मुंबई - राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ''राज्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्याचे प्रमाणपत्र मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची झालेली हत्या या प्रमाणपत्राला छेद देणारी आहे'', असे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून म्हटले आहे. पुण्यात बांधकाम व्यावसायिक देवेन शहांची हत्या झाली. यावरुनही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट केले आहे. 'पुण्यात झालेली बांधकाम व्यावसायिक देवेन शहांची हत्या ही धोक्याची घंटा आहे. उद्योगपती व व्यापाऱ्यांनीच महाराष्ट्रात, देशात भाजपचे राज्य आणले, पण त्यांचेच बळी जात आहेत'', अशी खोचक टीका त्यांनी सामना संपादकीयमधून केली आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय ?महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आता गुन्हेगारीची राजधानी बनू लागली आहे काय? पुण्यात सध्या थंडीचा गारठा कमी आहे, पण गुन्हेगारी टोळय़ांच्या कारवायांनी पुणेकर गारठले आहेत. पुण्याच्या प्रतिष्ठत प्रभात रोडवर बांधकाम व्यावसायिक देवेन जयसुखलाल शहा यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. देवेन शहा यांच्या मुलावरही गुंडांनी पिस्तुल रोखले. पुण्यात याआधीही हत्या झाल्या आहेत. दरोडे पडले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुण्यात व आसपास गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मुंबईप्रमाणे तेथेही ‘गँगवॉर’, खंडणी, धमक्या वगैरे प्रकार घडत आहेत. पुणे आता ‘पेन्शनरांचे’ ठिकाण राहिलेले नाही. ते आता शिक्षणसम्राट, बांधकाम व्यावसायिक, लॅण्डमाफिया आदींचे बनले आहे. शिवाय पुण्याची एक ओळख ‘आयटी हब’ अशीही बनली असल्याने त्याला जोडून अनेक उपनगरे फुगली आहेत. विद्येचे वगैरे माहेरघर अशी पुण्याची आधी ओळख होतीच, त्यात आता ‘आयटी’ उद्योगाची भर पडली. त्यामुळे नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरून आदळणाऱ्या लोंढय़ांनी पुण्याचा चेहरा बिघडला असून त्यातूनच भररस्त्यावर खुनाखुनीचे प्रकार वाढीस लागले आहेत. पुणे काय किंवा शेजारचे पिंपरी-चिंचवड काय, मागील दीड-दोन दशकांत वाढती गुन्हेगारी हा चिंतेचाच विषय ठरला आहे. मोटारसायकली, मोटारींची तोडफोडदेखील सुरू असतेच. काही दिवसांपूर्वी तर चोरटय़ांनी पु. ल. देशपांडे यांचेही घर फोडले. अर्थात ते चोरटे व भामटे वेगळे आणि प्रभात रोडवर घडलेला खुनाखुनीचा प्रकार वेगळा. पुण्यातील खुन्या मारुती हा श्रद्धेचा विषय आहे, पण पुण्यातील इतर खुनी मोकाट सुटले आहेत. त्यांना वेळीच आवरले नाही तर पुण्याचा सांस्कृतिक व नागरी चेहरा विद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. पुण्यात झालेली बांधकाम व्यावसायिक देवेन शहांची हत्या ही धोक्याची घंटा आहे. उद्योगपती व व्यापाऱ्यांनीच महाराष्ट्रात, देशात भाजपचे राज्य आणले, पण त्यांचेच बळी जात आहेत. हे सर्व यापुढे तरी थांबणार का, हा खरा प्रश्न आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्याचे प्रमाणपत्र मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची झालेली हत्या या प्रमाणपत्राला छेद देणारी आहे. पुण्यात काय चाललेय, असा प्रश्न या घटनेने उपस्थित झाला असून सरकारने त्याची गंभीर दखल घ्यायला हवी.