मुंबई: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला. उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत झालेला निर्णय प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर सांगितला. शरद पवारांनीच अध्यक्षपदी कायम राहावं, असा ठराव आम्ही आज पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या सदर घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजीनामा फेटाळला हे अपेक्षित आहे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय जरी असला, तरी विरोधी पक्षाच्या राजकारणावर या घडामोडींमुळे परिणाम होऊ शकतो, असं मत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. जशा विरोधी पक्षांनी आपल्या भावना शरद पवारांना कळविल्या तशाच उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भावना शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत, अशी माहिती संजय राऊतांनी यावेळी दिली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी देखील पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणी बोलवून त्या संदर्भातील निर्णय घेतले गेले होते. महाबळेश्वरच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये आणि अधिवेशनात हे निर्णय घेण्यात आले होते, असं संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवार हे राज्यातच नव्हे तर देशातच मोठे अनुभवी नेते आहे. पंजाबमध्ये गेलो असताना शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. देशातील शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी दिलेले योगदान कुणीही विसरू शकत नाही. या देशाचे दिग्गज नेते यांनीही त्यांच्या भावना सुप्रिया सुळे आणि माझ्याकडे व्यक्त केली. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाजिल्ह्यातील कार्यकर्त्यांची भावना आमच्याकडे पोहचली. शरद पवारांनी सक्रीय पद सोडू नये असं मत प्रत्येकाने व्यक्त केले. कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे. जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तिथे त्यांच्या मनात दु:ख, वेदना आणि नाराजी आहे या भावना आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.