हिंदुत्व नंतर अळूच्या फतफत्यासारखे का झाले? - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 07:53 AM2018-09-11T07:53:26+5:302018-09-11T08:00:08+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

Uddhav Thackeray criticized BJP over Hindutva and world hindu congress | हिंदुत्व नंतर अळूच्या फतफत्यासारखे का झाले? - उद्धव ठाकरे

हिंदुत्व नंतर अळूच्या फतफत्यासारखे का झाले? - उद्धव ठाकरे

googlenewsNext

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. ''सत्तेवरील बेगडी हिंदुत्ववाद्यांची महत्त्वाकांक्षा आहे ती हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची, हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात दहशतवादी ठरवून खतम करण्याची. शिकागोतील हिंदू काँग्रेसमध्ये भागवत यांनी या विषयावर भाष्य केले असते तर बरे झाले असते. भाजपची काँगेस झाली आहे. काँगेसने मुसलमानांचे तरी लांगूलचालन केले. विद्यमान ‘हिंदुत्ववादी’ राजवटीत हिंदूंचे लांगूलचालन सोडा, त्यांना ‘सेक्युलर’ बनवले जात आहे. काँग्रेसकडून काँगेसकडे असा देशाचा प्रवास सुरू झालाय'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला हाणलाय. 

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे
- इकडे हिंदुस्थानात पंतप्रधान मोदी हे काँग्रेसमुक्त भारत निर्माण करीत आहेत. काँगेस ही जणू शिवीच आहे असा विचार रुजवला जात आहे, पण शेवटी हिंदूंचे जे जागतिक संमेलन पार पडले त्यास ‘हिंदू काँगेस’ असेच संबोधण्यात आले व त्या काँग्रेसच्या मंचावरून मोहनराव भागवत यांनी काही विचार मांडले आहेत. 
-  हिंदूंनी आक्रमक व्हायचे म्हणजे काय करायचे? व आक्रमक झालेल्या हिंदूंना त्यांच्याच राज्यात कायद्याच्या रणगाडय़ाखाली चिरडले जाणार असेल तर त्यावर संघाच्या पोतडीत कोणते चूर्ण आहे? 
- 1992-93 च्या मुंबईतील दंगलीत शिवसेनेचे आक्रमक हिंदुत्व नसते तर काय भयंकर स्थिती येथील समस्त हिंदूंची झाली असती? त्यावेळी हे सर्व जागतिक हिंदू काँगेसवाले कुठे लपले होते? 
- पण जे हिंदू म्हणून सत्तेवर आले त्यांनी काय केले? हिंदू आक्रमक व एकजूट होता म्हणूनच मोदी हे पंतप्रधान झाले. त्या एकजुटीला, आक्रमकतेला काय फळ मिळाले? 
- शिवसेनेशी युतीचा तुकडा पाडून हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला हे पाहिले व जे जे आक्रमक हिंदुत्वाचा, राष्ट्रहिताचा पुकार करू लागले ते ते भाजपचे दुश्मन ठरू लागले. 
- हिंदुत्वाची शिडी करून सत्तेवर यायचे व काम होताच शिडी फेकायची, हे असले हिंदुत्व सध्या सुरू आहे. आता सत्तेवरील बेगडी हिंदुत्ववाद्यांची महत्त्वाकांक्षा आहे ती हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची, हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात दहशतवादी ठरवून खतम करण्याची. 
- शिवसेनेसारखे पक्ष हे लपूनछपून नाही तर उघडपणे हिंदुत्वाचा आक्रमक पुरस्कार करतात. हिंदुत्व हाच आमचा पंचप्राण आहे. तुमच्या जागतिक हिंदू काँग्रेसमध्ये शिवसेनेला स्थान का नाही?
- तुम्हाला हिंदू एकवटायचा आहे ना, मग ही अस्पृश्यता कशासाठी? हिंदू समाज आज निराश झाला आहे. 
- काँग्रेसने मुसलमानांना वापरले तसे भाजप हिंदूंना वापरत असल्याची भावना बळावत आहे. 
- कश्मीरात हिंदू म्हणून आक्रमक होण्याचे राहिले बाजूला, तर हिंदूंविरोधी आणि पाकप्रेमी मेहबुबाच्या प्रेमात हिंदू राष्ट्रवाले पडले व कश्मिरी पंडितांना दगा दिला. हे सर्व घडत असताना सरसंघचालकांकडून आक्रमक प्रतिक्रियेची अपेक्षा होती. 
- हिंदूंना दिलेले एकही वचन भाजप सरकार पूर्ण करू शकलेले नाही. मग ते राम मंदिराचे असेल नाही तर समान नागरी कायद्याचे. हा सर्व आक्रमक हिंदुत्वाचाच अजेंडा होता, पण सत्तेवर येण्याआधीचे आक्रमक हिंदुत्व नंतर आळूच्या फतफत्यासारखे का झाले? 
-  भाजपची काँगेस झाली आहे. काँगेसने इतकी वर्षे मुसलमानांचे तरी लांगूलचालन केले. विद्यमान ‘हिंदुत्ववादी’ राजवटीत हिंदूंचे लांगूलचालन सोडा, त्यांना ‘सेक्युलर’ बनवले जात आहे. काँग्रेसकडून काँगेसकडे असा देशाचा प्रवास सुरू झालाय.

Web Title: Uddhav Thackeray criticized BJP over Hindutva and world hindu congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.