूमिका
काय असेल ती असेल, पण भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी संतप्त शेतकऱ्यांशी बोलण्याची हिंमत दाखवायला हवी होती. पोलिसांनीही टोकाची भूमिका न घेता, दडपशाही न करता संतप्त आंदोलकांना हाताळायला हवे होते. मात्र तसे न करता त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांवर थेट गोळ्या झाडल्या. या गोळ्या प्लॅस्टिकच्या आहेत असे आता सांगितले गेले, पण या गोळ्यांनीही अनेक शेतकरी जखमी झाले. त्यापैकी दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यामुळे आंदोलन आणखी चिघळले. शेवगावची भूमी शेतकऱ्यांच्या रक्ताने भिजली आहे. प्लॅस्टिकच्या गोळ्या या कापसाचे बोळे नाहीत. शेतकऱ्यांवर झाडलेल्या गोळ्या ‘प्लॅस्टिक’च्या असल्याचे सांगणे म्हणजे आमदार हर्षवर्धन जाधव यांना ‘विकत’ घेण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना ‘ऑफर’ म्हणून देऊ केलेली पाच कोटी रुपयांची रक्कम ‘काळा पैसा’ नाही असे सांगण्यासारखे आहे. एकंदरीत सगळाच तमाशा सुरू आहे व भाजप मंत्र्यांच्या साधनशूचितेचे मुखवटे गळून पडत आहेत. नगरचे शेतकरी हिंसक झाले हे समजण्यासारखे आहे, पण ते हिंसक का झाले? शेतकऱ्यांचा गुन्हा काय? या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायला हवीत. विरोधी पक्षात असताना उसाला प्रतिटन ३४०० रुपये भाव द्यावा अशी मागणी भाजप सातत्याने करीत होता. तोच भाजप आता प्रतिटन उसासाठी ३१०० रुपये मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करतो ही
शरमेची बाब
असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले ते चुकीचे नाही. बुधवारी संध्याकाळी संबंधित साखर कारखाना, आंदोलक, शेतकरी आणि सरकारी प्रतिनिधी यांच्यात तोडगा होऊन अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. कारखान्याने एक हजार ९४० रुपयांऐवजी दोन हजार ५२५ रुपये पहिली उचल म्हणून देण्याची तयारी दर्शवली. त्याचप्रमाणे एफआरपीचा ७० : ३० फॉर्म्युलाही मान्य करण्यात आला. हा तोडगा सर्वमान्य झाल्याने आंदोलन मागे घेतले गेले असे आता सांगण्यात आले. आंदोलनाची यशस्वी माघार ही चांगलीच गोष्ट आहे, पण सरकारी पातळीवर हीच तडजोड आधी व्हावी यासाठी हालचाली झाल्या असत्या तर ऊस उत्पादकांवर रस्त्यावर उतरण्याची, पोलिसांच्या लाठ्या, अश्रुधूर, गोळ्या खाण्याची वेळच आली नसती. मात्र येथील शेतकऱ्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय, आपला जीव पणाला लावल्याशिवाय त्याच्या न्याय्य हक्काचेही मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या आंदोलनातही ते पुन्हा सिद्ध झाले. राज्यात सध्या सत्तेवर असलेल्यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आकाशातून चंद्र-सूर्य आणून देऊ अशा घोषणा केल्या होत्या, पण आज शेतकरी हमीभावासाठी रोज मरण पत्करत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला पैसे नाहीत. कर्जमुक्तीच्या घोषणेनंतरही शेतकरी सातबारा कोरा होण्याची वाट पाहात आहे, पण आमदारांना विकत घेण्यासाठी भाजपच्या तिजोरीत व मंत्र्यांच्या खिशात कोट्यवधी रुपये आहेत. शेवगावच्या रस्त्यावर झालेले उस उत्पादकांचे आंदोलन हा त्याचाच उद्रेक आहे.