नेहरुंवर टीका करणारे पंतप्रधान मोदी त्यांच्याच मार्गानं चीनचा प्रश्न सोडवताहेत - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 07:35 AM2018-04-30T07:35:25+5:302018-04-30T07:42:24+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यावर टीका केली आहे.  

Uddhav Thackeray Criticized PM Narendra Modi over his china tour | नेहरुंवर टीका करणारे पंतप्रधान मोदी त्यांच्याच मार्गानं चीनचा प्रश्न सोडवताहेत - उद्धव ठाकरे 

नेहरुंवर टीका करणारे पंतप्रधान मोदी त्यांच्याच मार्गानं चीनचा प्रश्न सोडवताहेत - उद्धव ठाकरे 

Next

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चीन दौऱ्यासंदर्भात टीका केली आहे.  
''पंडित नेहरू यांनी चीनशी मैत्री केली ती अंगलट आली. नेहरू यांच्यावर टीका करण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत. मात्र नेहरू यांच्या ‘पंचशील’च्याच मार्गाने सध्याचे पंतप्रधान चीनचा प्रश्न सोडवू पाहत आहेत. नेहरू हे ‘पंचशील’चे उद्गाता होते. मोदी हे पंचसूत्राचे पाठीराखे बनले, पण विचार नेहरूंचाच आहे. ‘‘युद्ध नको तर बुद्धच हवा’’ हे नेहरूंप्रमाणे विद्यमान पंतप्रधान मोदी यांनाही पटले आहे असे दिसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यावर काय म्हणणे आहे?'', अशा शब्दांत टीका करत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रश्नदेखील विचारला आहे.

- काय आहे सामना संपादकीय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीन तसेच अन्य देशांची मुशाफिरी करून हिंदुस्थानच्या ‘दौऱ्यावर’ परतले आहेत. मोदी यांच्या चीन दौऱ्यातून नेमके हाती काय लागले यावर आता चर्चा सुरू आहे. विदेश मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की, कोणत्याही विशेष ‘अजेंड्य़ा’शिवाय म्हणजे कामाशिवाय हा चीनचा दौरा होता. म्हणजे देशाचे पंतप्रधान हे बिनकामाचे आहेत व भरपूर मोकळा वेळ असल्याने ते सहज चीनला फेरफटका मारून आले. पंतप्रधान मोदी व चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांच्यात ‘चाय पे चर्चा’ झाली व ती फलदायी ठरल्याचे मत विदेश सचिवांनी व्यक्त केले आहे. चीन हा पाकिस्तानचा सगळ्य़ात मोठा पाठीराखा आहे. पाकिस्तान हिंदुस्थानला सतत त्रास देत आहे तो चीनच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच. दहशतवादी राष्ट्र म्हणून जगाने पाकिस्तानला एकाकी पाडले, पण चीन मात्र पाकिस्तानला आजही मोठी मदत करीत आहे व हिंदुस्थानला अस्थिर करणे हाच त्यामागचा हेतू आहे. नेपाळ हे एकमेव हिंदूराष्ट्र चीनने गिळले आहे व चीनच्या प्रेरणेने नेपाळ हिंदुस्थानला दुश्मन मानू लागला आहे. बाजूच्या मालदीव, श्रीलंका, बांगलादेश व म्यानमारसारख्या राष्ट्रांतही चीनची घुसखोरी सुरू आहे. भूतानच्या सीमेवरील डोकलामला चिनी सैन्य जबरदस्तीने उभे करून हिंदुस्थानची डोकेदुखी वाढविण्याचे काम चीन करीत आहे, पण या एकाही विषयावर दोन देशांत चर्चा झाली नाही. 
अरुणाचलच्या सीमेवर हिंदुस्थानच्या हद्दीत चीनने बांधकामे सुरू केली आहेत. तिथून व उत्तराखंडात चिनी सैन्य नेहमीच घुसखोरी करीत असते. ही घुसखोरी लेह-लडाखपर्यंत सुरूच असून या विषयावरसुद्धा मोदी व शी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली नाही. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरचा मार्ग पाकच्या ताब्यातील कश्मीरमधून जातो व आधीच्या मनमोहन सिंग सरकारने त्यास विरोध केला होता, पण हा गंभीर विषय दोघांच्या चर्चेत निघाला नाही. कोणत्याही वादग्रस्त विषयांवर बोलण्याचे टाळले असे आमच्या परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले. मग मोदी यांनी चीनला जाऊन नेमके काय केले? मोदी यांनी जिनपिंग यांच्याबरोबर वुहानच्या ईस्ट लेक तलावापाशी छान मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर दोघांनी तलावात नौकाविहार केला. नद्या कशा स्वच्छ ठेवाव्यात हे चीनकडून शिकायला हवे असे त्यानंतर मोदी यांचे मत पडले, आपल्या देशातील गंगा-यमुना वगैरे नद्या आजही अस्वच्छ आहेत व त्यावर शेकडो कोटींचा खर्च सुरूच आहे. चीनसारख्या राष्ट्रात जाऊन मोदी यांनी फक्त नद्याच पाहिल्या काय? तसे नाही. चीनला बरे वाटणार नाही व चहात मिठाचा खडा पडेल म्हणून त्यांनी ‘डोकलाम’चा विषय टाळला, पण जगाला दहशतवादापासून कसा धोका निर्माण झाला आहे यावर मात्र दोघांचे एकमत झाले आहे. 
अर्थात पाककडून दहशतवाद्यांना पोसण्याचे जे ‘महान’ कार्य सुरू आहे त्यावर चर्चेत एका शब्दाने उल्लेख झाला नाही. खरं म्हणजे पाकिस्तानला चीनने मदत करणे थांबवले तर दहशतवादास पायबंद बसेल ही वस्तुस्थिती असली तरी पाकिस्तानला आर्थिक रसद पुरविण्याचे काम चीन करीत आहे. तेव्हा पाकिस्तानचा उल्लेख टाळून दहशतवादावर प्रहार कसा होऊ शकतो? पण तरीही दोघांत चर्चा उत्तम झाली व दोन देशांतील सीमांवर शांतता नांदावी यावर एकमत झाले. चहाच्या टेबलावर चर्चा होत असताना मोदी यांनी स्वतः हातात चहाची किटली घेतली व हिंदुस्थानात चहा कसा बनवला जातो याची माहिती चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिली. त्यामुळे चीनचे नेते खूश झाले. मोदी यांना चीनच्या सीमेवर शांतता हवी आहे. पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निदान निवडणूक काळात चीनने कटकटी वाढवू नयेत. एकदा निवडणूक होऊन जाऊ द्या, मग काय ते बघू अशी एकंदरीत मोदी यांची भूमिका दिसते. पंडित नेहरू यांनी चीनशी मैत्री केली ती अंगलट आली. नेहरू यांच्यावर टीका करण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत. मात्र नेहरू यांच्या ‘पंचशील’च्याच मार्गाने सध्याचे पंतप्रधान चीनचा प्रश्न सोडवू पाहत आहेत. नेहरू हे ‘पंचशील’चे उद्गाता होते. मोदी हे पंचसूत्राचे पाठीराखे बनले पण विचार नेहरूंचाच आहे. ‘‘युद्ध नको तर बुद्धच हवा’’ हे नेहरूंप्रमाणे विद्यमान पंतप्रधान मोदी यांनाही पटले आहे असे दिसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यावर काय म्हणणे आहे?

Web Title: Uddhav Thackeray Criticized PM Narendra Modi over his china tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.