Uddhav Thackeray : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मोदी यांनी इलेक्ट्रोरल बॉण्डबाबत भाष्य केलं."काळा पैसा तसेच अन्य स्रोतांतून आलेली बेहिशेबी रक्कम निवडणुका लढविण्यासाठी वापरली जात होती. ते रोखण्यासाठी निवडणूक रोख्यांची योजना सरकारने लागू केली होती. अर्थात ही योजना उत्तम पर्याय होता, असे आम्ही कधीही म्हटले नाही. मात्र, विरोधकांनी त्याबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरविली',असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पलटवार केला आहे.
'निवडणूक रोखे घोटाळ्यामध्ये भाजपचं बिंग फुटलं आहे. सुप्रीम कोर्टामुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे, जगातील सगळ्यात मोठा घोटाळा हा आहे. सुप्रिम कोर्टाने हे उघड केलं नसतं तर हजारो कोटी यांना कोणी दिले हे कळलं नसतं आणि चंदा दो आणि धंदा लो हे काम यापुढेही चाललं असतं, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. यामुळे आता त्यांची सत्ता येत नाही आणि हे सगळं उघड झालं. हे आधी का झालं नाही याचा विरोधी पक्षांना पश्चाताप होईल, असंही ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र काय आहे हे यांना आता समजेल. संपूर्ण देशात हुकूमशाहीविरोधात जनमत झालं आहे, असंही ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये आता जागावाटप झालं आहे. कुठे बंडखोरी होत असेल तर त्या पक्षाने ती रोखली पाहिजे.आताची लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही आहे. पहिल्यांदा हुकूमशाही हटवा हे माझं आवाहन आहे, महाराष्ट्रात महाविकास आघाडी ४८ जागा जिंकणार आहे.