Join us

तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 5:43 AM

याच महाराष्ट्राच्या मातीत तुमचे राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  हल्लाबोल केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईत आज दोन सभा होताहेत. एका बाजूला आपण सगळे आहोत, तर दुसऱ्या बाजूला सगळे गद्दार, भाडोत्री आणि नकली लोक आहेत. इकडे असली शिवसेना, असली राष्ट्रवादी आणि असली काँग्रेस यांची सभा आहे, तिकडे वक्ते, उमेदवार आणि माणसेपण भाडोत्री आणली आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर मला संपवण्याचा प्रयत्न करा. पण याच महाराष्ट्राच्या मातीत तुमचे राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जशी अचानक नोटबंदी जाहीर केली, त्यास आपण डिमोनटायझेशन म्हणतो, तसेच ४ जूनला संपूर्ण देश ‘डिमोदीनेशन’ करणार आहे. पंतप्रधान म्हणून मोदीजी शेवटचे मुंबईत आले आहेत. जे बोलायचे ते त्यांनी बोलून घ्यावे. दि. ४ जूननंतर तुम्ही फक्त मोदी म्हणून राहणार आहात, देशाचे पंतप्रधान नाही, असेही ठाकरे म्हणाले. इंडिया आघाडीच्या प्रचाराची सांगता सभा शुक्रवारी बीकेसी येथील मैदानात पार पडली. निवडणुकीची ही सांगता सभा विजयाची नांदी ठरवणारी सभा असल्याचे ठाकरे म्हणाले. दोन वेळा राज्याने तुमच्यावर प्रेम केले. ४० पेक्षा जास्त खासदार दिले. मला त्याचा पश्चाताप होत असल्याचे ठाकरे म्हणाले.

तुमची मस्ती बंद करा; अन्यथा...

नाशिकच्या सभेत जेव्हा मोदींनी हिंदू-मुस्लीम करायला सुरुवात केली, तेव्हा समोरून शेतकरी उठला आणि कांद्यावर बोला म्हणाले. तेव्हा मोदींचे डोळे बघा, हुकूमशाहीची नजर काय असते ते दिसेल. दहा वर्ष काय काम केले ते न सांगता हिंदू-मुस्लीम करत आहेत. मुस्लीम बांधव ठाकरेंसह इंडियाबरोबर येत आहेत म्हणून आता त्यांच्या पोटात दुखते आहे. मुंबईत तुमच्या कंपन्या दादागिरी करतात. मराठी माणसाला प्रवेश देत नाहीत. मी सगळ्या गुजरात्यांविरोधात नाही, पण मोदींमुळे दोन-पाच मस्तवाल झाले आहेत. त्यांना मी इशारा देतो, तुमची मस्ती बंद करा, नाही तर तुमचे दरवाजे बंद करून मुंबईतून हाकलून लावू. इथे गुजराती-मराठी, हिंदू-मुस्लीम एकत्र राहतात, त्यात मीठ कालवू नका, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. जिथे होर्डिंग्ज कोसळून लोक मृत्यू पडले, त्यांचे रक्त सुकले नव्हते, तिथे तुम्ही ढोल ताशे लेझीम बडवत रोड शो केलात... 

टॅग्स :उद्धव ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४महाविकास आघाडी