Uddhav Thackeray Mumbai: मणिपूर हिंसाचारावरून देशभरातून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका करण्यात येत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार आणखी चिघळल्याचे सांगितले जात आहे. मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. अलीकडेच संतप्त जमावाने जवानांचा शस्त्रसाठाच पळवून नेल्याचे म्हटले जात आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
मुंबईतील रंगशारदा येथे शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेट पदाधिकाऱ्यांना संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी संबोधित केले. अख्खा भाजप जरी उभा राहिला तरी मला हरवू शकत नाही. ठाकरे नावाला इतिहास, माझ्यावर टीका करणाऱ्यांना कोणता इतिहास आहे, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. मी फक्त भाजपला सोडले आहे. हिंदुत्व सोडलेले नाही. भाजपमध्ये राम नाही, आहेत ते फक्त आयाराम. त्या आयारामांना घेऊन सत्ता स्थापन केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोण आला आणि कोण गेला, हे लिहिण्याचे फक्त मस्टर आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
हिंमत असेल तर मणिपूरमध्ये धिंड काढलेल्या महिलेकडून राखी बांधून घ्या
पंतप्रधान मोदी यांना एनडीएच्या खासदारांनी एक सल्ला दिला आहे. यावेळी मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घ्या, अशी विनंती केल्याची बातमी आहे. ही सामना वृत्तपत्राची बातमी नाही. सगळीकडे आली आहे. ला त्यांना सांगायचे आहे की, तुमच्यात हिंमत असेल तर मणिपूरमध्ये ज्या महिलेची धिंड काढली, तिच्याकडून राखी बांधून घ्या, बिल्किस बानोकडून राखी बांधून घ्या, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांना दिले. तसेच देशातील कोट्यवधी लोकांमधून एकच आमची ताई मोदींना सापडली, जिच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि तिच्याकडून राखी बांधून घेतली, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
दरम्यान, बुरसटलेल्या हिंदुत्वामुळे मी भाजपला सोडले, असे सांगताना, तुम्हाला मते द्यायची असतील तर द्या नाहीतर नका देऊ. केवळ मतांसाठी संभाजी ब्रिगेड असेल किंवा अन्य कुणी असतील, त्यांना जवळ करण्याचे काम केले जाणार नाही. तू जसा आहेस, तसा जनतेसमोर जा. केवळ आवडावा म्हणून चेहऱ्यावर मुखवटा घालून जाऊ नको, असे बाळासाहेबांनी मला सांगितले होते. आमचे हिंदुत्व मुखवट्याचे हिंदुत्व नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.