Join us

...त्यामुळे संघाला बाळासाहेब पेलले नसावेत, उद्धव ठाकरेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2018 7:43 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना नागपुरातील कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण देण्यावरुन उद्धव ठाकरे यांनी आरएसएससहीत भाजपावर टीकेचे बाण सोडले आहेत.''संघ स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे मानतो, पण त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कधीच का बोलावले नाही हा एक प्रश्नच आहे. बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी, आरपार राष्ट्रभक्तीचे विचार संघाला पेलवले असते काय?'', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय,''प्रणव मुखर्जी यांना बोलावण्यामागे संघाचा तोच काहीतरी आडाखा असेल व तो जो काही अजेंडा असेल तो २०१९ च्या निवडणुकीनंतर उघड होईल. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार नाही असेच चित्र सध्या देशात आहे'', असा इशारादेखील दिला आहे. 

(प्रणवदांचा खरा राष्ट्रधर्म)- काय आहे आजचे सामना संपादकीय?राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर प्रणव मुखर्जी गुरुवारी गेले. त्यावरून बराच गदारोळ केला. काँग्रेसवाले मूर्ख म्हणून त्यांनी हा थयथयाट केला. मला काय बोलायचे ते नागपुरातच बोलेन असे दोन दिवसांपूर्वी प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. प्रणव मुखर्जी हे नागपुरात जाऊन काहीतरी बॉम्ब टाकतील असे वाटले होते, पण लवंगी फटाक्याचाही आवाज आला नाही. मुखर्जी यांचे नागपुरात जाणे जेवढे वाजले तेवढे संघ मंचावरील भाषण गाजले नाही. देशावर प्रेम करा. विविधतेचा आदर करा. गुण्यागोविंदाने राहा. एक देश, एक धर्म, एक भाषा ही संकल्पना बरी नसल्याचे त्यांनी सांगितले. धर्मनिरपेक्षताच देशाला तारेल असा काँग्रेजी विचारही त्यांनी छापील भाषणात मांडला व संघ स्वयंसेवकांनी त्यावर टाळय़ा वाजवल्या, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. प्रणवबाबूंनी देशात सुरू असलेल्या इतर गंभीर विषयांना स्पर्श करण्याचे टाळले. देशातील न्यायव्यवस्थेत जो असंतोष खदखदतो आहे त्यावर ते बोलले नाहीत. देशात महागाई आणि बेरोजगारीचा भडका उडाला आहे व सामान्य जनता त्यात मरत आहे. महागाई व बेरोजगारीचा वणवा विझवण्यात सरकारे कमजोर पडली आहेत. यावर एक अर्थतज्ञ म्हणून प्रणव मुखर्जी यांचे भाष्य अपेक्षित होते, पण मुखर्जी यांचे भाषण रेंगाळत राहिले. मुळात संघाने मुखर्जी यांना का बोलावले, त्यातून काय साध्य झाले, मुखर्जी यांनी नेमके

काय मार्गदर्शन केलेहे संघाचे प्रशिक्षण व बौद्धिक विभागाचे प्रमुखदेखील सांगू शकणार नाहीत. संघाच्या व्यासपीठावर अनेक महनीय (?) व्यक्तींना बोलवायची प्रथा आहे. प्रणव मुखर्जी हा त्याच परंपरेचा भाग आहे. संघ स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे मानतो, पण त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कधीच का बोलावले नाही हा एक प्रश्नच आहे. बाळासाहेबांचे प्रखर हिंदुत्ववादी, आरपार राष्ट्रभक्तीचे विचार संघाला पेलवले असते काय? ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशा घोषणेपुरतेच बाळासाहेबांचे हिंदुत्व मर्यादित नव्हते, तर अयोध्येतील कोसळलेल्या बाबरीची जबाबदारी घेऊन हिंदू डरपोक नाही, हिंदू आता मार खाणार नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. बाळासाहेब देवरस, रज्जूभय्या, सुदर्शनजी या सरसंघचालकांशी त्यांच्या गाठीभेटी झाल्या आहेत. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा छुपा अजेंडा राबवला नाही, तर वीर सावरकरांप्रमाणे त्यांनी उघडपणे हिंदुत्वाचा प्रसार व पुकार केला. हिंदुत्वाच्या अंगावर चाल करून येणाऱ्यांवर ते तुटून पडले. त्यामुळे संघाला बाळासाहेब पेलले नसावेत. प्रणवबाबू व इतरांना निवृत्तीनंतर अशा व्यासपीठांची गरज भासते व त्यानुसार ते गेले. दुसरे असे की, संघ व्यासपीठावर जाऊन तुम्ही तुमची मते मांडलीत तरी संघ न कुरकुरता ती स्वीकारतो. ते फक्त या घटनेचा भविष्यात वापर कसा करता येईल याचे आडाखे बांधत असतात. प्रणव मुखर्जी यांना बोलावण्यामागे संघाचा तोच काहीतरी आडाखा असेल व तो जो काही अजेंडा असेल तो २०१९ च्या

निवडणुकीनंतर उघडहोईल. त्यावेळी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळणार नाही असेच चित्र सध्या देशात आहे. तेव्हा लोकसभा त्रिशंकू राहिली व मोदी यांच्या पाठीशी इतर पक्ष उभे राहिले नाहीत तर प्रणव मुखर्जी यांना ‘सर्वमान्य’ म्हणून पुढे करून राष्ट्रीय सरकार बनवायचे असाही एक अजेंडा संघाच्या कार्यक्रमपत्रिकेवर असल्याचे दिल्लीत बोलले जाते. सध्या देशभरात रोजे-इफ्तार पाटर्य़ा जोरात सुरू आहेत. अशा इफ्तार पाटर्य़ांचे आयोजन काँग्रेसवाले करीत तेव्हा त्यांच्यावर मुस्लिम अनुनयाचा आरोप करीत ‘संघ’ परिवार टीका करीत असे. इफ्तार पाटर्य़ा हिंदुत्वाच्या संकल्पनेत बसत नाहीत असे ते म्हणत. आता संघही रोजे-इफ्तार पाटर्य़ांचे आयोजन करीत आहे व त्यासाठी सरकारी यंत्रणा व सरकारी गेस्ट हाऊसचा वापर होत आहे. मागे ‘‘संघ आता बदलला आहे,’’ असे एका समाजवादी नेत्याने सांगताच ‘‘संघ बदलला नाही, तर संघाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे,’’ असे उत्तर बाळासाहेब देवरसांनी दिले होते. संघ खरंच बदलला आहे हे आता पटू लागले. इफ्तार पाटर्य़ा जेव्हा काँग्रेसवाले देतात तेव्हा ती धर्मांधता व संघ देतो तेव्हा ती सहिष्णुता असे आपण सगळ्य़ांनी समजून घ्यायलाच हवे. एक धर्म, एक विचार, एक निशाण, एक भाषा वगैरे देशाची ओळख नव्हे, असे प्रणव मुखर्जी यांनी नागपुरात जाऊन सांगितले. संघाने टाळ्य़ा वाजवल्या. काँग्रेसवाले मूर्ख आहेत म्हणून त्यांनी नागपुरात जाण्यापासून प्रणवबाबूंना रोखण्याचा प्रयत्न केला. चला, हिंदुत्वाच्या नावानं चांगभलं!!

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणव मुखर्जी