सत्तेचे इमले व निवडणुकांचे जुमले यातच देशाची संरक्षण यंत्रणा गुरफटलेलीय, देशाला वाचवायचे कोणी? - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 07:53 AM2017-12-25T07:53:06+5:302017-12-25T07:54:57+5:30
काश्मीर येथे झालेल्या चकमकीत भंडारा जिल्ह्याचा सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर हे शहीद झाले. गेल्या काही दिवसांत सीमारेषेवर कुरापती पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार केला जात आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई - काश्मीर येथे झालेल्या चकमकीत भंडारा जिल्ह्याचा सुपुत्र मेजर प्रफुल्ल मोहरकर हे शहीद झाले. गेल्या काही दिवसांत सीमारेषेवर कुरापती पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार केला जात आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'काश्मीरात पाकड्यांच्या गोळीबाराने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यात आपल्याच जवानांची पुन्हा बलिदाने होत आहेत. सत्तेचे इमले व निवडणुकांचे जुमले यातच देशाची संरक्षण यंत्रणा गुरफटलेली आहे. देशाला वाचवायचे कोणी?'', असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपस्थित केला आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
गुजरातच्या निवडणुका संपताच पाकिस्तानने सीमेवरील हालचाली वाढवल्या आहेत. हिमाचल व खास करून गुजरातच्या निवडणुका पंतप्रधानांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला होता. या काळात पाकिस्तान व चीनसारखे दुश्मन जणू शेपूट आत घालून बसल्याचेच चित्र होते. आता निवडणुका संपल्या आहेत. गुजरातमध्ये ९९ जागा जिंकून भाजपचे सरकार विराजमान झाले आहे. त्यापाठोपाठ लगेच सीमेवर पाकिस्तानने उच्छाद सुरू केला आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पाक सैन्याने पुन्हा एकदा शस्त्र्ासंधीचे उल्लंघन केले. लाइन ऑफ कन्ट्रोल म्हणजेच सीमा रेषेवर आपले सैनिक गस्त घालीत असताना पाक सैन्याने ‘नेम’ धरून गोळीबार केला. त्यात मेजर प्रफुल्ल मोहरकर या मराठी सुपुत्रासह आमचे तीन जवान शहीद झाले. अर्थात नेहमीप्रमाणे आमच्या सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे, पण आमच्या तीन जवानांच्या बदल्यात पाकड्यांची किती मुंडकी उडवली, याबाबत कोणताही खुलासा अद्याप झालेला नाही. जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंदुस्थानी लष्कराची दहशतवाद्यांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू आहे. तेथील सीमेवरही आपल्या लष्कराची कारवाई सुरू आहे. ती पुढेही सुरू राहील, पण जवानांचे सर्वाधिक रक्त हिंदुस्थानच्याच भूमीत सांडत आहे, बलिदाने इकडच्या बाजूनेच वाढत आहेत, त्याचे काय? हा फक्त गांभीर्याने विचार करावा एवढाच मर्यादित प्रकार नाही. प्रत्यक्ष ठोस कृती करून आणि त्याहीपेक्षा पाकिस्तानला आपण काय धडा शिकविला हे देशाला दाखवून देण्याचा हा विषय आहे. आमच्याच भागात गस्त घालणाऱ्या आमच्या सैनिकांवरील हल्ले वाढले आहेत. याचा अर्थ असा की, जम्मू-कश्मीरातील आमचे सैन्य पाकड्यांच्या बंदुकांच्या नळीवर आहे. लाल चौकात सरकार तिरंगा फडकवू शकत नाही व कश्मीरच्या सीमेवरील जवानांचे कोणत्याही युद्धाशिवाय बळी जात आहेत. निर्मला सीतारामन या मजबूत किंवा करारी वगैरे संरक्षण मंत्री असतीलही किंवा महिला संरक्षण मंत्री नेमल्याने पाक, चीन, नेपाळ, बांगलादेशसारख्या राष्ट्रांनी अचंबित होऊन तोंडात बोटेही घातली असतील, पण त्यांची बोटे तोंडात असली तरी दुसऱ्या हाताची बोटे बंदुकांचे खटके रोज दाबीत आहेत. आम्ही मात्र स्वतःच्याच विजयात दंग आहोत. गुजरातच्या निवडणुकीत पंतप्रधानांनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. पाकिस्तानच्या नावाने गुजरातच्या प्रचारसभा दणाणून सोडल्या. गुजरातच्या निवडणुकांत पाकिस्तान हस्तक्षेप करीत असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये कोणाचे राज्य यावे व कोण मुख्यमंत्री व्हावा यात पाकिस्तानला कमालीचा रस आहे, असा आरोप त्यांनी केला. दिल्लीतील एका बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे नेते व पाकिस्तानचे महत्त्वाचे लोक हजर असल्याचा स्फोटही त्यांनी केला. गुजरातमधील पाकिस्तानचा राजकीय हस्तक्षेप जितका गांभीर्याने घेतला गेला तेवढीच चिंता कश्मीरातील पाकड्या सैनिकांचे गोळीबार व जवानांच्या बलिदानाबाबतदेखील दाखवायला हवी. बरं, गुजरातमधील पाकड्यांच्या हस्तक्षेपाचे पुढे काय झाले की तोसुद्धा एक ‘चुनावी जुमला’च होता, असे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. अर्थात, तो चुनावी जुमला असेल-नसेल, पण कश्मीरातील आमच्या जवानांची बलिदाने हे ‘जुमले’ ठरू नयेत एवढे निश्चित. गुजरातमध्ये आता भाजपची सत्ता आली आहे. पाकड्यांचा तेथील हस्तक्षेप त्यानंतर विरून गेला, पण कश्मीरात पाकड्यांच्या गोळीबाराने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यात आपल्याच जवानांची पुन्हा बलिदाने होत आहेत, रक्त सांडत आहे. सत्तेचे इमले व निवडणुकांचे जुमले यातच देशाची संरक्षण यंत्रणा गुरफटलेली आहे. देशाला वाचवायचे कोणी?