अयोध्येतील राम मंदिरप्रश्नी उगाच घुसखोरी व लुडबुड नको, उद्धव ठाकरे यांचा श्री श्री रविशंकर यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 08:43 AM2018-03-07T08:43:15+5:302018-03-07T08:43:15+5:30
अयोध्येत राम मंदिरप्रश्नी मध्यस्थी करत असलेले अध्यात्म गुरू श्री श्री रविशंकर यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे.
मुंबई - अयोध्येत राम मंदिरप्रश्नी मध्यस्थी करत असलेले अध्यात्म गुरू श्री श्री रविशंकर यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. ''अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न हा श्रद्धेचा विषय आहे. न्यायालयात हा प्रश्न सुटणार नाही हे सांगण्यासाठी कुण्या गुरू महाराजांची गरज नाही. मुस्लिमांनी सद्भावना दाखवावी वगैरे बाजारगप्पा गेल्या पंचवीस वर्षांत भरपूर झाल्या. आज तेच दळण ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’वाले दळत आहेत. त्या दळणात सत्त्व कमी व राजकीय खडेच जास्त आहेत. रविशंकर महाराजांनी राममंदिराचे इतके मनावर घेऊ नये व या प्रश्नी उगाच घुसखोरी आणि लुडबुड करून चुथडा करू नये. हा प्रश्न त्यांनी मोदी, शहा व मोहन भागवतांवर सोडून जगास ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे धडे देण्यास मोकळे राहावे'', अशा शब्दांत उद्धव यांनी श्री श्री रविशंकर यांचा समाचार घेतला आहे.
अयोध्येतील राम मंदिर आणि मशिदीचा तिढा सुटला नाही, तर भारतात सीरियासारखी परिस्थिती उद्भवेल, असे विधान श्री श्री रविशंकर यांनी केले होते. यावरुनच सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
- काय आहे आजचे सामना संपादकीय ?
आपल्या देशातील ‘लोकशाही’चे नाव बदलून ‘लुडबुडशाही’ करावे. कारण जो उठतो तो कोणत्याही विषयात लुडबुड करून किंवा घुसखोरी करून आपल्या अकलेचे चांदतारे पाजळत असतो. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’वाले एक आध्यात्मिक म्हणवून घेणारे गुरू श्री श्री रविशंकर हे गेल्या दोनेक वर्षांपासून राममंदिरप्रश्नी लुडबुड करू लागले आहेत व यानिमित्ताने प्रकाशझोतात राहण्याची धडपड करीत आहेत. या गुरू महाराजांनी आता असा आध्यात्मिक संदेश दिला आहे की, ‘अयोध्येत मंदिर प्रश्न सुटला नाही तर हिंदुस्थानची अवस्था सीरियासारखी होईल.’ आता गुरू महाराजांनी ही धमकी दिली आहे, भविष्यवाणी वर्तवून खळबळ उडवली आहे की सीरियातील धर्मांध ‘इसिस’ टोळय़ांना मंदिर प्रश्नात ओढून एकप्रकारे नव्या अराजकाची सुपारी दिली आहे? याचा तपास आता राष्ट्रीय सुरक्षेसाठी करणे गरजेचे आहे. आध्यात्मिक गुरूच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. माणसे मारणे व तशा धमक्या देणे हे कसले आर्ट ऑफ लिव्हिंग? हे महाशय जागतिक स्तरावरचे गुरू आहेत. त्यामुळे त्यांनी सीरिया, इराकमध्ये त्यांचे खासगी जेट विमान उतरवून तेथील आतंकवाद्यांना ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माध्यमांतून शांतता व संस्कृतीचे धडे द्यायला हवेत. मात्र तसे न करता ‘शांत’, ‘सहिष्णू’ हिंदुस्थानचे सीरिया होईल असे सांगणे हे बेतालपणाचे लक्षण मानावे लागेल. अयोध्येत राममंदिर व्हावे म्हणून जो मोठा संघर्ष व रक्तरंजित लढा झाला त्यात हे गुरू महाराज तसे कुठेच दिसले नव्हते. बाबरीचे ढाचे हातोडे-घणाचे घाव घालून तोडणारे कोण होते? याचा खुलासा भारतीय जनता पक्षाच्या तेव्हाच्या राष्ट्रीय पुढाऱ्यांनी केलाच आहे.
ते शिवसैनिक होते असे स्पष्टीकरण भाजपने दिले व काखा वर केल्या, पण बाबरी तोडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान असल्याचे शिवसेनाप्रमुखांनी हिमतीने सांगितले. तेव्हाच देशातील गवताला हिंदुत्वाचे भाले फुटले. करसेवकांच्या रक्ताने शरयू लाल झाली होती व ‘बाबरी’पतनानंतर मुंबईत पाकड्यांनी दंगली उसळवून एकप्रकारे ‘सीरिया’ करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही हिंदुत्वासाठी शिवसेनाच येथे रक्ताचे शिंपण करत होती. अन्यथा मुंबईचाच नव्हे तर देशाचा सीरिया तेव्हाच झाला असता; पण शिवसेनेने तो होऊ दिला नाही हे गुरू महाराजांनी समजून घेतले पाहिजे. मुळात गुरू महाराज नक्की कुणाची एजंटगिरी करीत आहेत, याचा खुलासा होणे गरजेचे आहे. एक सवाल असा आहे की, आज जो काही ‘रामनामा’चा जप सुरू आहे, मंदिर प्रश्न धसास लावण्यासाठी काहींनी लुडबुड सुरू केली आहे ते अयोध्येच्या रणात नव्हते. बाबरी तुटलीच नसती तर राममंदिराची शिला रचता आली नसती. पण आज राममंदिरवाल्यांचे राज्य दिल्लीत असतानाही बाबरी ढाचा उद्ध्वस्त करणाऱ्यांवर नव्याने खटले सुरू झाले आहेत. ज्यांनी बाबरी तोडली त्यांनाच गुन्हेगार ठरवून फासावर लटकवून तुम्ही राममंदिराचे राजकीय स्वार्थाचे डबडे वाजवणार असाल तर ते ‘शतप्रतिशत ढोंग’ आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी बाबरीचा खटला न्यायालयाच्या कृपेने पुन्हा सुरू झाला व आडवाणी वगैरेंना पुन्हा दोषी ठरवले गेले. यामागचे जे राजकारण आहे त्यात आम्हाला पडायचे नाही; पण बाबरी पाडणाऱ्यांवर आज गुन्हेगारीचा टिळा माथी घेऊन फिरण्याची वेळ येत असेल तर कोणत्या तोंडाने तुम्ही राममंदिराची जपमाळ ओढत आहात? निवडणूक विधानसभेची असो नाहीतर लोकसभेची, अगदी ठरवल्याप्रमाणे एखादा ‘ठेकेदार’ राममंदिराचा विषय सुरू करतो. आताही तेच चालले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कुणाला येथे हिंदू-मुसलमानांत दंगली उसळून राजकारण करायचे आहे काय? व त्यासाठीच मुसलमानांना डिवचून ‘सीरिया’चा मार्ग दाखवला जात आहे काय? अयोध्येतील राममंदिर प्रश्नावर सुरू असलेली न्यायालयीन लढाई एका निश्चित टोकावर नेण्याचे कार्य खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. या प्रश्नावर कोर्टाबाहेर योग्य तोडगा निघावा यासाठीदेखील त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. मग आता श्री श्री रविशंकर यांची ही नवी लुडबुड म्हणजे श्रेयवादाच्या मुद्दय़ावरून खासदार स्वामी यांना अपशकुन करण्याचा प्रयत्न आहे का? खरे तर केंद्रात संपूर्ण बहुमताचे हिंदुत्ववादी ‘भाजप’ सरकार बसले आहे. मनात आणले तर एखादा अध्यादेश काढून ते चोवीस तासांत राममंदिर उभारणीचे राष्ट्रीय कार्य सुरू करू शकतात. पण सरकारचेही या प्रश्नी पाण्यात बसलेल्या म्हशीप्रमाणे रवंथ करणे सुरू आहे. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न हा श्रद्धेचा विषय आहे. न्यायालयात हा प्रश्न सुटणार नाही हे सांगण्यासाठी कुण्या गुरू महाराजांची गरज नाही. मुस्लिमांनी सद्भावना दाखवावी वगैरे बाजारगप्पा गेल्या पंचवीस वर्षांत भरपूर झाल्या. आज तेच दळण ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’वाले दळत आहेत त्या दळणात सत्त्व कमी व राजकीय खडेच जास्त आहेत. रविशंकर महाराजांनी राममंदिराचे इतके मनावर घेऊ नये व या प्रश्नी उगाच घुसखोरी आणि लुडबुड करून चुथडा करू नये. हा प्रश्न त्यांनी मोदी, शहा व मोहन भागवतांवर सोडून जगास ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे धडे देण्यास मोकळे राहावे. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, महिलांचे जगणे असह्य बनले आहे. गुरू महाराजांनी जमले तर त्यात लक्ष घालावे. मुख्य म्हणजे हिंदुस्थानचा सीरिया कधीच होणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे आणि समजा तसा तो होईल असे वादासाठी म्हटले तर आज गर्जना करणारे सगळे तथाकथित हिंमतबाज स्त्रीवेशात पळून जातील! शिवसेना मात्र रस्त्यावर मर्दासारखी लढत राहील, ‘प्राण जाय, पर वचन न जाय’ हाच बाणा कायम ठेवून!