Join us

आयाराम, गयाराम व घाशीराम! गोव्यातील अस्थिरतेला भाजपाच जबाबदार - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 7:40 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीस भाजपाला जबाबदार ठरवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीस भाजपाला जबाबदार ठरवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ''गोव्यात भाजपने मोडतोड तांबापितळ एकत्र करून सरकार स्थापन करणे हा लोकशाहीचा अपमानच होता. शेवटी हे नवे राज्य गोव्यास व भाजपास फळले नाही. हे राज्य देवांना व चर्चनांही वाचवता आले नाही. इतकी अराजकता व अस्थिरता निर्माण झाली आहे. पर्रीकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती व राज्यही स्थिर चालले असते. तसे झाले असते तर पर्रीकरांनंतर कोण? हा प्रश्न आज निर्माण झाला नसता. गोव्याच्या आजच्या स्थितीस भाजपच जबाबदार आहे. आयाराम, गयाराम व घाशीरामांच्या मदतीने राज्य निर्माण केले की काय घडते ते गोव्यात दिसत आहे''', अशा शब्दांत त्यांनी भाजपाला टोला हाणला आहे. 

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे -  मनोहर पर्रीकरांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून ढासळत आहे तसा त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन – चार मंत्र्यांच्या प्रकृतीतही बिघाड झाला आहे. त्यामुळे वर्षभरापासून गोव्याचे मंत्रिमंडळ जणू अतिदक्षता विभागातच दाखल झाले. - प्रशासन अधांतरी व कामकाज बंद अशा निर्नायकी अवस्थेत गोव्यासारखे राज्य सापडले असून राजकीय अस्थिरतेने अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले. हे योग्य नाही. ‘‘भारतीय जनता पक्षात (गोवा) पर्रीकरानंतर कोण?’’ असा प्रश्न विचारला जात आहे. - पर्रीकरांना सन्मानाने निवृत्त करून नवा नेता शोधावा तर भाजपात असा एकही ‘शुद्ध’ भाजपाई नेता नाही. श्रीपाद नाईक हे दिल्लीत आहेत व बाकी एखादा सोडला तर सगळेच भाजपाई हे आयाराम, गयाराम आणि घाशीराम आहेत. - गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची मोट बांधून भाजपने सरकार स्थापन केले व त्याचे नेतृत्व करण्यासाठी देशाच्या संरक्षणमंत्र्यांना म्हणजे मनोहर पर्रीकरांना गोव्यात पाठवले. ही भाजपची, पर्रीकरांची सगळ्यात मोठी चूक होती, पण यावेळी पर्रीकरांचा सूर लागला नाही आणि गोव्याची गाडी व पर्रीकरांची प्रकृती घसरत गेली ती गेलीच.  - महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व फॉरवर्ड पार्टी मंडळींनी विधानसभा निवडणुका भाजपच्या विरोधात लढवल्या होत्या हे इथे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आता भाजपचे सरकार अस्थिर करण्यामागे हेच लोक आहेत. - म. गो. पक्षाचे ढवळीकर व फॉरवर्ड पक्षाचे सरदेसाई यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे व पर्रीकर प्रकृतीशी झुंज देत असताना काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला आहे.- यामितीस गोव्यात डझनभर माजी मुख्यमंत्री ‘बेकार’ अवस्थेत फिरत आहेत व माजी मंत्र्यांची एक स्वतंत्र वसाहत निर्माण करावी अशी स्थिती आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेमनोहर पर्रीकरगोवाभाजपा