Join us

आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे 2019मध्ये भाजपाला मदत करतील -उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 7:45 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असदुद्दीन औवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणूक 2019साठी सर्व पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. युती-आघाडीच्या रणनीतींमध्ये राज्यात एक मोठी घडामोड घडली आहे. 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ एकत्रित लढणार असल्याची घोषणा एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी केली आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. 

''दलितांनी दलित म्हणूनच डबक्यात राहावे व मुसलमानांनी देशाचे नागरिक म्हणून नाही, तर फक्त मुसलमान म्हणूनच जगावे यासाठी डबकी तयार केली जातात. प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले आहे. दलित व मुसलमानांनी एकत्र येऊन ही डबकी उधळून लावली पाहिजेत. 2019 च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ व कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव आहे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल चढवला आहे. 

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे :- आंबेडकर-ओवेसी अधिकृतपणे एकत्र आल्यामुळे जनतेच्या मनातील संभ्रम संपला. हे दोघेही कालपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सोयीचे राजकारण पडद्यामागून करीत होते. आता ते दोघे उघड उघड हातात हात घालून 2019 सालात भाजपास मदत करतील. - त्या दोघांचे एकत्र येणे हे हिंदुस्थानच्या राजकारणासाठी शुभसंकेत नाहीत. आंबेडकर व ओवेसी यांनी उघडपणे भारतीय जनता पक्षाबरोबर जायला हवे होते, पण ‘वंचित बहुजन आघाडी’च्या नावाखाली आंबेडकर-ओवेसी यांनी नवा तंबू टाकला आहे. - दोघांची भाषा ‘सेक्युलर’ म्हणजे धर्मनिरपेक्षतेची असते, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, भूमिका व संविधान या त्रिसूत्रीशी दोघांचाही संबंध नाही. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व दलित संघटनांना एकत्र आणून ऐक्याची तुतारी फुंकावी असे अनेकांना वाटत होते. - आठवले गट, गवई गट, कवाडे गट, कांबळे गट व स्वतः प्रकाश आंबेडकर यांचा वेगळा गट असे रिपब्लिकन पक्षाचे तुकडेताकडे झाले आहेत. या सर्व गटातटांना एकत्र आणून मोठा एल्गार करण्याची गरज असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमच्या ओवेसीबरोबर हातमिळवणी केली हे दलित बांधवांना रुचेल काय? - सहा कोटी दलित बांधवांसह हिंदू धर्माचा त्याग करून नवा मार्ग स्वीकारण्याचे ठरवले तेव्हा ‘‘मुस्लिम धर्म स्वीकारा’’ ही पाकड्यांची ऑफर धुडकावून बाबासाहेबांनी देशाच्या मुख्य प्रवाहात राहणे पसंत केले. डॉ. आंबेडकर महामानव होते. त्या महामानवास छोटा करण्याचे प्रयत्न त्यांचेच वारसदार करतात तेव्हा वाईट वाटते. - ओवेसीची भाषा अस्थिरता आणि अराजक निर्माण करणारी असते. ती प्रकाश आंबेडकरांना मान्य आहे काय? त्यांना दलितांचे न्याय्य हक्क हवे आहेत, पण म्हणजे नक्की काय हवे आहे? दलितांची माथी भडकवायची. - त्यांच्या मनात अशांततेचे विचार टाकायचे व राज्यात दंगलींचा धूर काढायचा, असा ओवेसीबरोबरच्या आघाडीचा अर्थ उद्या कोणी काढला तर त्याचे काय उत्तर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आहे? पुन्हा रोटी, कपडा व मकान यासाठी त्यांच्या आघाडीकडे काय कार्यक्रम आहे? बेरोजगारीवर कोणता उतारा आहे? - दलित वस्त्यांतील राजकारण भडकत ठेवायचे व आपापसात दुही माजवायची हे सर्व दलित संघटनांचे आजवरचे धोरण राहिले आहे. त्यामुळे दलदल वाढली आहे. मुसलमानांच्या बाबतीतही वेगळे काही घडत नाही.  

टॅग्स :असदुद्दीन ओवेसीप्रकाश आंबेडकरनिवडणूकउद्धव ठाकरे