राम मंदिर चर्चा, चिंतन, संयमाचा विषय नाही, 'अॅक्शन'चा विषय बनलाय - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 10:34 AM2018-12-20T10:34:42+5:302018-12-20T10:46:08+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माणावरुन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सामना संपादकीयमधून त्यांनी भाजपा नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.

Uddhav Thackeray criticized BJP leaders over statement on ram temple issue | राम मंदिर चर्चा, चिंतन, संयमाचा विषय नाही, 'अॅक्शन'चा विषय बनलाय - उद्धव ठाकरे 

राम मंदिर चर्चा, चिंतन, संयमाचा विषय नाही, 'अॅक्शन'चा विषय बनलाय - उद्धव ठाकरे 

googlenewsNext

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माणावरुन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सामना संपादकीयमधून त्यांनी भाजपा नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. ''श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? राजनाथ म्हणतात, ‘संयम.’ गडकरी म्हणतात, ‘सहमती’ व सरसंघचालक सांगतात, ‘रामाचीही वेळ येईल.’ पंचवीस वर्षे राम उघडय़ा तंबूत व आपण सारे सत्तेच्या खुर्च्या उबवत आहोत. पुन्हा राममंदिरावर कोणी काही बोलायचे नाही. राममंदिरावर अध्यादेश काढणे राहिले बाजूला, ज्यांनी मंदिरासाठी बाबरी पाडली त्यांच्यावरचे खटलेही तुम्ही काढू शकत नाही. राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपून जमाना झाला. लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रपती होणार नाहीत. तेव्हा बाबरी पतनाचे खटले काढा व बाबरीचे कोर्ट तरी बरखास्त करा. श्री. गडकरी, इथे तरी सहमती होऊ द्या!''असे उद्धव यांनी म्हटलं आहे.

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे 
- अयोध्येत राममंदिर उभारावे यासाठी भारतीय जनता पक्षावर आतूनच दबाव आहे. पक्षाच्या प्रत्येक बैठकीत राममंदिर कधी उभारणार ते सांगा? असे विचारले जात आहे व भाजप हायकमांडकडे त्याचे उत्तर नाही. 
- संसदीय पक्षाच्या बैठकीत काही खासदारांनी पुन्हा राममंदिराचा प्रश्न विचारला. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘मंदिरप्रश्नी संयम राखा, योग्य वेळी सर्वकाही होईल’ असे उत्तर दिले. याच वेळी नितीन गडकरी यांनी सल्ला दिला आहे. ‘एकमेकांच्या सहमतीने आणि सहकार्याने अयोध्येत राममंदिर उभारावे.’ भाजप अंतर्गत राममंदिरप्रश्नी अस्वस्थता निर्माण झाली आहे व राज्य चालवणाऱ्यांकडे कोणतीही ठोस योजना नाही. आम्ही अयोध्या दौरा केला व राममंदिराचा विषय पुन्हा राष्ट्रीय पातळीवर आणला. 
- आम्ही अयोध्येत जाऊन हे केले नसते तर मंदिर विषय पुन्हा शरयूच्या गाळातच रुतला असता व मतांसाठी पुन्हा त्याच नदीत डुबक्या मारण्याचे प्रयोग सुरू झाले असते. या जुमलेबाजीस आम्ही अयोध्येत जाऊन लगाम घातला. त्यामुळे भाजपअंतर्गत या प्रश्नी निदान थातूरमातूर चर्चा तरी सुरू झाली. 
- भाजपप्रणीत हिंदुत्ववादी संस्था, संघटना जागोजाग धर्मसभा, संत संमेलने घेऊन राममंदिरावर ‘चिंतन’ करीत आहेत. आता हा चर्चा, चिंतन आणि संयमाचा विषय राहिला नसून ‘ऍक्शन’ म्हणजे कृतीचा विषय बनला आहे. 

- संयम आणि सहमतीच्या चिपळ्या वाजवत बसले असते तर पंचवीस वर्षांपूर्वी अयोध्येत बाबरीचा कलंक नष्ट झाला नसता. तेव्हा ‘मंदिर वहीं बनाएंगे’ची भाषा होती व आता संयम, सहमतीची भाषा आहे. भाजपच्या एका खासदाराने बैठकीतच विचारले, ‘संयम कसला? आणि वाद तरी कसला? जर त्या जमिनीवर आता कोणताही ढांचा शिल्लक नाही, तर मग वाद कसला?’ यावर राज्यकर्त्यांकडे उत्तर नाही. पण पाच राज्यांतील विधानसभा निकालांनी भाजपला उत्तर दिले आहे. 
- राजनाथ सिंह व नितीन गडकरी यांनाही वाटते की अयोध्येत मंदिर व्हावे. मंदिर व्हावे ही देशाची इच्छा होती. म्हणूनच भाजपला सत्तेवर आणले पण मंदिर मुद्दा इतर विषयांप्रमाणे ‘जुमलेबाजी’ ठरू लागल्याने भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मंदिर संयम, सहमतीने उभारले जाणार नाही. मुसलमानांना भडकवून राजकारण करणारा एक गट टोकाची भूमिका घेत राहील. हे सर्व मोडून राममंदिराचे काम पुढे नेईल तोच देशावर राज्य करील. 
- मंदिर उभारणीसाठी कायदा करा, अध्यादेश आणा ही समस्त देशवासीयांची मागणी आहे.    
- तीन राज्यांत जनतेने लोहारी घण घालूनही कुंभकर्ण झोपेतून उठायला तयार नाही. श्री. भागवत यांनी एक आशादायक विचार मांडला, ‘संघाने अत्यंत खडतर दिवस पाहिले आहेत. आणीबाणी काळात संघावर बंदी आली होती. आम्ही सपाटून मार खाल्ला. स्वप्नातही वाटले नव्हते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असे चांगले दिवस येतील. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यावी लागते.’ सरसंघचालकांचे म्हणणे मान्य आहे, पण राममंदिराची वेळ नक्की कधी येणार?  

Web Title: Uddhav Thackeray criticized BJP leaders over statement on ram temple issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.