ज्याने त्याने विकासाच्या भुताटकीचा शोध घ्यावा, राज्यातील विकासकामांवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 07:53 AM2018-03-27T07:53:38+5:302018-03-27T07:53:38+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विकासकामांच्या अंमलबजावणीवरुन भाजपाला टोला हाणला आहे.

Uddhav Thackeray Criticize the BJP government over development works in the state | ज्याने त्याने विकासाच्या भुताटकीचा शोध घ्यावा, राज्यातील विकासकामांवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

ज्याने त्याने विकासाच्या भुताटकीचा शोध घ्यावा, राज्यातील विकासकामांवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विकासकामांच्या अंमलबजावणीवरुन भाजपाला टोला हाणला आहे. ''नागपुरात अत्याधुनिक पोलीस भवन निर्माण करण्यासाठी मंत्रालयातून निधी आणण्याचे कठीण काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांनी करून दाखवल्याबद्दल गडकरींनी त्यांचे अभिनंदन केले. आम्हीसुद्धा आनंद व्यक्त करीत आहोत. काही झाले तरी विकासाचे भूत जिवंत ठेवायला हवे. पुन्हा भूत अदृश्य असते. त्यामुळे ज्याने त्याने या विकासाच्या भुताटकीचा शोध घ्यावा असाच एकंदर सरकारी अंमलबजावणीचा कारभार दिसतो'', अशा उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला हाणला आहे. 
 
- काय आहे आजचे सामना संपादकीय?

नितीन गडकरी हे दिलखुलास बोलतात. त्यामुळेच कदाचित गडकरी हे फाटक्या तोंडाचे आहेत असा आरोप त्यांच्याविषयी केला जातो, पण ते अनेकदा परखडपणे बोलतात व त्यांच्या परखड फटकेबाजीतून भाजपमधील आप्तस्वकीयसुद्धा सुटले नाहीत. गडकरी यांनी आता असे सांगितले आहे की, ‘विकासाच्या चालत्या गाडीत खिळे कसे घुसवायचे याचे एक्सपर्ट महाराष्ट्राच्या मंत्रालयात बसले आहेत.’ गडकरी यांनी एक प्रकारे महाराष्ट्रातील नोकरशाहीवर हल्लाबोल केला आहे. राज्याचा विकास लाल फीतशाहीच्या फासात गुदमरला आहे असे गडकरी यांनी सांगितले. म्हणजे त्यांना असे सुचवायचे आहे काय, की महाराष्ट्राचा विकास मंदावला आहे व नोकरशाहीच्या घोड्य़ावर मुख्यमंत्र्यांची मांड मजबूत नाही. नागपुरातील एका भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गडकरी यांनी हे सांगितले. गडकरी यांनी सरकारी बाबूंवर हल्लाबोल करून खळबळ उडवली असली तरी राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रात युती सरकारच्या काळात मंत्री म्हणून चोख काम केले. त्यांच्या काळात महाराष्ट्रातील रस्ते व दळणवळणाची कामे पुढे गेली. 
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसारखे प्रकल्प वेगाने पुढे सरकले. कारण नोकरशाहीचे फालतू लाड करू नका अशी सक्त ताकीदच शिवसेनाप्रमुखांनी दिली होती. त्यामुळे शिवशाही प्रकल्पांतर्गत चाळीस लाख झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याची योजना असेल नाही तर मुंबईतील ५५ पुलांचे व एक्सप्रेस वेचे काम असेल, ही सगळी कामे वेगाने पुढे सरकली. विकासाच्या चालत्या गाडीत खिळे घुसवणारे तेव्हाही होते. हे खिळे घुसण्याआधीच मंत्रालयातून बाहेर काढण्याचे काम तेव्हा बेडरपणे झाले. सरकारी बाबू काम करीत नाहीत म्हणून विकासाची गाडी अडकली हे खापर फोडणे सोपे आहे, पण खिळे धाडसाने बाहेर काढणे व विकासाचा रथ पुढे नेणे हे हिंमतबाज प्रशासकाचे कसब आहे. सध्याचे सरकार हे फक्त घोषणा करणारे आहे, घोषणांची अंमलबजावणी करणारे नाही, असे आम्ही म्हणतोय त्यामागचा संताप म्हणूनच समजून घ्या. गेल्या तीन वर्षांत केलेल्या असंख्य घोषणांना पाय फुटले नाहीत व त्या घोषणा हवेत विरल्या किंवा सरकारी कागदावर पडून राहिल्या. मंत्रालयातील ते कागदही उंदरांनी कुरतडले आहेत. महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे व कर्जाचा डोंगर राज्याच्या डोक्यावर वाढतो आहे. त्यामुळे विकासकामांसाठी पैसा आणायचा कोठून? याचे मार्ग सरकारी बाबूंना सापडत नाहीत. 
त्यामुळे ते ‘खिळे’ ठरले असतील तर बरोबर नाही. नागपुरात अत्याधुनिक पोलीस भवन निर्माण करण्यासाठी मंत्रालयातून निधी आणण्याचे कठीण काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांनी करून दाखवल्याबद्दल गडकरींनी त्यांचे अभिनंदन केले. या सहा मजली इमारतीसाठी ८९ कोटी रुपये खर्च येईल. आता सामान्यांच्या मनातील भाबडा प्रश्न इतकाच की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची व नागपूरच्याच पालकमंत्र्यांची त्यांच्याच शहरातील पोलीस मुख्यालयासाठी निधी (रु. ८९ कोटी फक्त) मिळवताना इतकी दमछाक होत असेल तर इतर लोकप्रतिनिधी किंवा सामान्य जनांचे काय हाल तुमच्या मंत्रालयात होत असतील, धर्मा पाटील यांच्यासारखे अन्यायग्रस्त शेतकरी मंत्रालयात विष पिऊन मरतात, का तर, त्यांच्या जमिनीस मोबदला देण्यास सरकार तयार नव्हते. इतर अनेक जण आत्मदहनाचा प्रयत्न करतात तर काही सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीव देतात. मुख्यमंत्र्यांनी नागपूरसाठी ८९ कोटी मिळवले हे साहसाचेच काम आहे. फक्त हे ८९ कोटी रुपये मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची त्यांच्याच मंत्रालयात दमछाक झाली. महाराष्ट्राच्या विकासाची ‘गती’ काय ते येथे स्पष्ट झाले. गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलेच आहे. आम्हीसुद्धा आनंद व्यक्त करीत आहोत. काही झाले तरी विकासाचे भूत जिवंत ठेवायला हवे. पुन्हा भूत अदृश्य असते. त्यामुळे ज्याने त्याने या विकासाच्या भुताटकीचा शोध घ्यावा असाच एकंदर सरकारी अंमलबजावणीचा कारभार दिसतो.

Web Title: Uddhav Thackeray Criticize the BJP government over development works in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.