Uddhav Thackeray Vajramuth Sabha Mumbai Live: आता आपल्या सगळ्यांना शहाणे होण्याची वेळ आली आहे. नुसती वज्रमूठ करून उपयोग नाही. हा भगवा या वज्रमूठीत घट्ट धरायचा आहे. भगव्याला डाग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो साफ करून छत्रपती शिवरायांचा आणि हिंदुत्वाचा भगवा पुन्हा एकदा तेजाने उंच फडकवत ठेवायचा आहे. याची सुरुवात महापालिकेपासून करायची आहे. उद्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेतल्या तरी तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबईत आयोजित महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ते बोलत होते.
महाविकास आघाडीचे सरकार असताना मराठी भाषा सक्तीची केली होती. मात्र, सरकार पाडले, गद्दारी केली आणि तो निर्णयही त्यांनी फिरवला. हेच का तुमचे बाळासाहेबांचे विचार, कुठे आहेत बाळासाहेबांचे विचार, हीच तुमची वृत्ती असेल, तुम्हीच असे मराठी भाषेचे धिंडवडे काढणार असाल तर मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार तरी कोण, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. २०१४ साली सांगितले होते की अच्छे दिन येणार, आले का अच्छे दिन? आतापर्यंत हजारो -लाखो लोकांना नोकऱ्या मिळायला हव्या होत्या, दिल्या का नोकऱ्या? सत्तेत आल्यानंतर जातीय दंगली घडवायच्या, जातीय तणाव निर्माण करायचे. तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करायचा. रक्त सांडायचे. निवडणुका आल्या की पुन्हा काहीतरी थाप ठोकायची. पुन्हा निवडून यायचे, यामध्ये देशाची वाट लागतेय, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केली.
चांगल्या कामांना स्थगिती देण्याचे काम केले जातेय
लोकसंख्येच्या बाबतीत आपला देश जगात एक नंबरला आला आहे. लोकसंख्या वाढत जात आहे. त्यासाठी समुद्राच्या पाण्याचे निक्षारीकरण करून पिण्यायोग्य पाणी जनतेला देण्यासाठी चांगला प्रकल्प उभे करण्याचे निर्देश दिले होते. चेन्नईत अशा प्रकारचा प्रकल्प सुरू आहे. मात्र, मुंबईतील पायलट प्रकल्पाला बहुतेक स्थगिती दिली आहे. चांगल्या कामांना स्थगिती दिली जात आहे. आणि यांच्याशी लागेबांधे असणाऱ्यांना कंत्राटे दिली जात आहेत. मुंबई ओरबाडायचे काम केले जात आहे आणि लूट चाललेली आहे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
अदानींची चौकशी करूच नका, यांचे आत्मचरित्र शाळेच्या पुस्तकात द्या
मध्यंतरी सत्यपाल मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यावर काही बोलले जात नाही. अदानींवर चौकशीची मागणी केली जात असताना त्यावर काहीच बोलले जात नाही. माझे मत वेगळे आहे, अदानींची चौकशी करूच नका. लोकसंख्या एवढी वाढत चालली आहे. एक माणूस जर मेहनत करून एवढ्या वर जात असेल, तर त्यांचे संपूर्ण आत्मचरित्र हे शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात लावा. श्रीमंत कसे व्हायचे, याचे धडे मिळतील, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. अदानी व्हायचेय मला. आम्ही अडाणी आहोत, आम्हाला अदानी व्हायचेय आहे, अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.
दरम्यान, पुलवामा हल्ल्याबाबत बोलायला तयार नाही. चीनवाले आपल्या देशाचा भूगोल बदलू पाहत आहेत आणि आपले नाकर्ते सरकार देशाचा इतिहास बदलू पाहत आहेत. घडलेला इतिहास पुसून टाकत आहेत. अरे इतिहास पुसून टाकू नका, तुम्ही आधी इतिहास घडवा आणि मग तो लिहिला जाईल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. २०१४ मध्ये जाहिराती केल्या, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आता हेच भाजपला विचारायची वेळ आली आहे. आमच्यातील गद्दार तुम्ही घेऊन गेलात, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. भाजपचे लोक इतक्या वाईट भाषेत बोलतात, हीच शिकवण तुम्ही तुमच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये दिलीत का, अशा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"