मुंबई - अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमापूर्वी स्पीड बोटीला झालेल्या अपघातावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपावर निशाणा साधला आहे. ''छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात होणे ही अभिमानाचीच बाब आहे. 11 कोटी मराठी जनता व 100 कोटी हिंदूंच्या हृदयात छत्रपतींचे स्थान अढळ आहे. शिवाजी महाराजांचे कार्य शिवसेनाप्रमुखांनी पुढे नेले व शिवसेना शिवरायांच्याच विचाराने काम करीत आहे. शिवस्मारक व्हावे, पण बुडालेल्या बोटीबरोबर स्मारकाचे राजकारणही कायमचे बुडावे. पायाभरणीचा कार्यक्रम रद्द झाला. महाराष्ट्रात ही कसल्या अपशकुनाची सुरुवात म्हणायची?'', अशा शब्दांत त्यांनी भाजपाला सुनावले आहे.
सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे ?- अरबी समुद्रातील शिवस्मारक म्हणजे स्वतःचीच मालकी. इतर कोणी या सोहळ्यात सहभागी होऊ नये असा अट्टहास ज्यांनी केला त्यांच्या अरेरावीपणातून कालचा अपघात घडला आहे. - हे स्मारक सरकार बांधत नसून भारतीय जनता पक्षाच्या कोषातून बांधणी सुरू आहे असे वातावरण निर्माण केले.- शिवछत्रपतींचे आशीर्वाद त्यामुळे फक्त भाजपलाच मिळणार आणि इतर शिवभक्तांची ओंजळ रिकामी राहणार, असा प्रचार तेव्हा झाला. प्रत्यक्षात स्मारकासाठी जे एक महामंडळ निर्माण केले त्याचे अध्यक्षपद अचानक भाजपवासी झालेल्या विनायक मेटे यांना देण्यात आले. तेव्हापासूनच शिवस्मारक विरुद्ध सरकार असा वाद सुरू झाला. मेटे यांना मंत्री व्हायचे होते, पण त्यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्षपद देऊन शांत केले गेले.- स्मारकाचे टेंडर, इतर खर्च वगैरे बाबतीत मेटे यांनी सरकारवर अनेकदा आरोप केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी स्मारकाबाबत अनेक बेकायदेशीर व अनैतिक कामे करीत आहेत व 3 हजार 826 कोटींच्या टेंडर्समध्ये घोटाळे सुरू झाले आहेत. मेटे यांनी हे सर्व मुख्यमंत्र्यांना कळवले आहे. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष मेटे हे नाममात्र आहेत. - स्मारकाच्या उभारणीबाबत सर्व सूत्रे मुख्यमंत्री कार्यालयातून हलत आहेत. शिवस्मारकाची सर्व कंत्राटे कोणी कोणाला द्यायची याबाबतचे अंदाधुंद आरोप–प्रत्यारोप होत आहेत. निदान छत्रपती स्मारकाबाबत तरी संयम बाळगणे गरजेचे होते. - स्मारकाचे टेंडर निघाले काय किंवा रखडले काय, त्यावर छत्रपतींचे हे स्थान अवलंबून नाही. शिवरायांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचे शिलेदार म्हणून आमच्या दिलात ते अढळ आहेत. - शिवाजी महाराजांचे कार्य शिवसेनाप्रमुखांनी पुढे नेले व शिवसेना शिवरायांच्याच विचाराने काम करीत आहे. शिवस्मारक व्हावे, पण बुडालेल्या बोटीबरोबर स्मारकाचे राजकारणही कायमचे बुडावे. पायाभरणीचा कार्यक्रम रद्द झाला. महाराष्ट्रात ही कसल्या अपशकुनाची सुरुवात म्हणायची?