Join us

"जवानांच्या हत्येच्या बदल्यासाठी भाजपाला मते द्या म्हणणं म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 8:15 AM

पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानं सर्वच स्तरांतून त्याचा निषेध नोंदवला जातोय.

मुंबईः पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानं सर्वच स्तरांतून त्याचा निषेध नोंदवला जातोय. त्यातच आता शिवसेनेनंही या प्रकारावरून भाजपावर निशाणा साधला आहे. काश्मिरातील जवानांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपला मते द्या, कमळासमोरचे बटण दाबा’’ असा प्रचार सुरू करणे म्हणजे 40 मृत जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.तसेच काश्मीर प्रश्नाचे राजकारण देशात करायचे, पण काश्मिरात उद्ध्वस्त झालेल्या गुलाबावर पाय ठेवून पुढे जायचे हे आता तरी थांबावे, असंही म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. साडेचार वर्षांत काश्मिरातील गुलाबाचे ताटवे का कोमेजले, आशेच्या गुलाबपाकळ्या का झडून पडल्या याचे उत्तर द्या, असाही प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.   सामन्याच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे- इथे युद्धाची, अतिरेक्यांशी दोन हात करण्याची संधी न मिळताच जवानांच्या देहाच्या चिंधड्या झाल्या आहेत. त्यांच्या मृतदेहांची ओळख पटण्यापलीकडे आहे. - अलीकडे आमचा तिरंगा अभिमानाने फडकवण्यात कमी व मृत जवानांच्या शवपेट्यांना गुंडाळण्यातच जादा खर्च होत आहे. कोणतेही युद्ध नाही, पण एकाच वेळी 40 जवान गतप्राण होतात. हे गेल्या साडेचार वर्षांत पहिल्यांदा झालेले नाही. - सरकार व जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची, त्यांचे आत्मबल वाढविण्याची ही वेळ आहे, पण ‘सरकार’ विसरले असले तरी देशाची जनता काही गोष्टी विसरत नसते. 

- काँग्रेस राजवटीत काश्मिरात अशा घटना घडल्या तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची वीरश्रीयुक्त भाषणे लोकांनी सोशल मीडियावर टाकून त्यांना त्यांच्याच भूमिकेचे स्मरण करून दिले आहे. - ‘छप्पन्न इंचांची छाती’ हा शब्द काश्मिरसंदर्भातच आला. आमचे सैनिक कमजोर नसून दिल्लीत बसलेले सरकार लाचार आणि कमजोर असल्याचा घणाघात तेव्हा श्री. मोदी करीत होते. 

- पुलवामा येथील हल्ल्यानंतरही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत, ‘‘हा हल्ला आम्ही विसरणार नाही आणि दहशतवाद्यांना माफ करणार नाही. दहशतवाद्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल!’’ 

- श्री. मोदी व त्यांचे सरकार नेमकी कोणती किंमत पाकड्यांना चुकवायला लावते याची वाट सगळेच पाहत आहेत. पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला, उरीच्या लष्करी तळावर हल्ला झाला. आता पुलवामात तर रक्ताचे पाट वाहिले. - मुळात पाकव्याप्त काश्मीर हा हिंदुस्थानचा भाग आहे. त्यातील चौक्यांवर हल्ले करणे म्हणजे पाकड्यांना धडा शिकवणे नव्हे. पाकिस्तानला धडा शिकवला तो इंदिरा गांधींनी. लाहोरपर्यंत फौजा घुसवून पाकचा तुकडाच पाडला. लाखावर सैन्याला गुडघे टेकायला लावले. 

- पुन्हा सर्जिकल स्ट्राइक अथवा मर्यादित युद्ध असे दोन पर्याय आहेत. त्यांनी ते खुशाल करावेत. काश्मिरातील परिस्थिती नेमकी काय आहे व युद्ध हाच एकमेव पर्याय आहे काय? 

-  1962 साली चीनबरोबरच्या युद्धास विरोध करणारे लालभाई होतेच व ते चीनच्या बाजूने प्रचार करीत होते. ही ‘सेक्युलर’ अवलाद आता पाकड्यांच्या बाजूने उभी राहील. कारण चीन आज पाकिस्तानचे बाळंतपण करीत आहे. - पुलवामातील हल्ल्यास सर्वस्वी पाकिस्तान जबाबदार नाही, इतरही काही घटक आहेत, असे डॉ. फारुख अब्दुल्ला सांगत आहेत. कालपर्यंत सीमेपलीकडून आतंकवादी घुसत होते. 

- आज काश्मिरातील तरुण हिंदुस्थानच्या विरोधात नव्याने उभा ठाकला आहे. तरीही कश्मीरच्या गावागावांत ‘‘हिंदुस्थान झिंदाबाद’’चे नारे देणारा जो वर्ग आहे तो दबून गेला आहे व त्याला कोणाचेही संरक्षण नाही. - काश्मिरी जनता हिंदुस्थानी आहे, असे डॉ. अब्दुल्ला सांगतात. काश्मीर खोर्‍यातील जे प्रमुख लोक हिंदुस्थानच्या बाजूने आहेत त्यांना देण्यात आलेली सुरक्षा सरकारने काढून घेतल्याचा आरोप डॉ. अब्दुल्ला करतात व सरकार त्यावर गप्प आहे. -काश्मीरच्या निमित्ताने देशात ‘हिंदू-मुसलमान’, ‘हिंदुस्थान-पाकिस्तान’ असा वाद निर्माण करून धार्मिक फाळणीच्या नावावर राजकीय लाभ म्हणजे निवडणुकांचे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.- काश्मिरातील तरुण शिक्षण, रोजगार, प्रतिष्ठा यापासून ‘दूर’ जात आहे व तोच तरुण नाइलाजाने उपजीविका म्हणून स्वतःच्याच देशाविरुद्ध शस्त्र हाती घेत आहे. यावर काम करणे गरजेचे आहे. पाकिस्तान याचा फायदा घेत आला व घेत राहील. - काश्मिरातील तरुणांना, मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाला अफझल गुरू, बु-हाण वाणीसारखे लोक स्वातंत्र्यसैनिक व जवळचे वाटतात, तितके आमचे पंतप्रधान मोदी का वाटत नाहीत?  

टॅग्स :पुलवामा दहशतवादी हल्लाउद्धव ठाकरे