“रामाचे नाव घेण्याची भाजपाची पात्रता नाही, श्रीरामांसारखे वागायचा प्रयत्न करा”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 17:39 IST2025-04-06T17:37:40+5:302025-04-06T17:39:38+5:30
Uddhav Thackeray News: भाजपाचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की सोयीप्रमाणे आहे? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“रामाचे नाव घेण्याची भाजपाची पात्रता नाही, श्रीरामांसारखे वागायचा प्रयत्न करा”: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray News: गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे सातत्याने भाजपावर टीका करताना पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक प्रश्नांवरून उद्धव ठाकरे आक्रमकपणे भूमिका मांडत असून, महायुती सरकारवर निशाणा साधत आहेत. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. यातच आता भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना उद्धव ठाकरे यांनी टोलेबाजी केली.
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाचा वर्धापन दिन तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे की सोयीप्रमाणे आहे? रामनवमी हा तुमच्या पक्षाचा जन्मदिवस असेल तर प्रभू रामचंद्र वागले असतील तसे वागण्याचा प्रयत्न करा. रामनवमी असल्याने वर्धापन दिन भाजपा साजरा करते आहे का? रामाच्या पावलावर पाऊल ठेवून चाला. भाजपाला शुभेच्छा देताना पुन्हा सांगतो की, प्रभू रामाप्रमाणे वागा. निवडणूक जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू असे सांगितले होते, शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल सांगितले होते, प्राण जाये पर वचन न जाए हे सांगण्याची गरज आहे. भाजपाने लोकांना फसवून मते घेतली. रामाचे नाव घेण्याची या लोकांची पात्रता नाही असे मला वाटते, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
मराठीबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे
मराठी बाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. चला मराठी शिकू या असा उपक्रम आम्ही सुरु केला आहे. ज्यांना राहायचं आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा. उत्तर भारतीयांना मराठी शिकवण्यासाठीचा हा उपक्रम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि मित्रांना देणार, पुढची पायरी ख्रिश्चन कमिटीकडे असेल. जैन बांधव, हिंदू देवस्थाने यांच्या जमिनीही हे लोक घेतील, हे मी आधीच बोललो होतो. कोणत्याही समाजाबाबत यांना प्रेम नाही. यांचे प्रेम फक्त मित्रांपुरते आहे. आमचा याचमुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे. तसेच आमची भूमिका आम्ही मांडली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वक्फ बोर्डावर आम्ही आमची भूमिका मांडली आहे. काँग्रेसला जायाचे असेल तर जाऊ द्या. आम्हाला जे सांगायचे होते ते मी सांगितले आहे. यापुढे जशी वेळ येईल, तेव्हा याबाबत बोलत राहीन, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. यानंतर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार वक्फ विधेयकाच्या मतदानावेळी उपस्थित नसल्याचे पाहायला मिळाले असून, आता दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी यावरून न्यायालयात जाण्यास नकार दिला आहे, यावरून महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.