Join us

कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानचा मस्तवालपणा वेळीच ठेचणं गरजेचं, उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 7:31 AM

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या त्यांच्या आई व पत्नीला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानवर सामना संपादकीयमधून विखारी टीका केली आहे.

मुंबई -  पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या त्यांच्या आई व पत्नीला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानवर सामना संपादकीयमधून विखारी टीका केली आहे. या भेटीदरम्यान,  कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला बांगड्या, टिकली, मंगळसूत्र काढून ठेवायला सांगण्यात आले. कपडे बदलण्यास भाग पाडले गेले. त्यांना मराठी भाषेत बोलण्यासदेखील मज्जाव करण्यात आला. यावर 

''कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीबाबत पाकड्यांनी जी खालची पातळी गाठली त्या मस्तवालपणाला फक्त निषेधाचे कागदी बाण हे उत्तर होऊ शकत नाही. पाकिस्तानचा फणा ठेचणे हेच त्या देशाबाबत आपण आजवर दाखविलेल्या राजकीय नेभळटपणाचे ‘प्रायश्चित्त’ ठरेल!'', अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून दिली आहे. 

काय आहे आजचा सामना ?

कुत्र्याचे शेपूट आणि पाकड्यांचे शेपूट सारखेच आहे. कितीही  नळीत घातले तरी ते वाकडेच राहते. कितीही साखरपेरणी केली तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यातील हिंदुस्थानद्वेष आणि विखार कमी होत नाही. आतादेखील हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानी तुरुंगात असलेले  कुलभूषण जाधव आणि त्यांची आई व पत्नी यांच्या भेटीप्रसंगी पाकिस्तानने आपले खायचे दात दाखवलेच. खरे तर जेमतेम ४० मिनिटांचा वेळ या भेटीसाठी देऊन पाकड्यांनी त्यांचा नापाक इरादा स्पष्ट केलाच होता. मात्र समोरासमोर येऊनही त्यांना थेट बोलता येणार नाही, एका आईला तिच्या मुलाला कुशीत घेता येणार नाही किंवा पती-पत्नीला किमान हस्तांदोलनही करता येणार नाही याची काळजी पाकिस्तानने घेतली. बंद काचेची ‘दीवार’ पाकड्यांनी त्यांच्यात आणून ठेवली. एवढेच नव्हे तर कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला बांगड्या, टिकली, मंगळसूत्र हे सर्वच काढून ठेवायला लावले. कपडे बदलण्यास भाग पाडले. त्यांना मराठी भाषेत बोलण्यासदेखील मज्जाव करण्यात आला. हा पाहुण्यांच्या आदरातिथ्याचा कोणता प्रकार म्हणायचा? ‘अतिथी देवो भव’ ही आपली संस्कृती नाही हेच यानिमित्ताने पाकिस्तानने दाखवून दिले. वास्तविक या भेटीवरून आपण कसे मानवतावादाचे पुजारी आहोत, आंतरराष्ट्रीय आणि राजनैतिक संकेतांचे कसे पालनकर्ते आहोत असे ढोल पाकिस्तान जगासमोर बडवीत होता.

प्रत्यक्षात हे ढोल पोकळच निघाले. कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत खालच्या पातळीची आणि अपमानास्पद वागणूक देऊन पाकिस्तानने आपला ‘खरा चेहरा’ स्वतःच जगासमोर आणून आणि आपण सोडलेले माणुसकीचे बुडबुडे स्वतःच फोडून पाकड्यांनी काय मिळवले हे त्यांचे त्यांनाच माहीत. अर्थात शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर गोळीबार करणाऱ्या किंवा आग्रा शिखर परिषदेत गळाभेट करून कारगील युद्धाचा खंजीर हिंदुस्थानच्या पाठीत खुपसणाऱ्या पाकड्यांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार? पुन्हा ही भेट बंद काचेआडून करू द्यायची होती किंवा इंटरकॉमद्वाराच संवाद करू द्यायचा होता तर एवढा खटाटोप केलाच कशाला? ही नौटंकी करण्यापेक्षा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वाराच ‘भेट’ घडवायची होती. मात्र हिंदुस्थान म्हटला की पाकड्यांनी विखाराचे फूत्कार सोडलेच पाहिजेत. द्वेषाचे जहर ओकलेच पाहिजे. वर चांगुलपणाचा देखावा करण्याचा शिरजोरपणादेखील करायला हवा.

पाकिस्तानची ‘चोर तर चोर, वर शिरजोर’ ही वृत्ती नेहमीचीच आहे. आम्ही सर्व संकेतांचे पालन करायचे आणि त्यांनी ते पायदळी तुडवायचे. आम्ही शांततेची कबुतरे त्यांच्या दिशेने उडवायची आणि त्यांनी आमच्या दिशेने गोळ्या झाडायच्या. हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची त्यांच्या वाढदिवशी ‘सरप्राइज’ भेट घेऊन ‘चाय पे चर्चा’ करायची, त्यांच्या आईसाठी शाल भेट द्यायची आणि त्यांनी कुलभूषण व त्याची आई तसेच पत्नीला समोरासमोर घेऊनही ना भेटू द्यायचे ना बोलू द्यायचे. भेटीआधी त्यांचे सौभाग्यलेणं काढून घ्यायचे. पाकिस्तानच्या सडक्या मेंदूचा आणि विखारी विचारांचा हा आणखी एक पुरावा. अर्थात, पाकिस्तानच्या अशा मस्तवालपणाच्या पुराव्यांचा मागील ५०-६० वर्षांत डोंगर झाला आहे आणि आम्ही तो डोंगर पोखरून ‘परस्पर सामंजस्या’चा ‘उंदीर’ बाहेर काढण्यातच मग्न आहोत. पुन्हा तो बाहेर येण्याची आणि पाकड्यांचा उद्दामपणा थांबण्याची चिन्हेदेखील नाहीत. तरीही आम्ही आमची सहिष्णुता आणि लवचिकता सोडायला तयार नाही. कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीबाबत पाकड्यांनी जी खालची पातळी गाठली त्या मस्तवालपणाला फक्त निषेधाचे कागदी बाण हे उत्तर होऊ शकत नाही. पाकिस्तानचा फणा ठेचणे हेच त्या देशाबाबत आपण आजवर दाखविलेल्या राजकीय नेभळटपणाचे ‘प्रायश्चित्त’ ठरेल!

टॅग्स :कुलभूषण जाधवउद्धव ठाकरेसरकारपाकिस्तान