“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 03:34 PM2024-10-03T15:34:33+5:302024-10-03T15:34:39+5:30
Uddhav Thackeray PC News: राज्यात अराजक माजले असून, तोतयेगिरी सुरू आहे. असेच अराजक छत्रपती शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर आले होते, असे सांगत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली.
Uddhav Thackeray PC News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नवी विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात यायला हवी. तत्पूर्वी निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे पथक दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यातच सर्वच पक्षांच्या तयारीने वेग घेतला असून, तत्पूर्वी दसऱ्याला होणाऱ्या विविध पक्षांच्या मेळाव्यांकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
शिवसेना ठाकरे गटाने नवे गीत प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. ‘मशाल’ हाती दे’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे ऑडिओ स्वरूपात आहे. शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. देवीला साकडे घालणाऱ्या या गीताचे अनावरण शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे गीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी राज्यभरातील शिवसैनिकांना दिले. तसेच दसरा मेळाव्याबाबत माहिती दिली.
दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार
नवरात्री सुरू होत आहे. परंपरेप्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. हा जगदंबेचा उत्सव आहे. जे आसूर माजले होते, त्यांचा वध करणाऱ्या महिषासूर मर्दिनी मातेचा दिवस आहे. राज्यात अराजक माजले आहे. राज्यात तोतयेगिरी सुरू आहे. असेच अराजक छत्रपती शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर आले होते. तेव्हा संत एकनाथांनी बये दार उघड म्हणत देवीला साकडे घातले होते. या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गीत तयार केले आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत. दसऱ्याला सर्व गोष्टींचा फडशा पाडणार आहे. आता सणासुदीचे दिवस आहेत. कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून गीताच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. ज्यांना जे बोलायचे ते बोलू द्या. नंतर सौ सोनार की एक लोहार की, असे होईलच, असा एल्गार उद्धव ठाकरे यांनी केला.
दरम्यान, नंदेश उमप यांनी हे गीत गायले आहे. त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतरचे त्यांचे पहिले गीत आहे. त्यांचा पहाडी आवाज तसाच आहे. श्रीरंग गोडबोले आणि नंदेश उमप यांनी या गीतात जान ओतली आहे. संगीतकार कामामुळे आले नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.