मुंबई - पाकिस्तानकडून वारंवार होणा-या शस्त्रसंधी उल्लंघनावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘चाय पे चर्चा’ वगैरे करून पाकिस्तानचे वाकडे शेपूट सरळ होणार नाही, असे सामना संपादकीयमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणा-या गोळाबारात भारतीय जवान शहीद असल्याने उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.पाकिस्तानी भूत ‘बातों से नहीं लातों से’ ठिकाणावर येणारे आहे. ‘चाय पे चर्चा’ वगैरे करून त्यांचे वाकडे शेपूट सरळ होणार नाही. पाकिस्तान जर शस्त्रसंधीचा करार हवा तेव्हा मोडत असेल तर त्या कागदांची फिकीर आपण तरी का करायची?, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत
- काय आहे आजचे सामना संपादकीय?जम्मू-कश्मीर सीमेवरील पाकडय़ांच्या कुरापती थांबण्याची चिन्हे नाहीत. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करणे हा तर जणू ते त्यांचा ‘हक्क’च समजू लागले आहेत. सीमेपलीकडून पाकिस्तानी सैन्याने बुधवारी पुन्हा एकदा गोळीबार केला. त्यात महाराष्ट्रातील संभाजीनगरचे जवान किरण थोरात शहीद झाले. पूंछ आणि राजौरी जिह्यांत पाकिस्तानी सैन्याने हा हल्ला केला. उखळी तोफा, रायफली आणि छोट्या शस्त्रांचा वापर करण्यात आला. त्यात किरण थोरात गंभीर जखमी झाले आणि नंतर उपचारादरम्यान त्यांना वीरमरण प्राप्त झाले. दोन दिवसांपूर्वीही पाकिस्तानने याच पद्धतीने राजौरी भागातच गोळीबार केला होता. त्यात विनोद सिंह आणि जाकी शर्मा हे दोन जवान शहीद झाले. आठ दिवसांपूर्वी कृष्णा घाटी परिसरात पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यात महाराष्ट्रातील परभणीच्या शुभम मुस्तापुरे यांनी हौतात्म्य पत्करले होते. आता मराठवाड्यातीलच वैजापूर तालुक्यातील फकिराबादवाडीचे किरण थोरात शहीद झाले आहेत. किती दिवस पाकड्यांचा हा मस्तवालपणा आपण सहन करणार आहोत? आमच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे सर्व नियम पाळायचे.
कोणतीही कुरापत काढायची नाही. पाकिस्तानने मात्र त्यांच्या मनात येईल तेव्हा शस्त्रसंधीचे बंधन एकतर्फी झुगारून द्यायचे, गोळीबाराच्या फैरी झाडायच्या. पुन्हा हिंदुस्थानी सैनिकांच्या चौक्यांबरोबरच नागरी वस्त्यांनाही सोडायचे नाही. निरपराध नागरिकांचे बळी घ्यायचे. पाकिस्तानच्या या कुरापतींना आपले जवान चोख प्रत्युत्तर देतात हे खरे असले तरी केंद्रात बसलेले सत्ताधारी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना चोख उत्तर कधी देणार हा खरा प्रश्न आहे. ते दिले जात नाही तोपर्यंत जवान आणि निरपराध नागरिकांच्या रक्ताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ‘लाल’ होतच राहील. पाकिस्तान शस्त्रसंधी पाळत नाही, सीमेवर गोळीबार करतो, जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवतो. हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांविरोधात स्थानिक नागरिकांना भडकवतो. महाविद्यालयांतील तरुण-तरुणींना सैनिकांवर दगडफेक करायला लावतो. हिंदुस्थानी सैन्याने मागील वर्ष-सवा वर्षात दीडशेपेक्षा जास्त दहशतवाद्यांचा जम्मू-कश्मीरमध्ये खात्मा केला हे खरे असले तरी सीमेवर पाकिस्तान आणि जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी यांचा उच्छाद सुरूच आहे. त्यात सीमावर्ती गावांमधील नागरिकांसाठी ‘बंकर्स’ बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
पाकिस्तानने जम्मू-कश्मीर सीमा ‘युद्धक्षेत्र’ बनवले आहे असाच त्याचा अर्थ. प्रामुख्याने ज्या राजौरी, पूंछ, कठुआ भागांत जवळजवळ १३ हजार बंकर्स बांधले जाणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे ठीक आहे, पण पाकिस्तान शस्त्रसंधीची जी सर्रास विटंबना करीत आहे ती पूर्णपणे थांबवणे हाच सीमेवरील शांतता आणि सुव्यवस्थेचा खरा उपाय आहे. पाकिस्तानी भूत ‘बातों से नहीं लातों से’ ठिकाणावर येणारे आहे. ‘चाय पे चर्चा’ वगैरे करून त्यांचे वाकडे शेपूट सरळ होणार नाही. पाकिस्तान जर शस्त्रसंधीचा करार हवा तेव्हा मोडत असेल तर त्या कागदांची फिकीर आपण तरी का करायची? शस्त्रसंधी हा दोन देशांतील सामोपचार म्हणूनच पाळला जायला हवा. मात्र एकाने हे बंधन पाळायचे आणि दुसऱ्याने ते सर्रास झुगारून द्यायचे असे कसे चालेल? त्यातही समोर जेव्हा पाकिस्तानसारखे शत्रुराष्ट्र असेल तर ‘शस्त्र हीच संधी’ असाच विचार राज्यकर्त्यांनी करायला हवा. पाकिस्तान नेमके तेच करीत आहे. प्रश्न आहे आमच्या राज्यकर्त्यांचा. ते हा विचार करीत नाहीत म्हणून किरण थोरात हा आणखी एक जवान हुतात्मा झाला. शस्त्र आणि संधी एकत्रित साधण्याची इच्छाशक्ती आमचे सत्ताधारी जोपर्यंत दाखविणार नाहीत तोपर्यंत पाकिस्तान कागदी शस्त्रसंधीच्या चिंधड्या उडविण्याचे दुस्साहस करीतच राहील.