धुळ्यातील राईनपाड्याचे हत्याकांड, अराजकाचा इशारा - उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 07:43 AM2018-07-03T07:43:23+5:302018-07-03T07:43:32+5:30
मुले पळवण्याच्या संशयावर संतप्त जमावानं केलेल्या मारहाणीत 5 जणांचा मृत्यू झाला. धुळ्यातील राईनपाडा येथील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई - मुले पळवण्याच्या संशयावर संतप्त जमावानं केलेल्या मारहाणीत 5 जणांचा मृत्यू झाला. धुळ्यातील राईनपाडा येथील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमध्ये भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
''राईनपाडय़ाचे हत्याकांड महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासणारे आहे. केवळ अफवांचे आणि सामाजिक विकृतीचे बळी म्हणून त्याकडे पाहता येणार नाही. हे ना कायद्याचे लक्षण आहे ना सुव्यवस्थेचे. येथील गरीबाला पोटासाठी राज्यातच अन्य ठिकाणी जावे लागणे हा गुन्हा ठरायला लागला आणि समाजच त्यासाठी परस्पर मृत्युदंड देऊ लागला तर महाराष्ट्रासाठी हा अराजकाचा इशाराच आहे. अफवा हा आमचा गुन्हा होता का? असा प्रश्न राईनपाडा हत्याकांडात बळी गेलेल्या पाच निरपराध्यांचे आत्मे आणि उघडी पडलेली त्यांची कुटुंबे विचारत आहेत. त्याचे काय उत्तर सरकार आणि समाजाकडे आहे?'', असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे.
-काय आहे आजचे सामना संपादकीय ?
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरले आहे का, असा प्रश्न उपस्थित करणाऱया घटना सध्या घडत आहेत. कुठेतरी एखादी अफवा पसरते; त्यातून जमाव हिंसक बनतो आणि केवळ संशयावरून निरपराध्यांची निर्घृण हत्या करतो. हे सर्वच भयंकर आणि महाराष्ट्राला हादरविणारे आहे. धुळे जिल्हय़ातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे रविवारी जो अमानुष प्रकार घडला तो समाजाच्या विकृत मानसिकतेचा तर प्रत्यय देतोच, पण अफवांच्या तडाख्यापुढे हतबल झालेले स्थानिक पोलीस आणि राज्याचे गृह खाते याचाही तो पुरावा आहे. रविवारी दुपारी राईनपाडा येथील बाजारात लहान मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आणि तेथे बाहेरून आलेले काही लोक त्या अफवेच्या तडाख्यात सापडले. मूळचे सोलापूर जिह्यातील डवरी गोसावी या भटक्या-विमुक्त समाजातील अत्यंत गरीब असलेले हे लोक ठिकठिकाणी भिक्षा मागून किंवा मजुरी करून पोट भरतात. तसेच हे पाच जण राईनपाडा भागात आले होते, पण ते मुले पळविण्यासाठी आल्याचा संशय काही स्थानिकांना आला. तो सर्वत्र पसरला आणि पाहता पाहता जमाव हिंसक बनला. कुठलीही खातरजमा न करता जमावाने पाचही जणांना अक्षरशः ठेचून मारले. हा प्रकार सोशल मीडियावरील अफवेमुळे झाला असला तरी या मारहाणीची माहिती पोलिसांना कधी मिळाली? पोलीस तेथे कधी पोहोचले? जमावाच्या तुलनेत कमी पोलीसबळ का पाठवले गेले?
पोलिसांचा पुरेसा फौजफाटा घटनास्थळी का पाठवला गेला नाही? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. वेळीच पोलीस कारवाई झाली असती तर कदाचित पाचही जणांचे जीव वाचले असते. मुले पळविणारी टोळी असल्याची अफवा जर सोशल मीडियावर वेगात पसरू शकते तर त्याच वेगाने राईनपाडा येथील घटनेची माहितीही समाजमाध्यमांवर व्हायरल झालीच असेल. तरीही पाच बळी गेल्यानंतरच सर्व काही शांत झाले. सोशल मीडियावर या प्रकारच्या अफवा पसरविणाऱयांवर पोलिसांचा ‘वॉच’ असेल अशी एक बातमी १ जुलै रोजीच प्रसिद्ध होते आणि त्याच दिवशी राईनपाडा येथील ‘अफवेचे हत्याकांड’ घडते. मालेगावातही याच पद्धतीने जमावाकडून चौघांना मारहाण होते. त्याआधी नंदुरबार येथे गैरसमजातून पंढरपूरच्या नगरसेवकांसह तिघे अफवा आणि जमावाच्या तावडीत सापडतात. मग अशा वेळी पोलिसांचा हा ‘वॉच’ कुठे असतो? गेल्या दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांत अशा ‘जीवघेण्या’ अफवांनी २२ निरपराधांचे बळी घेतले आहेत. महाराष्ट्रातही परिस्थिती तेवढीच गंभीर आहे; पण सरकार फक्त ‘नाइट वॉचमन’च्या भूमिकेत वावरत आहे. या राज्याच्या गृह खात्याला भीमा-कोरेगावच्या घटनेची चाहुल लागत नाही. दाभोलकर-कलबुर्गींचे मारेकरीही सरकारच्या ‘वॉच’मध्ये अद्याप आलेले नाहीत. मुंबईतील मीठ गायब झाल्यापासून गावात लहान मुले पळविणारी टोळी आली आहे, दरोडेखोर आले आहेत अशा अफवांचा बाजार महाराष्ट्रात सध्या गरम आहे आणि त्याचे चटके किरकोळ फेरीवाले, मजूर, पोटासाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गोरगरीबांना बसत आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगणे ठीक आहे; पण त्याहीपलीकडे सरकार म्हणून बसलेल्या राज्यकर्त्यांचे काय? त्यांची आणि प्रशासनाची जबाबदारी समाजापेक्षा जास्त आहे. अफवा आणि सोशल मीडिया यावर संपूर्ण नियंत्रण शक्य नाही हे मान्य केले तरी जीवघेण्या अफवांच्या पिकाची छाटणी करण्यासाठी सरकारला कठोर कारवाई करावीच लागेल. ती तशी झाली आणि समाजालाही जाणवली तरच अफवा आणि त्यातून होणारी सामाजिक विकृती नियंत्रणात येऊ शकेल. राईनपाडय़ाचे हत्याकांड महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासणारे आणि निषेधार्हच आहे. केवळ अफवांचे आणि सामाजिक विकृतीचे बळी म्हणून त्याकडे पाहता येणार नाही. हे ना कायद्याचे लक्षण आहे ना सुव्यवस्थेचे. येथील गरीबाला पोटासाठी राज्यातच अन्य ठिकाणी जावे लागणे हा गुन्हा ठरायला लागला आणि समाजच त्यासाठी परस्पर मृत्युदंड देऊ लागला तर पुरोगामी महाराष्ट्रासाठी हा अराजकाचा इशाराच आहे. अफवा हा आमचा गुन्हा होता का? असा प्रश्न राईनपाडा हत्याकांडात हकनाक बळी गेलेल्या पाच निरपराध्यांचे आत्मे आणि उघडी पडलेली त्यांची कुटुंबे विचारत आहेत. त्याचे काय उत्तर सरकार आणि समाजाकडे आहे?