Join us

अवनी तुला भेकडासारखे मारले, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 7:30 AM

तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी वाघिणीला अखेर गोळी घालून ठार मारण्यात आले. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपाला सुनावले आहे.

मुंबई - तेरा जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी वाघिणीला अखेर गोळी घालून ठार मारण्यात आले. या घटनेविरोधात प्राणीमित्रांसहीत सर्वसामान्यही निषेध नोंदवत आहेत. अवनीला ठार केल्याप्रकरणी सोशल मीडियावरही संतापाची लाट पसरली आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे.''दुष्काळ, उपासमार, कुपोषण, सरकारी अनास्था, शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण यामुळे राज्यात माणसे मरत आहेत, स्वतःचे जीवन संपवून घेत आहेत. मात्र त्यासाठी कोणी सरकारी व्यवस्थेला ‘नर’भक्षक ठरवत नाही. वन्य प्राण्यांना मात्र ‘नरभक्षक’ ठरवून त्यांना शिक्षा दिली जाते. अवनी, तू याच मानवी स्वार्थाची बळी ठरलीस. ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? अवनी, आम्हाला माफ कर. तुला भेकडासारखे मारले. रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सुनावले आहे. सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे- नरभक्षक म्हणून बदनाम झालेल्या ‘अवनी’ वाघिणीस अखेर  गोळ्या घालून ठार करण्यात आले. अवनीस का मारले यावर आता प्राणिमित्रांमध्ये वाद सुरू झाला आहे. - ही वाघीण पाच वर्षांची होती व तिने नुकताच दोन बछड्यांना जन्म दिला होता. हे दोन्ही बछडे आता निराधार झाल्याचे दुःख वन्य जीवप्रेमींनी व्यक्त केले आहे. अवनी वाघीण नरभक्षक झाली. पण वाघ, सिंह हे नरभक्षक झाले व त्यांनी मनुष्यप्राण्यांवर झडप घातली यात आश्चर्य वाटावे असे काय आहे? - सापाच्या शेपटीवर पाय ठेवताच तो काय तुम्हाला गुदगुल्या करणार आहे? वन्य प्राण्यांचेही तेच आहे. - माणसाने वाघांच्या प्रदेशात घुसखोरी केली. जंगले तोडली, जाळली. डोंगर फोडले. त्यामुळे वाघांचे जगणे हराम झाले. एवढे सगळे झाल्यावर तुम्ही त्यांच्याकडून कोणत्या माणुसकीची अपेक्षा करता? - वाघांना ‘नरभक्षक’ म्हणून गोळ्या घालण्यापेक्षा मनुष्याने स्वतःस शिस्त लावणे गरजेचे आहे. निदान आता ‘अवनी’च्या निमित्ताने तरी या प्रश्नाचा सरकारी पातळीवर एकत्रितपणे आणि साकल्याने विचार व्हायला हवा. हे काम वन खात्याचे जसे आहे तसे इतर सरकारी खात्यांचेही आहे. - एरवी राज्यकर्ती मंडळी सर्वांना घर, ‘घर घर शौचालय’ वगैरे घोषणांचे ढोल पिटत असतात, पण वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या सावटाखाली एकेक क्षण जगणाऱ्या जनतेला द्या ना त्यांचे हक्काचे सुरक्षित घर. करा त्यांच्या शौचालयाची व्यवस्था. मात्र फक्त घोषणांचीच जुमलाबाजी सुरू असल्याने ‘अवनी’सारख्या घटना घडतात आणि मग वन्य प्राण्यांना ‘नरभक्षक’ ठरवून त्यांचा बळी घेतला जातो. - अवनी वाघिणीची हत्या देशभरात गाजते आहे. वाघिणीस ठार करण्याआधी ‘भूल’ द्यायला हवी होती. म्हणजे बेशुद्ध करून मारायला हवे होते, पण वाघीण अंगावर आल्यामुळे तिला थेट गोळ्याच घालण्यात आल्या असा दावा वन खाते करीत आहे. वन खात्याच्या या दाव्यालाही प्राणिमित्र संघटनांनी आता आव्हान दिले आहे. - खुद्द केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीच ‘अवनी’ची निर्घृण हत्या झाल्याचे आणि हा एक मोठा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर ज्या शूटरने अवनीला गोळ्या घातल्या त्याचे वडील शाफत अली खान यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांनी आतापर्यंत तीन वाघ, दहा बिबटे आणि काही हत्ती मारले आहेत. तरीही महाराष्ट्र सरकारने अवनीच्या एन्काऊंटरची सुपारी अशा माणसाला का दिली असा सवाल करत मनेका यांनी शाफत हे अवैध शस्त्रे पुरविणारे राष्ट्रविरोधी आहेत असाही गंभीर आरोप केला आहे. - मनेका यांचा हा संताप महाराष्ट्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा आहे. या आरोपांचा पटेल असा खुलासा राज्यकर्त्यांनीच करायचा आहे. कारण आरोप करणारे आणि ‘आरोपी’ एकाच पक्षाचे आहेत.  -  ‘वाघ बचाव’ आंदोलन सर्वच पातळय़ांवर सुरू असताना अवनीस ठार केले गेले. - वाघ, सिंह, बिबटे वगैरेंना जंगलांमधून विस्थापित करणाराही माणूसच आहे आणि नंतर माणसावर हल्ले केले म्हणून त्यांना ‘नरभक्षक’ ठरवून गोळ्या घालणाराही माणूसच आहे.  - अवनी, तू याच मानवी स्वार्थाची बळी ठरलीस.  

टॅग्स :अवनी वाघीणउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसवाघ