मतांच्या लाचारीपोटी मराठीचा बळी, विधिमंडळातील गुजराती अनुवादावर उद्धव ठाकरे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 07:40 AM2018-02-27T07:40:07+5:302018-02-27T07:40:07+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांंनी पुन्हा एकदा भाजपा सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

Uddhav Thackeray criticize on governor c vidyasagar rao speech issue in vidhansabha | मतांच्या लाचारीपोटी मराठीचा बळी, विधिमंडळातील गुजराती अनुवादावर उद्धव ठाकरे यांची टीका

मतांच्या लाचारीपोटी मराठीचा बळी, विधिमंडळातील गुजराती अनुवादावर उद्धव ठाकरे यांची टीका

Next

मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभच वादळी झाला. सोमवारी (26 फेब्रुवारी ) राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी मराठी अनुवादक नसल्यामुळे इंग्रजीतून भाषण ऐकावे लागले. सरकारने मराठी भाषेचा खून केल्याचा आरोप करत, विरोधकांनी अभिभाषणावर बहिष्कार टाकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे.

''मराठी अनुवादकास सुरक्षारक्षकांनी पायरीवर अडवल्याने राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद झाला नाही व राज्यपालांचे इंग्रजी भाषण अनेकांच्या डोक्यावरून गेले. या चुकीला माफी नाही, पण तरीही मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. निदान ‘मराठी’ अस्मितेच्या बाबतीत तरी मुख्यमंत्र्यांवर असे प्रसंग येऊ नयेत. राज्यकारभार किती ढिसाळ, गचाळ व बेफिकिरीने सुरू आहे त्याचाच हा उत्तम नमुना'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

राज्याचे काय होणार?
महाराष्ट्रात सध्या जो तमाशा सुरू आहे तो पाहून संयुक्त महाराष्ट्राचे १०५ हुतात्मेही स्वर्गात अस्वस्थ झाले असतील. रोजच आमच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे धिंडवडे निघत आहेत व विद्यमान सत्ताधारी त्यावर रंगसफेदी करीत आहेत. नगरचे उपमहापौर छत्रपती शिवरायांच्या बाबतीत अपशब्द वापरतात. त्यानंतर गदारोळ होतो व उपमहापौर छिंदम यांची हकालपट्टी होते. आता तर छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना दयामाया नाही. छिंदम प्रकरणात जशी लपवाछपवी आणि बनवाबनवी झाली तशीच एक बनवाबनवी मराठी भाषेच्या संदर्भात सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी सुरू झाले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे भाषण इंग्रजीत सुरू होताच त्याचा मराठी अनुवाद ऐकण्यासाठी आमदारांनी टेबलावरचे ‘इअर फोन’ कानास लावले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवादच ऐकू येत नव्हता. ऐकू येईल तरी कसा? कारण त्यासाठी नेमलेला अनुवादक जागेवर पोहोचलेलाच नव्हता. त्यासाठी जे कोणी जबाबदार असतील ते असतील, पण मराठी राज्यातच राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद न होण्याचा लाजिरवाणा प्रकार राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला. अर्थात हा अनुवाद गुजरातीत सुरू होता असा जो आरोप केला जातोय तो खरा नाही. मात्र मराठी अनुवादक पोहोचले नाहीत, आमदारांची गैरसोय झाली आणि महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकेल असा प्रकार घडला हे सत्य आहे. संपूर्ण राज्याचे इंग्रजीकरण झाले व ‘मराठी’त अनुवाद झाला नाही तरी कोण विचारतेय, या एका बेफिकिरीतून हा प्रकार घडला आहे.

मराठी राजभाषेची ही अवहेलना आहे व झाल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागितली आहे. दोषींवर कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले. पण मराठी भाषा व महाराष्ट्र अस्मितेच्या बाबतीतच असे ‘दोष’ का निर्माण होतात? कधी कोणी येडबंबू महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा करतो व सरकार त्यावर मूकबधिर होते. कुणी शिवरायांची निंदा करतो. आता राज्यपालांचे भाषण मराठीत अनुवाद करण्यातही अडथळे येऊ लागले आहेत. सरकारात मराठीविषयी निराशा व अनास्था असल्यामुळेच मराठीद्रोह्य़ांचे फावते. राज्यकर्त्यांनाच स्वभाषा आणि स्वराष्ट्राविषयी अभिमान नसेल तर ही बाब गंभीर आहे. मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या राजधानीत ‘मराठी’पण टिकवून ठेवण्यासाठी शिवसेना कसोशीने प्रयत्न करीत आहे; पण विधानसभा, महानगरपालिकांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपसह इतर राजकीय पक्ष मराठी विरुद्ध अमराठी असा तंटा निर्माण करीत असतात. मराठी मतांत फूट पाडून अमराठी मतांच्या बळावर मुंबईतील निवडणुका जिंकण्याचा अघोरी प्रयोग गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी मराठी स्वाभिमानाचा बळी दिला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठी राज्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे मराठी भाषा व मराठी हितास प्राधान्य देणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. पण मुख्यमंत्री मुंबईतील अनेक जाहीर कार्यक्रमांतून मराठीत बोलण्याचे टाळतात व स्वतःला ‘राष्ट्रीय’ व ‘सर्वभाषिक’ नेता म्हणून हिंदीत बोलण्याचा अट्टहास धरतात. पंतप्रधान मोदी हे अनेकदा महाराष्ट्रात येतात व भाषणाची सुरुवात मराठीत करतात. प्रत्येक राज्याला आपापल्या राजभाषेचा मान राखावाच लागेल. आम्ही दक्षिणेतील राज्यांप्रमाणे अतिरेकी भाषाभिमान बाळगत नाही. मराठीचा अभिमान बाळगताना इतर भाषांचा द्वेष करणारे आम्ही नव्हेत.

आम्ही राष्ट्रधर्म मानतो; पण शेवटी महाराष्ट्र धर्म हा आहेच. महाराष्ट्र धर्माचा बळी देऊन राष्ट्राला उभारी घेता येणार नाही. मुंबईत मराठीचा जोर नेहमीच कायम राहील. कोणी कितीही कारस्थाने केली तरी शिवसेना त्या मराठीद्वेष्ट्य़ांना आडवे करून मराठीचा झेंडा फडकवतच ठेवील. मतांच्या लाचारीपोटी मराठीचा बळी देणाऱ्यांनाच एक दिवस महाराष्ट्राची जनता पायदळी तुडवील. महाराष्ट्राला शिवरायांच्या स्वाभिमानी बाण्याची परंपरा आहे. त्या स्वाभिमानी बाण्याची तलवार लखलखत ठेवण्याचे काम शिवसेना पन्नास वर्षांपासून करीत आहे. आजन्म करीत राहील. दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे ‘हेडक्वार्टर’ उभे राहिले ते फक्त सोळा महिन्यांत; पण महाराष्ट्रात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक रखडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचेही काय होणार ते कळायला मार्ग नाही. त्याचवेळी कुणी इथे मराठी भाषा व महाराष्ट्राच्या अस्मितेचे थडगे उभारणार असेल तर त्या थडग्यांत मराठी दुश्मनांच्या गोवऱ्याच जातील. मराठी भाषा दिवस साजरा होत असताना आम्ही हे वचन मराठीजनांना देत आहोत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायरीवर आज मराठी भाषा अडखळली. मराठी अनुवादकास सुरक्षारक्षकांनी पायरीवर अडवल्याने राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद झाला नाही व राज्यपालांचे इंग्रजी भाषण अनेकांच्या डोक्यावरून गेले. या चुकीला माफी नाही, पण तरीही मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. निदान ‘मराठी’ अस्मितेच्या बाबतीत तरी मुख्यमंत्र्यांवर असे प्रसंग येऊ नयेत. राज्यकारभार किती ढिसाळ, गचाळ व बेफिकिरीने सुरू आहे त्याचाच हा उत्तम नमुना. ‘जय महाराष्ट्र’तून मराठीस वगळले तर काय होणार? मराठी भाषा दिवस हा एक सरकारी उपचार ठरू नये.

Web Title: Uddhav Thackeray criticize on governor c vidyasagar rao speech issue in vidhansabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.