Join us

भय्याजी जोशींवर राजद्रोहाच्या गुन्ह्याची उद्धव ठाकरेंची मागणी; भाजप-उद्धवसेनेत खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 06:23 IST

मराठीचा अवमान हा संघाचा व भाजपचा छुपा अजेंडा आहे. हिंमत असेल तर जोशी यांनी अशी भाषा अहमदाबाद, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, बंगालमध्ये करून दाखवावी आणि सुखरूप परत येऊन दाखवावे, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणारा प्रशांत कोरटकर हा चिल्लर माणूस असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मग आता मराठी भाषेचा अवमान करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी काय आहेत असा सवाल करत उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोशी यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माध्यमांशी बोलताना केली.

मराठीचा अवमान हा संघाचा व भाजपचा छुपा अजेंडा आहे. त्यांचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. हिंमत असेल तर जोशी यांनी अशी भाषा अहमदाबादमध्ये करून दाखवावी. तामिळनाडू कर्नाटक केरळ बंगालमध्ये करून दाखवावी आणि सुखरूप परत येऊन दाखवावे, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.

हुतात्मा स्मारकावर शपथ

महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुरुवारी दुपारी हुतात्मा चौक येथे जाऊन हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. तुमच्या बलिदानाची शपथ घेतोय...कुणी कितीही विष कालवले तरी मराठी माणूस महाराष्ट्रापासून मुंबई कुणालाही हिसकावू देणार नाही, मुंबईची वाटणी होऊ देणार नाही, अशी शपथ घेतली.

आमदारांमध्ये वाक् युद्ध

विधानसभेत भास्कर जाधव यांनी भैयाजी जोशींच्या विधानाचा मुद्दा उचलल्यानंतर उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे बोलायला उभे राहिले अन् समोरून मंत्री नितेश राणे त्यांना खाली बसा असे म्हणताच भाजप व उद्धवसेनेच्या आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. मंत्री आशिष शेलार, योगेश सागर, अमित साटम, प्रवीण दटके आदी अनेक आमदार समोर आले आणि वाक् युद्ध सुरू झाले. उद्धवसेनेचे आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, भास्कर जाधव, अजय चौधरी, सुनील प्रभू आदी आमदार आक्रमक झाले. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेराष्ट्रीय स्वयंसेवक संघ