नाणारचा प्रकल्प जहर, तो लादणे म्हणजे आणीबाणी लादण्यासारखे - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 07:48 AM2018-06-29T07:48:47+5:302018-06-29T07:52:30+5:30
नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपामधील संबंध ताणले गेल्याचे दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन भाजपाला इशारा दिला आहे.
मुंबई - नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपामधील संबंध ताणले गेल्याचे दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन भाजपाला इशारा दिला आहे. ''कोकणातील शेती, फळबागा हा रोजगार आहे. त्या सगळ्याचे थडगे बांधून कोणत्या रोजगाराची निर्मिती भाजप सरकार करणार आहे? कोकणची जनता सुखी आहे. त्यांच्या सुखात विष कालवू नका. तसा प्रयत्न कराल तर कोकणातच नव्हे तर संपूर्ण राज्यात माती खायला लावू, हा आमचा शब्द आहे. नाणारचा प्रकल्प हे जहर आहे. तो लादणे म्हणजे आणीबाणी लादण्यासारखे आहे. लादून बघाच, हे आमचे आव्हान आहे!!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडत सामना संपादकीयमधून इशारा दिला आहे.
- काय आहे आजचे सामना संपादकीय?
पंतप्रधान मोदी यांनी फक्त केंद्रातलेच नव्हे तर राज्याराज्यांतील ‘पर्यावरण’ खाती आता कायमचीच बंद करायला हवीत. पर्यावरण स्वयंसेवकांनी, जनतेने निसर्ग आणि पर्यावरण रक्षणासाठी मर मर मरायचे आणि केंद्रातील उपटसुंभांनी पर्यावरणाचा खून करणारे विषारी रासायनिक प्रकल्प जनतेच्या छाताडावर आणायचे. त्यामुळे ‘पर्यावरण प्रेम’ हे एक ढोंगच ठरले आहे व नाणारच्या विषारी प्रकल्पाने केंद्राचे हे ढोंग पुन्हा उघडे पडले आहे. रत्नागिरीतील आंबा, फणस, काजू, शेतजमिनी, समुद्र, नद्या, मासेमारी यांचा विनाश करणारा हा प्रकल्प आहे. या भकभकणाऱ्या विषप्रकल्पामुळे लोकांना कॅन्सर, दमा व इतर छातीच्या विकारांना सामोरे जावे लागेल. कोकणातील स्वच्छ हवा आणि पाण्याचे विषात रूपांतर करणाऱ्या प्रकल्पास जनतेचा विरोध असतानाही तो लादला जात असेल, जनतेचा विरोध पायदळी तुडवला जात असेल तर ही आणीबाणी आहे. मोदी-फडणवीस सरकारची हुकूमशाही आहे. अशी हुकूमशाहीच करायची असेल तर या मंडळींचे आणीबाणीच्या विरोधात ४३ वर्षे बोंबलण्याचे सर्व ढोंगच होते. हिटलरने लाखो ज्यूंची कत्तल करून जगाचा थरकाप उडवला तसे आमच्या कोकणी बांधवांना त्यांच्या घरादारांसह, शेतजमिनीसह विषारी गॅस चेंबरमध्ये मारण्याचा हा कट आहे. ‘नाणार’ हे कोकणचे ‘गॅस चेंबर’ होईल म्हणून आमचा विरोध आहे आणि राहणार. नाणार ग्रामस्थांचा विरोध असेल तर रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही हा मुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द होता. नाणार पंचक्रोशीतील एकजात सर्व ग्रामपंचायतींनी हा विषारी प्रकल्प नको असे बहुमताचे ठराव मंजूर केले व मुख्यमंत्र्यांच्या हातात सोपवले.
लोकशाहीत बहुमताचा आदर राज्यकर्ते करणार नसतील तर ती हुकूमशाहीच मानायला हवी. देशाचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान हे दिल्लीत बसून त्या नाणार प्रकल्पाच्या रिफायनरीबाबत सामंजस्य करार करतात व नंतर समर्थनासाठी मुंबईकडे धावतात. हा विश्वासघात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जीवितास धोका असल्याची अफवा पसरताच त्यांच्या जिवाच्या रक्षणासाठी कठोर उपाय लगेच योजले जातात. त्यांना केंद्रातले मंत्री, भाजपचे पदाधिकारी, बडे नोकरशहादेखील आता भेटू शकणार नाहीत. कोणीही त्यांना दगाफटका करू शकतो, पण नाणारच्या लाखो शेतकऱ्यांचे जीव किडय़ामुंग्यांइतकेही महत्त्वाचे नाहीत. त्यांनी विषारी धुराने आणि पाण्याने गुदमरून मरायचे असे सरकारने ठरवले आहे. लोकशाहीत प्रजा मेली तरी चालेल, पण लोकांनीच सिंहासनावर बसवलेला ‘राजा’ जगलाच पाहिजे. कश्मीरात आमचे सैन्य मरत आहे. कोकणात शेतकरी मारला जात आहे. ‘जय जवान, जय किसान’चा हा मृत्यू आहे. कोकणातील शेतकऱ्यांचा विरोध डावलून सरकार नाणारचा विषारी प्रकल्प कोणाच्या भरवशावर आणणार आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोकणातील शेतकऱ्यांचा विरोध रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करणार आहेत काय? सरकारने हा नराधमी प्रयोग करून पाहावाच.
तुमच्या बंदुका व गोळ्या कमी पडतील, पण आंदोलक कमी पडणार नाहीत. नाणारचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर नेला जाईल अशा धमक्या मुख्यमंत्री देतात. हा त्यांच्या मनाचा आणि नेतृत्वाचा खुजेपणा आहे. रिफायनरी प्रकल्प विदर्भात न्या असे तेथील सर्वच लोकप्रतिनिधींनी सुचवले. त्याचा विचार करा. असे प्रकल्प फक्त समुद्रावरच होतात हा समज चुकीचा आहे. कोकणचा निसर्ग मारू नका. पर्यावरण नासवू नका. सौदी अरेबिया आणि हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा नाणार प्रकल्प कसा देशाची इंधनाची आणि इतर औद्योगिक गरजा पूर्ण करणारा आहे याचे ढोल पिटले जात आहेत. या प्रकल्पाचा खर्च अंदाजे तीन लाख कोटी एवढा अपेक्षित आहे. २०२२ पर्यंत तो पूर्ण झाल्यावर दिवसाला १२ लाख बॅरल म्हणजे एका वर्षात ६ कोटी टन तेलशुद्धीकरण केले जाईल असेही सांगण्यात येत आहे. पुन्हा रिफायनरी प्रकल्पाने रोजगार वाढेल अशा थापादेखील मारल्या जात आहेत. मात्र कोकणला तुमच्या रोजगाराची गरज नाही. कोकणातील शेती, फळबागा हा रोजगार आहे. पर्यटन हा मोठा व्यवसाय आहे. त्या सगळ्याचे थडगे बांधून कोणत्या रोजगाराची निर्मिती भाजप सरकार करणार आहे? नाणारची वीट रचणे म्हणजे कॅन्सर इस्पितळाची पायाभरणी आहे. कोकणची जनता सुखी आहे. त्यांच्या सुखात विष कालवू नका. तसा प्रयत्न कराल तर कोकणातच नव्हे तर संपूर्ण राज्यात माती खायला लावू, हा आमचा शब्द आहे. नाणारचा प्रकल्प हे जहर आहे. गॅस चेंबर आहे. तो लादणे म्हणजे आणीबाणी लादण्यासारखे आहे. लादून बघाच, हे आमचे आव्हान आहे!!