‘ट्राय’प्रमुखांची अवस्था ‘आ बैल मुझे मार’, उद्धव ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 08:03 AM2018-08-01T08:03:46+5:302018-08-01T09:39:53+5:30

आधार कार्ड सुरक्षिततेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्राय प्रमुख आणि भाजपा सरकारचा घेतला समाचार

Uddhav Thackeray Criticized BJP government over aadhar card security issue | ‘ट्राय’प्रमुखांची अवस्था ‘आ बैल मुझे मार’, उद्धव ठाकरेंचा टोला

‘ट्राय’प्रमुखांची अवस्था ‘आ बैल मुझे मार’, उद्धव ठाकरेंचा टोला

Next

मुंबई -  टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथोरिटी आॅफ इंडिया (ट्राय) चे प्रमुख आर. एस. शर्मा यांच्या आधार क्रमांकावरून इथिकल हॅकर्सनी त्यांची 14 प्रकारची माहिती लीक केली आहे. एवढेच नव्हे, त्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून, त्यापैकी एका खात्यात आधारशी संलग्न पेमेंट सर्व्हिसमधून त्यांनी एक रुपयाही जमा केला आहे. त्यामुळे स्वत:चा आधार क्रमांक जाहीर करून, तो किती सुरक्षित आहे, असे सांगण्याचा आर. एस. शर्मा यांच्या भलताच अंगाशी आला आहे. शिवाय आधारच्या सुरक्षिततेविषयीचा दावाही पूर्णत: फोल ठरला आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्राय प्रमुख आणि भाजपा सरकारचा सामना संपादकीयमधून समाचार घेतला आहे. 

''आधार कार्ड संपूर्ण सुरक्षित आहे, असे सरकार नेहमीच छातीठोकपणे सांगत असते. मात्र हा दावा पोकळ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. खुद्द देशाच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे म्हणजे ‘ट्राय’चे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी दिलेले ‘आधार चॅलेंज’ फ्रान्सच्या एका हॅकरने फोल ठरविले आहे. शर्मा यांची काही व्यक्तिगत माहिती या हॅकरने ‘ट्विटर’द्वारे जाहीर करून ‘ट्राय’प्रमुखांची अवस्था ‘आ बैल मुझे मार’ अशी केली आहे.'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. शिवाय,''हॅकर्सनी शर्मा यांची जी माहिती ‘लीक’ केली आहे ती तशी गंभीर नाही. मात्र त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य कमी होत नाही. कारण प्रश्न जनतेच्या घटनात्मक स्वातंत्र्याचा, आधार कार्डच्या सुरक्षेचा आणि सरकारवरील विश्वासाचा आहे'', असंही त्यांनी नमूद केले आहे. 

(ट्रायच्या प्रमुखांच्या खात्यात हॅकर्सनी जमा केला रुपया!; आधार सुरक्षिततेचा दावा पोकळ?)

- काय आहे आजचे सामना संपादकीय?
आधार कार्ड संपूर्ण सुरक्षित आहे, असे सरकार नेहमीच छातीठोकपणे सांगत असते. मात्र हा दावा पोकळ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. खुद्द देशाच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे म्हणजे ‘ट्राय’चे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी दिलेले ‘आधार चॅलेंज’ फ्रान्सच्या एका हॅकरने फोल ठरविले आहे. शर्मा यांची काही व्यक्तिगत माहिती या हॅकरने ‘ट्विटर’द्वारे जाहीर करून ‘ट्राय’प्रमुखांची अवस्था ‘आ बैल मुझे मार’ अशी केली आहे. शर्मा यांनी त्यांचा आधार क्रमांक ट्विटरद्वारे सार्वजनिक करून त्यातील माहिती हॅक करून दाखविण्याचे जाहीर आव्हान दिले होते. त्यावर फ्रान्समधील इलियट अल्डरसन या हॅकरने शर्मा यांचा काही व्यक्तिगत तपशील ट्विटरद्वारे जाहीर केला आणि आधार सुरक्षेच्या दाव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इलियट याने आधार कार्ड सार्वजनिक करणे कसे जोखमीचे आहे, असा सल्लादेखील हिंदुस्थानी नागरिकांना दिला आहे. अर्थात ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया’ म्हणजे ‘यूआयडीएआय’ने या हॅकरचा दावा फेटाळला आहे आणि शर्मा यांच्या माहितीची ‘चोरी’ आधार डेटाबेस किंवा ‘यूआयडीएआय’च्या सर्व्हरमधून केलेली नाही असे स्पष्ट केले आहे. ही कथित हॅक झालेली माहिती आधीपासूनच गुगल आणि इतर वेबसाइटस्वर उपलब्ध आहे, असाही दावा यूआयडीएआयने केला आहे. मात्र या दाव्याचे शब्द हवेत विरण्याआधीच ‘इथिकल हॅकर्स’ या दुसऱ्या ग्रूपने शर्मा यांच्या बँक खात्यात एक रुपया जमा केल्याचे जाहीर केले. 
शर्मा यांच्या बँक खात्यात आधारशी संलग्न पेमेंट सर्व्हरमधूनच हा रुपया जमा केल्याचा दावाही या ग्रूपने केला. त्याचे स्क्रीन शॉट्स प्रसिद्ध केले. यूआयडीएआयचे यावर काय म्हणणे आहे? हे ‘रुपया’ प्रकरणही यूआयडीएआय आणि सरकारला खोटे ठरवावे लागेल. दस्तुरखुद्द ‘ट्राय’च्या प्रमुखाचेच आधार कार्ड फ्रान्स आणि आपल्या देशातील हॅकर्स ‘लीक’ करून दाखवीत असतील तर आधार कार्ड सुरक्षेची सरकारची हमी ही गाजराचीच पुंगी ठरते. आधार कार्डाच्या असुरक्षिततेबद्दल यापूर्वीही अनेकदा शंका उपस्थित झाल्या आहेत. तशा घटना घडल्या आहेत. क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी हिने आधार कार्डद्वारा तिची महत्त्वाची व्यक्तिगत माहिती ‘लीक’ झाल्याचा आरोप गेल्या वर्षी केला होता. बंगळुरू येथील ‘सेंटर फॉर इंटरनेट ऍण्ड सोसायटी’ या संस्थेच्या अहवालातही तब्बल साडेतेरा कोटी आधार कार्डस्चा डाटा ‘लीक’ झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. बोगस आधार कार्डचे वाटप झाल्याचे प्रकार मधल्या काळात उघड झाले. त्यासंदर्भात गुन्हेदेखील दाखल झाले. तेव्हा आधार कार्डच्या सुरक्षेचे ढोल यापूर्वीही फुटले आहेत. तरीही ‘ट्राय’चे प्रमुख शर्मा ते पुन्हा वाजवायला गेले आणि स्वतः तर तोंडघशी पडलेच, पण सरकारलाही संशयाच्या पिंजऱ्यात उभे केले. 
अर्थात, आज जे आधारच्या सुरक्षिततेची १०० टक्के हमी देत आहेत, बहुतेक सरकारी आणि आर्थिक व्यवहारात ते सक्तीचे करीत आहेत तेच सत्तेत येण्यापूर्वी आधार कसे असुरक्षित आहे हे सांगत होते. अर्थात जे सत्तेत येण्यापूर्वी जीएसटीला विरोध करतात आणि सत्तेत आल्यावर मध्यरात्री संसदेत ‘जीएसटी उत्सव’ साजरा करतात त्यांनी आधार कार्डचे घोडेही पुढे दामटले तर त्यात नवल काय! हॅकर्सनी ‘ट्राय’चे प्रमुख शर्मा यांचे आधार चॅलेंज निराधार ठरवले आहे, पाठोपाठ त्यांच्या मुलीलाही ई-मेलद्वारा महत्त्वाच्या फाइल्स सार्वजनिक करण्याची धमकी दिली असून खंडणीची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर, थेट पंतप्रधान मोदी यांनाही ‘आधार चॅलेंज’ देत आधार कार्ड सुरक्षेच्या दाव्याची हवा काढण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा हॅकर्सचे हे आव्हान मोडून काढण्याची आणि आधार कार्ड सुरक्षित असल्याचा विश्वास जनतेला देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासाठी अडचणीचे ठरलेल्या ‘पनामागेट’ या गाजलेल्या प्रकरणात महत्त्वाची कागदपत्रे ‘लीक’ झाली होती. शर्मा यांच्या ‘आधारगेट’ प्रकरणात त्यांची व्यक्तिगत माहिती लीक झाली आहे. ही दोन्ही प्रकरणे भिन्न आहेत. शिवाय हॅकर्सनी शर्मा यांची जी माहिती ‘लीक’ केली आहे ती तशी गंभीर नाही. मात्र त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य कमी होत नाही. कारण प्रश्न जनतेच्या घटनात्मक स्वातंत्र्याचा, आधार कार्डच्या सुरक्षेचा आणि सरकारवरील विश्वासाचा आहे.

 

Web Title: Uddhav Thackeray Criticized BJP government over aadhar card security issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.