Join us

...तर राम शिंदे यांचा सार्वजनिक लघुशंका सोहळा टळला असता, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 7:36 AM

जागतिक शौचालय दिनी उघड्यावर लघुशंका करणारे राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्यावर चौफेर टीका होत आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

मुंबई - जागतिक शौचालय दिनी उघड्यावर लघुशंका करणारे राज्याचे जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्यावर चौफेर टीका होत आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. सोबत त्यांनी भाजपालाही टार्गेट केले आहे. रविवारी बार्शी तालुक्याच्या दौ-यावर असताना, मंत्री राम शिंदे उघड्यावर लघुशंका करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेलवरून प्रसारित झाला आहे. या व्हिडीओवरून राम शिंदेंवर टीका होत आहे. ''स्वच्छ भारत अभियानच्या प्रसिद्धीवर शेकडो कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च झाले, ते वायाच गेले. त्या पैशांत महाराष्ट्रात किमान दोनेक हजार शौचालये राष्ट्रीय महामार्ग व इतरत्र बांधता आली असती व राम शिंदे यांचा सार्वजनिक लघुशंका सोहळा टळला असता. राम शिंदे यांना का दोष द्यायचा? हे कुणाच्याही बाबतीत घडू शकते.'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारला टोला हाणला आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय ? महाराष्ट्राचे एक मंत्री राम शिंदे यांनी रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. राम शिंदे यांच्या जाहीर लघुशंकेमुळे राष्ट्रावर तसेच समाजावर जणू आभाळ कोसळले, जगबुडी आली अशा पद्धतीने त्यांना झोडपले जात आहे. रस्त्याच्या कडेला सरकारी गाडीतून मंत्री उतरतात व लघुशंकेचा सार्वजनिक कार्यक्रम उरकतात याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. तो काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केला. त्यासंदर्भातील बातम्या चघळून चोथा झाला तरी आजही त्या रंगवल्या जाणे हे काही स्वच्छ पत्रकारितेचे लक्षण नाही. ज्यांनी हा व्हिडीओ चित्रित केला तो पहिला मूर्ख व ज्यांनी तो पसरवला ते शतमूर्ख. मंत्र्यांनी रस्त्यावर लघुशंका केली हे चुकीचे ठरू शकेल, पण ही परिस्थिती त्यांच्यावर का ओढवली? सोलापूर-बार्शी रोडवर प्रवास करताना मंत्र्यांना ‘कळ’ आली व घडू नये ते घडले. यावर मंत्र्यांचा खुलासा असा की, ‘‘काय करणार? गेल्या काही दिवसांपासून मी आजारी असून मला थांबणे शक्य नव्हते.’’ मंत्र्यांच्या खुलाशाकडे मानवी दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्वक पाहायला हवे. मधुमेहाच्या मंडळींना लघुशंका रोखता येत नाही. विविध प्रकारची जहाल व जालीम औषधे घेणाऱ्यांनाही अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हा प्रसंग कुणावरही येऊ शकतो. मागे एकदा मुलायमसिंग यादव यांनी प्रवासात सरकारी गाड्यांचा ताफा थांबवला व लघुशंकेचा जाहीर कार्यक्रम उरकला.

त्याचीही छायाचित्रे काढून ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाऱ्या वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर छापली. तेव्हाही मुलायमसिंगांनी सांगितलं, ‘‘माझे वय व आजारपण पाहता माझ्यासारख्यांना ‘कळ’ रोखणे कठीण होते.’’ आम्ही यादवांच्या भावनांशी सहमत आहोत. काही महिन्यांपूर्वी विद्यमान केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंह यांचादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दाखविण्यात आला होता. त्यांचीदेखील खिल्ली उडविण्यात आली होती. आता महाराष्ट्रातील एक मंत्री राम शिंदे यांनी केलेली जाहीर लघुशंका टीकाटिप्पणीच्या भोवऱ्यात सापडली आहे. खरे म्हणजे या लघुशंका घोटाळ्यास मुलायमसिंग यादव, राधा मोहन सिंह किंवा राम शिंदे जबाबदार नाहीत, तर गेल्या अनेक वर्षांत ‘स्वच्छते’च्या नावावर जे घोटाळे व लुटमार झाली, करण्यात आली तेच लोक जबाबदार आहेत. गंगा स्वच्छ करण्यासाठी आतापर्यंत हजारो कोटी रुपये पाण्यात गेले. तेच पंतप्रधान मोदी यांच्या अतिमहत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियान’चे झाले आहे. पंतप्रधानांनी हाती झाडू घेतला. त्यामुळे भाजपचे मंत्री, आमदार व खासदारांनी झाडू घेतला; पण जिथे ‘कचरा’ नाही तिथेच फोटोपुरते झाडू फिरत राहिले. मुंबईत धारावी कधीच साफ झाली नाही. महाराष्ट्रात ठिकठिकाणी हेच चित्र आहे. राज्य किंवा मुंबई हागणदारीमुक्त झाल्याची जाहिरातबाजी झाली, पण आजही मुंबईचे अनेक रस्ते, रेल्वेरुळांच्या बाजूला उघड्यावरच ‘स्वच्छता अभियाना’ची ऐशी की तैशी होत असताना दिसते आणि त्यासाठी लोकांना

सरसकट दोष देता येणार नाही. कारण शहरांची लोकसंख्या, नगर रचना आणि गरज यांची सांगड घालून स्वच्छतागृहांची उपलब्धता झाली तर उघड्यावर काही करण्याची वेळच जनतेवर येणार नाही. राज्यातील सर्व शहरांची अवस्था अशीच आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तर राज्यात एकूण २६ महापालिका आणि २३९ नगरपालिका आहेत. या महापालिका आणि नगरपालिका क्षेत्राची म्हणजे शहरी भागाची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ४५ टक्के आहे. त्यातील जवळजवळ ३० टक्के लोकसंख्येसाठी शौचालयाची सुविधाच उपलब्ध नाही. मग सर्व ‘विधी’ उघड्यावरच करण्याशिवाय या लोकांना दुसरा पर्याय तरी कुठे राहतो? गावखेड्यांमध्ये तर यापेक्षाही वाईट अवस्था आहे. मुंबईसारख्या महानगरीत सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अनुपलब्धतेवरून महिलांची होणारी कुचंबणा हादेखील एक गंभीर प्रश्न आहे. मागच्याच आठवड्यात मुंबईत महिलांसाठी अस्वच्छ आणि अपुरी शौचालये असल्याच्या निषेधार्थ ‘राइट टू पी’च्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर ‘टमरेल’ मोर्चा काढला. मुंबईसह महाराष्ट्रातील स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय असल्याचे या महिलांचे म्हणणे होते. स्वच्छ भारत अभियानच्या प्रसिद्धीवर शेकडो कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च झाले, ते वायाच गेले. त्या पैशांत महाराष्ट्रात किमान दोनेक हजार शौचालये राष्ट्रीय महामार्ग व इतरत्र बांधता आली असती व राम शिंदे यांचा सार्वजनिक लघुशंका सोहळा टळला असता. राम शिंदे यांना का दोष द्यायचा? हे कुणाच्याही बाबतीत घडू शकते.

टॅग्स :प्रा. राम शिंदेउद्धव ठाकरेस्वच्छ भारत अभियानभाजपाशिवसेना