मुख्यमंत्र्यांच्या सर्व मुलाखती म्हणजे ‘विकास गांडो थयो छे’ची पुढील आवृत्ती - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 07:46 AM2017-10-31T07:46:58+5:302017-10-31T08:30:53+5:30
विकासाला खीळ घालण्याइतके ‘बालिश’ राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही. ज्यांनी ते केले त्यांच्या कर्माची फळे महाराष्ट्राची जनता भोगत आहे. तरीही आम्ही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहोत! जमतंय का बघा. नाहीतर सोडून द्या. समझनेवालों को इशारा काफी है! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत
मुंबई - फडणवीस सरकारला तीन वर्ष पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतोय. त्याची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यांना कर्जमाफी द्या व कर्जमाफीची घोषणा करून तोंडाला पाने पुसू नका, असे ओरडून सांगणे यास मुख्यमंत्री विकासाला खीळ घालणे असे समजत असतील तर सरकारच्या डोक्यात ‘खिळा’ ठोकावाच लागेल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. विकासाला खीळ घालण्याइतके ‘बालिश’ राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही. ज्यांनी ते केले त्यांच्या कर्माची फळे महाराष्ट्राची जनता भोगत आहे. तरीही आम्ही देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देत आहोत! जमतंय का बघा. नाहीतर सोडून द्या. समझनेवालों को इशारा काफी है! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
महाराष्ट्रातील फडणवीस सरकारला तीन वर्षे झाली आहेत हे सरकारने वृत्तपत्रात दिलेल्या लाखो रुपयांच्या जाहिरातींवरून समजले. सरकारला तीन वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी मोठय़ा मुलाखती दिल्या आहेत. त्यात सरकारी ध्येयधोरणे, भविष्याचा दृष्टिकोन यावर बोलण्यापेक्षा शिवसेनेवर टीका करून व धमक्या देऊन तिसरा वाढदिवस साजरा करायचा असे ‘सरकार’ म्हणविणा-यांनी ठरवलेच असेल तर आम्ही त्यांना त्या कामीही शुभेच्छाच देत आहोत. वाढदिवसाच्या दिवशी तरी शुभ बोलावे असे हिंदुत्वाचे रीतिरिवाज व संस्कृती आहे व संघ परिवारात पालन-पोषण झालेल्यांनी तरी या संस्कृतीचे भान राखायला हवे, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीवर, अखंडतेवर आणि स्वाभिमानावर तुळशीपत्र ठेवून कुणाला राज्य करायचेच असेल तर तो त्यांचा दोष आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सर्व मुलाखती म्हणजे ‘विकास गांडो थयो छे’ची पुढील आवृत्ती दिसत आहे. राज्यातील जनता सुखी नाही, त्यांच्या मनात राज्यकर्त्यांविषयी अस्थिरता व अस्वस्थता आहे. विकासाचे नाव नाही आणि याचे खापर मुख्यमंत्री फक्त शिवसेनेवर फोडत असतील तर विकासच नाही तर राज्यकर्त्यांच्या मानेवरील खोपडीचेही ‘गांडो थयो छे!’ असे म्हणावे लागेल अशा शेलक्या शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.
शिवसेनेने विकासाला खीळ घातली असे मुख्यमंत्री सांगतात. मग शिवसेना विकासाला खीळ घालत असताना मुख्यमंत्री म्हणून आपण काय करीत होता? राज्याच्या विकासाला खीळ घालणारे कोणीही असोत, त्यांच्या वा-यालाही मुख्यमंत्र्यांनी उभे राहू नये असे आमचे स्पष्ट मत आहे. आधीच्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घातली. आधीचे सरकार भ्रष्ट व नालायक होते. आधीचे सरकार कोडगे होते. त्यांच्याकडून काही भले होईल अशी अपेक्षा जनतेला नव्हती, असे तिसऱया वाढदिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मग अशा कोडग्या, नालायक, भ्रष्ट लोकांबरोबर तुमचे सध्या कसले ‘गुलूगुलू’सुरू आहे? याच कोडग्या, भ्रष्ट, नालायक लोकांना हाताशी धरून बंद दाराआड व पडद्यामागे शिवसेनाविरोधी कारस्थाने चालणार असतील तर त्या बंद दारास बाहेरून कडीकुलूपे लावून आत कोंडून गुदमरून टाकण्याची हिंमत शिवसेनेत आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
नोटाबंदीनंतर बेरोजगारीत वाढ झाली. ‘जीएसटी’नंतर महागाई भडकली. समृद्धी महामार्गाच्या अट्टहासानंतर शेतकऱयांच्या बागायती पिकाऊ जमिनीवर सरकारी बुलडोझर फिरत असताना शेतकऱयांच्या आक्रोशाने ज्या राज्यकर्त्यांच्या कानाचे पडदे फाटत नसतील त्यांना जनतेचे ‘मायबाप’ म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी फक्त खुर्च्याच उबवाव्यात व जनतेसाठी भांडणाऱया शिवसेनेच्या विरोधात कारस्थाने करावीत. सत्तेचा वापर हा कमीत कमी राजकारणासाठी व जास्तीत जास्त लोककल्याणासाठी करावा असे संकेत आहेत, पण तीन वर्षांत असे काही घडले आहे काय? शेती, उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास, कौशल्य विकास, रोजगार, थेट परदेशी गुंतवणूक, शिक्षण, महिला व बालविकास, कायदा व सुव्यवस्था अशा सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षांत उत्तम कामगिरी बजावल्याचे‘धाडसी’ विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शासकीय निवासस्थानी बसून अशी विधाने होतच असतात. हे सर्व तीन वर्षांत झाले असेल तर शिवसेनेने विकासाला खीळ घातली हे तुम्ही कोणत्या तोंडाने सांगत आहात? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
एक तर विकासाची एकही वीट शिवसेनेच्या विरोधामुळे रचली गेली नाही किंवा तुम्ही शिवसेनेबाबत सपशेल खोटे बोलत आहात. महाराष्ट्राला नको असलेल्या बुलेट ट्रेनसाठी कर्जबाजारी महाराष्ट्राने ३०-३५ हजार कोटी द्यावेत हा आतबट्टय़ाचा व्यवहार आहे व रेल्वे अपघातात रोज मरणा-या असंख्य मुंबईकरांचा अपमान आहे. मात्र लोकल गाडय़ांची सुरक्षा वाऱयावर सोडून बुलेट ट्रेनला विकास मानणे ही तुमची घोडदौड आहे आणि त्यास लगाम घालणे हे महाराष्ट्रहित आहे. शिवसेनेने नेहमी महाराष्ट्रहितालाच प्राधान्य दिले आहे आणि महाराष्ट्राचे अहित होत असेल तर डोळे मिटून गप्प बसणाऱयांपैकी शिवसेना नक्कीच नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समजूतदार आहेत. मात्र शेवटी स्वतःच्या पक्षापुढे ते कदाचित मजबूर आहेत. अर्थात ते मजबूर असतील; आम्ही मजबूर नाहीत. उद्याच्या निवडणुकांत कोणी कोणाबरोबर राहायचे हा तुमचा विषय आहे. शिवसेना नसली तरी सरकार वाचविण्यासाठी सिंचन घोटाळावाल्यांचे समर्थन घेण्याची तुमची तयारी झालीच आहे. मुंबईसारख्या ‘मराठी’ राजधानी शहराचे महापौरपद विकत घेण्याची बोली लावणारे आपण. तुमच्या कर्तृत्वाने राज्य उजळून काढण्याची संधी जनतेने व शिवसेनेने तुम्हाला दिलीच होती. हे राज्य पुढे जावे, लोकांना अच्छे दिन निदान महाराष्ट्रात तरी यावेत या एका दिलदार भावनेनेच आम्ही तुमच्या खुर्च्यांना बळ दिले, पण खुर्च्यांवरील माणसांपेक्षा त्यातील ढेकणं बरी असे म्हणण्याची वेळ लोकांवर आली असेल तर त्यास शिवसेना जबाबदार नाही.