'हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही?', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 07:45 AM2018-05-24T07:45:40+5:302018-05-24T07:45:40+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ''पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय मित्रपरिवार बराच वाढला आहे.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ''पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय मित्रपरिवार बराच वाढला आहे. मोदी हे जागतिक दर्जाचे नेते बनले आहेत. त्याविषयी आता आमच्या मनात शंका नाही. पुतीन, ट्रम्प, जर्मनीच्या चॅन्सलरबाई हे मोदींचे खास मित्र झाले आहेत, पण हिंदुस्थानच्या सीमेवर कोणी आपला म्हणून मित्र उरला आहे काय? श्रीलंका, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, भूतानपर्यंत चीन पद्धतशीर घुसला आहे. चीन जबडा उघडून एक एक प्रदेश गिळत आहे. आम्ही मात्र सगळय़ांना मित्र मानण्यातच पुरुषार्थ मानत आहोत. नेपाळ आमचे ऐकत नाही. तेथे इतरांकडून काय अपेक्षा करावी'', अशा शब्दांत त्यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान मोदींना टार्गेट केले आहे.
- काय आहे आजचे सामना संपादकीय?
हिंदुस्थानला काही परराष्ट्र नीती आहे की नाही? असा प्रश्न रोज पडत आहे. प्रत्येक पातळीवर परराष्ट्र नीती कोसळत आहे, तरी पंतप्रधानांचे विमान नवा देश बघण्यासाठी रोज आकाशात झेपावत आहे. ही आपली परराष्ट्रनीती. बाजूचे नेपाळसारखे राष्ट्रदेखील आमच्या ‘मन की बात’ ऐकायला तयार नाही. पंतप्रधान मोदींच्या नेपाळ दौऱ्यानंतर लगेच नेपाळचे पंतप्रधान ओली हे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर पळाले आहेत. चीनचे फर्मान आल्याशिवाय नेपाळचे पंतप्रधान असे पार्श्वभागास पाय लावून पळणार नाहीत. पंतप्रधान मोदी हे नेपाळात गेले व म्हणाले, ‘‘नेपाळ हा आमचा सदाबहार मित्र आहे,’’ पण हा मित्र चीनच्या कच्छपी लागला आहे व हिंदुत्वाची भगवी वस्त्रं फेकून त्याने चेहऱ्यावर लाल बुरखा ओढला आहे. चीनचा मांडलिक देश म्हणून आज नेपाळचे अस्तित्व उरले आहे. आश्चर्य म्हणा किंवा धक्कादायक म्हणा, या वर्षीच १५ फेब्रुवारी रोजी के.पी. ओली यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारली व तेव्हापासून त्यांनी पाचवेळा चीनचा दौरा करून आपली चीन निष्ठा व्यक्त केली. असा हा नेपाळ आमच्या पंतप्रधानांना सदाबहार दोस्त वाटत आहे. पंतप्रधान मोदी यांनी नेपाळचा दौरा आटोपताच काठमांडूमधील चीनच्या दूतावासाने नेपाळच्या पंतप्रधानांना चीन दौऱ्याचे अधिकृत आमंत्रण दिले. आमंत्रण हा शब्द तसा सभ्य वाटतो. तेव्हा चीनने नेपाळच्या पंतप्रधानांच्या नावे काढलेले ‘समन्स’ असेच म्हणणे जास्त योग्य वाटते.
त्याआधी नेपाळचे विदेश मंत्री तिबेटचा दौरा करून आले. तिबेट हा चीन व हिंदुस्थानातील कायम वादाचा विषय राहिला. नेपाळच्या भूमीवर चीनने सरळ आक्रमणच केले आहे. तेथे हिंदू संस्कृतीचे काही अवशेष आज उरलेले दिसत आहेत. हिंदूंची मंदिरे आहेत. श्रद्धास्थाने आहेत. तेथे घंटा बडवल्या जातात, पण ते आता हिंदुराष्ट्र उरलेले नाही. चीनने लाल जाळ्यात अडकवून नेपाळचा भगवा रंग नष्ट केला व हिंदुस्थान ते आक्रमण उघड्या डोळय़ाने पाहात बसला. नेपाळी जनतेचे ‘चिनी’करण सुरू आहे व तेथील जनतेला चिनी भाषा शिकविण्यासाठी दोन हजार चिनी ‘टय़ुटर्स’ची नियुक्ती झाली आहे. उद्या डोकलाम, सियाचीन, लेह-लडाखप्रमाणे नेपाळच्या भूमीवर चिनी सैन्याचे तळ उभे राहतील व हिंदुस्थानात जशी एक ‘गुरखा’ रेजिमेंट देशरक्षणासाठी सज्ज असते तशी एखादी नेपाळी रेजिमेंट चीन आमच्याविरुद्ध उभी केल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व घडत असताना आमचे परराष्ट्र धोरण नक्की कोठे पेंड खात आहे? आमचे पंतप्रधान मधल्या काळात चीनलाही गेले व तेथील राज्यकर्त्यांबरोबर ‘चाय पर चर्चा’ करून आले. चीन आपला मित्र आहे असे सांगायला ते विसरले नाहीत. पंतप्रधान मोदी नेपाळात गेले, तेथे त्यांच्या सुरक्षेसाठी सात हजार सुरक्षा रक्षक तैनात केले होते. (व्वा, क्या बात है!) मोदींनी नेपाळात जाऊन कोणते राजकारण केले? ते आधी जनकपुरीस गेले व तेथे तासभर पूजाअर्चा केली. राम-जानकी मंदिरात ते जाऊन आले. जनकपूरनंतर ते सरळ मुस्तांगला गेले.
तेथेही मुक्तिनाथ मंदिरात त्यांनी ‘टी.व्ही.’ कॅमेऱ्यासमोर जाहीर पूजाअर्चा केली. नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आधीच जाहीर केले होते की, हिंदुस्थानी पंतप्रधानांची नेपाळ यात्रा राजकीय नसून धार्मिक आणि सांस्कृतिक आहे. त्यामुळे कोणतेही राजकीय करारमदार होणार नाहीत. हे काय गौडबंगाल आहे? आपले पंतप्रधान फक्त धार्मिक व सांस्कृतिक दौऱ्यावर सरकारी खर्चाने जातात. त्याचे वृत्त हिंदुस्थानच्या वृत्तवाहिन्या दाखवत होत्या. त्या दिवशी कर्नाटकात विधानसभेचे मतदान सुरू होते व नेपाळातील ‘धार्मिक दौरा’ हा प्रचाराचाच भाग होता. परराष्ट्र नीतीचे हे अपयश आहे. परराष्ट्र खाते व परराष्ट्र व्यवहारमंत्री नक्की कोठे आहेत हे सध्याच्या राजवटीत कोणीच सांगू शकत नाही. पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय मित्रपरिवार बराच वाढला आहे. मोदी हे जागतिक दर्जाचे नेते बनले आहेत. त्याविषयी आता आमच्या मनात शंका नाही. पुतीन, ट्रम्प, जर्मनीच्या चॅन्सलरबाई हे मोदींचे खास मित्र झाले आहेत, पण हिंदुस्थानच्या सीमेवर कोणी आपला म्हणून मित्र उरला आहे काय? श्रीलंका, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, भूतानपर्यंत चीन पद्धतशीर घुसला आहे. मालदीव, श्रीलंकेत सैन्यतळ व चिनी उद्योगांची उभारणी सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या धार्मिक यात्रा सुरू आहेत आणि चीन जबडा उघडून एक एक प्रदेश गिळत आहे. आम्ही मात्र सगळ्यांना मित्र मानण्यातच पुरुषार्थ मानत आहोत. नेपाळ आमचे ऐकत नाही. तेथे इतरांकडून काय अपेक्षा करावी?