Join us

Uddhav Thackeray: कोरोनाची साथ ही काही सरकारी योजना नाही; उद्धव ठाकरेंनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 9:26 PM

कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला होता. त्याचा सर्वात मोठा महाराष्ट्रालाही बसला होता. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही कमी झालेला नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 

कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून  त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येणार, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२ टक्क्यांवर आलं आहे, ही दिलायासादायक बाब आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी आपण कडक निर्बंध लावले आहेत. लॉकडाऊन केलेला नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसतंय. शहरी भागात संख्या कमी होतेय तर ग्रामीण भागात संख्या हलकी वाढताना दिसत आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

तिसरी लाट ही आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे. गेल्या लाटेतील विषाणू आणि यावेळी आलेल्या लाटेतील विषाणूमध्ये फरक आहे. संसर्गाचं प्रमाण वाढवण्याचं प्रमाण नव्या विषाणूमध्ये अधिक आहे. तसंच रुग्णांना बरं होण्यासही वेळ लागत आहे. रुग्णसंख्या गेल्या वेळच्या तुलनेत अधिक आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कोरोनामुळे निर्बंध लागू करावे लागत आहे. मात्र काहीजण लॉकडाऊन हटवला नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरु, आंदोलनं करु, दुकानं सुरु करु, असं म्हणत आहे. मी तुम्हाला सांगतो, कोरोनाची साथ ही काय सरकारी योजना नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल, यासाठी राज्य सरकार वर्षंभर प्रयत्न करत आहे. तुम्ही कोरोनाचे योद्धे म्हणून रस्त्यावर उतरा, कोरोनाचे दूत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आपलं गाव कोरोनामुक्त करा

हिवरे बाजार सारखा प्रयत्न राज्यातील काही सरपंच व गावे करीत आहेत. मी त्यांचेही कौतुक करतो. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख, कोमल ताई यांच्यासारखे सरपंच एक उदाहरण घालून देत आहेत. मी त्यांच्याशी बोलतो आहे. आज कोविडला रोखण्यात जसे वैद्यकीय उपचारांचे महत्व आहे तसेच लोकांची जागृती आणि सहभागही फार महत्वाचा आहे.

सरकार एकट्यानेच हा लढा लढू शकत नाही. हिवरे बाजार सारखे शिस्तबद्ध रीतीने रोगाचा मुकाबला केल्यास आपल्यालाही कोविडशून्य गाव करता येऊ शकेलं आणि म्हणूनच हा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील गावांनी नियोजन करावे असे आवाहन मी करतो. राज्य शासन या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करेल, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तौक्ते वादळामुळे मोठं नुकसान-

तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. त्या वादळानं आपल्याला मोठा फटका दिला. "या वादळाची माहिती मिनिटा मिनिटाला मी घेत होतो. कोकणचा दौरा केल्यानंतर नुकसानीचीही कल्पना आली. आपण नुकसान भरपाईची घोषणा केली आणि आता ती देण्यासही सुरूवात होणार आहे. केंद्राचे निकष बदलायला हवे. परंतु आपण गेल्यावेळी लावलेल्या निकषांप्रमाणेच मदत देणार आहोत," असंही त्यांनी स्पष्ट केलं. आपल्याला किनारपट्टीवर कायमचे काही उपाय करण्याची गरज असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस