मुंबई - अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या नावाने ट्र्स्टची स्थापना करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेमध्ये केली. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन,’अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे. त्यात उद्धव ठाकरे म्हणतात की, ‘अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करणयाचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे सरकारचे कर्तव्यच होते. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन.’
दरम्यान, अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या दृष्टीन केंद्र सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या बांधणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार ट्र्स्टची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत केली. राम मंदिराच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे नाव श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट असे ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मोदींनी आज लोकसभेत दिली.
‘’आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. माझ्या नेतृत्वाखालील सरकारने रामजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधण्यासाठी तसेच यासंबंधीच्या इतर विषयांवर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार एक व्यापक योजना तयार केली आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीरामजन्मभूमी ट्रस्ट या स्वायत्त ट्रस्टची स्थापना करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.’’असे मोदींनी सांगितले.