...हा तर मोदी सरकारचा पांचटपणा; रुपया घसरणीवरून उद्धव ठाकरेंचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 07:45 AM2018-09-05T07:45:30+5:302018-09-05T08:46:25+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाची आर्थिक परिस्थिती आणि रुपयाच्या घसरणीवरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Uddhav Thackeray Criticized BJP Government over Indian rupees down and rbi policy | ...हा तर मोदी सरकारचा पांचटपणा; रुपया घसरणीवरून उद्धव ठाकरेंचा हल्ला

...हा तर मोदी सरकारचा पांचटपणा; रुपया घसरणीवरून उद्धव ठाकरेंचा हल्ला

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाची आर्थिक परिस्थिती आणि रुपयाच्या घसरणीवरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपाला खडेबोल सुनावले आहेत. ''रुपया घसरला तरी देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे असा अपप्रचार सुरू आहे. हे नवे अर्थशास्त्र सामान्यांच्या कल्पनेपलीकडचे आहे. आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर कधी काँग्रेसवर फोडायचे तर कधी रघुराम राजनवर फोडायचे हा पांचटपणा झाला. तुम्ही काय केले ते सांगा! पण सरकारकडे सांगण्यासारखे काही नाही'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला आहे.

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे - 
- पंतप्रधान मोदी हे देशाच्या अर्थव्यवस्थेस काँग्रेसने कसा सुरुंग लावला यावर भाषण देत होते. गेल्या चार वर्षांपासून ते स्वतः सत्तेवर आहेत याचा त्यांना विसर पडला की काय? ही अशीच पडझड सुरू राहिली तर येत्या काही दिवसांत ‘रुपया’ शंभरी पार करेल अशी भीती आम्हाला वाटत आहे. 

- देशाच्या चलनाचे मूल्य घसरते तेव्हा देशाची पतही त्याच वेगाने घसरत असते हा दावा भाजप नेते काँग्रेस राजवटीत करीत असत. मग आज रुपया पडझडीत शंभरीच्या गाळात जात असताना देशाची पत वाढली आहे असे समजायचे काय? 

-  रुपयाची पडझड रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली? कोणती पावले उचलली? तर तेथेही बोंबच आहे. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यामुळे घसरली असा मृदुंग वाजवून नीती आयोगाने सरकारची चमचेगिरीच केली. 

-  रघुराम यांच्या काळात रुपयाची प्रकृती बिघडली होती व ते दुरुस्ती करू पाहात होते. डॉलरच्या तुलनेत रुपया आता शवागृहात पोहोचला आहे. त्यावर शस्त्रक्रियेची वेळ निघून गेल्याने क्रियाकर्मच करावे लागते की काय, अशी भीती वाटत आहे.

-  बुलेट ट्रेनचा सण कर्ज काढून साजरा होत असला तरी मुंबईतील उपनगरीय रेल्वे रोज ‘मरत’ चालली आहे. हे काही सहाव्या मजबूत अर्थव्यवस्थेचे लक्षण नाही. 

- आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर कधी काँग्रेसवर फोडायचे तर कधी रघुराम राजनवर फोडायचे हा पांचटपणा झाला. तुम्ही काय केले ते सांगा! पण सरकारकडे सांगण्यासारखे काही नाही. 

- अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ते तीन मूर्तीवरील नेहरूंचे स्मारक हटवणार आहेत. निवडणुका ई.व्ही.एम. पद्धतीनेच घेणार आहेत. राहुल गांधी हे नालायक आहेत व ते मांसाहार करून मानसरोवर यात्रेस गेल्याने धर्म भ्रष्ट झाल्याचा आरोप भाजपने केला; तोही फक्त घसरलेल्या रुपयाची किंमत वाढवण्यासाठीच! रुपया का घसरला, अर्थव्यवस्था का बुडाली, या मागची हीच कारणे असतील तर देशही बुडत आहे हे मान्य करायला हवे.

Web Title: Uddhav Thackeray Criticized BJP Government over Indian rupees down and rbi policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.