Uddhav Thackeray : मुंबईतील मान्सूनपूर्व कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करा - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 02:06 AM2021-04-17T02:06:53+5:302021-04-17T06:45:36+5:30
Uddhav Thackeray: सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मलेरिया, डेंग्यूची शक्यता वाढते. त्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी मान्सूनपूर्व कामांवर त्याचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्या आणि ३१ मेपर्यंत ही कामे पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाला एका बैठकीत दिले.
मुंबईतील नालेसफाई करतानाच आवश्यक त्या ठिकाणी नाले खोलीकरण अथवा रुंदीकरण करुन त्यांची नैसर्गिक प्रवाह क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल. तसेच महामार्ग आणि पदपथाच्या बाजूला टाकण्यात आलेले ढिगारे उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सूचना द्यावी. तसेच यापुढे अशा पद्धतीने ढिगारे टाकले जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मलेरिया, डेंग्यूची शक्यता वाढते. त्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलारासू, सुरेश काकाणी बैठकीला उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत सुरू असलेल्या कोस्टल रोड, मेट्रो अशा कामांच्या परिसरात साचत असलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने संबधित यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजना करावी, अशी सूचना केली.
महापालिका आयुक्त चहल म्हणाले की, मुंबईत पावसाचे पाणी साठण्याची संभाव्य अशी ४०६ ठिकाणे शोधून तेथील आवश्यक कामे सुरु करण्यात आली आहेत. मुंबईतील ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या व राहण्यास धोकादायक असलेल्या इमारतींना नोटीस देणे, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.
महापालिकेचे कीटक नियंत्रण अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी डास प्रतिबंधक, मूषक निर्मूलन व तत्सम उपाययोजनांची माहिती दिली.
नाल्यांतून काढणार ६ लाख ८५ हजार मेट्रिक टन गाळ
मागील वर्षी मुंबईत नदी-नाल्यांमधून एकूण ५ लाख ४ हजार १२५ मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला होता. यंदा त्यामध्ये सुमारे ३५ टक्के वाढ करुन ६ लाख ८५ हजार ३५८ मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे.
दरवर्षी हिंदमाता आणि गांधी मार्केट या सखल भागांमध्ये हमखास पाणी साचते. तेथील पाण्याचा निचरा आता पूर्वीपेक्षा वेगाने होतो. दोन्ही ठिकाणी पाणी साठवणाऱ्या भूमिगत मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत. सखल भागात पावसाचे पाणी भरु लागले तर ते या टाक्यांमध्ये सोडण्यात येईल. भरती ओसरल्यानंतर हे पाणी समुद्रात सोडण्यात येईल. यामुळे पाणी साचणार नाही.