मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या जोरदार हल्लाबोल चढवला आहे. मालेगाव-दाभाडी परिसरातील हिरे कुटुंबीयांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी केली. याचाच संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ''भाजपने किंवा फडणवीस यांनी दत्तक घेतले याची गंमत श्री. शरद पवार यांना वाटते, पण पवारांचा राष्ट्रवादी पक्ष तर दत्तक विधानांवरच टिकून आहे. दत्तकांच्या जोरावर राजकीय ‘मांडय़ां’ना बळकटी मिळणे हा विचारांचा पराभव आहे. बाप कोण, पोरे कोण काहीच कळत नाही. गमतीतही गोंधळ आहे'', अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.
सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे - मालेगाव-दाभाडी परिसरातील हिरे कुटुंबीयांनी मोठा प्रवास करीत, अनेक कोपर्यांवर, वळणांवर थांबत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. अखेरच्या क्षणी ते भारतीय जनता पक्षात असल्याचे समजते. हिरे मंडळी भाजपातून राष्ट्रवादीत आली याचा आनंद पवार यांना झाला आहे व त्याच भरात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला मारला आहे. पवार अगदी गमतीने म्हणाले की, ‘काहींनी सांगितले की मी नाशिक जिल्हा दत्तक घेतो. मला गंमत वाटली. आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे. आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही. - दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही. स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने घर चालवणारे लोक आहोत.’ असे पवारांचे म्हणणे आहे. त्यांचा हा टोला मुख्यमंत्री फडणवीस किंवा भाजपला असला तरी तो खुद्द पवारांनाही लागू पडतो. - भारतीय जनता पक्ष हा काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे पक्षांकडून उधारीवर घेतलेल्या लोकांमुळे चालला आहे. थोडक्यात, पक्षात भेसळ आहे हे भाजपने मान्य केले. तुरुंगातून सुटलेले अनेक ‘वाल्या’ व पोलीस ठाण्याच्या पायरीवर सदैव उभे असलेले लोक अशी मंडळी पावन करून घेणे व निवडणूक जिंकणे हा 2014 पासून भाजपचा धंदा झाला आहे. - येनकेनप्रकारेण निवडून येऊ शकतील अशा सर्वपक्षीय मंडळींना ‘दत्तक’ घेऊन भाजपने गेल्या चार वर्षांत विधानसभेपासून जिल्हा परिषदांपर्यंत निवडणुका जिंकल्या. याचा सगळ्यात मोठा फटका राष्ट्रवादीला बसला. राष्ट्रवादीतलीही अनेक तालेवार खानदाने बेडकासारख्या उड्या मारत भाजपच्या तळ्यात गेली. ही खानदाने आता स्वगृही परतू लागली आहेत व उद्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागताच भाजपच्या मांडीवरील अनेक दत्तक विधाने वार्याच्या झुळकीबरोबर खालसा होतील. मालेगाव-दाभाडीची हिरे मंडळी त्याच बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन स्वगृही परतली. पण सध्याचे राजकारण हे असेच आहे. - पवारांचा राष्ट्रवादी पक्ष तर दत्तक विधानांवरच टिकून आहे. छगन भुजबळ, गणेश नाईक, धनंजय मुंडे ही सर्व मंडळी काय राष्ट्रवादीच्या गर्भातून जन्मास आली? दुसर्यांचीच पोरे मांडीवर घेऊन तुम्हीही तुमचे आजपर्यंतचे राजकारण पुढे रेटले आहे. - त्यामुळे राजकारणाचा उकिरडा झाला आहे व कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही तो याच दत्तक विकृतीमुळे. खरे तर मूल दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया अत्यंत जाचक, कठोर व पारदर्शक आहे. पण राजकारणात कोण कुणाच्या मांडीवर दत्तक म्हणून बसेल व नंतर तीच मांडी फोडून ते दत्तक विधान पुन्हा दुसर्या मांडीवर कधी उडी मारेल ते सांगता येत नाही. - श्री. पवार म्हणतात, आपल्याला दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. हा दिव्य संदेश असला तरी दुसर्यांची पोरे पळविण्यासाठी आता श्री. पवारही कणकवलीपासून करमाळ्यापर्यंत दौरा करीत आहेत. विचार, नीतिमत्ता संपली की दत्तक विधान करावे लागते. नाशकात हिरे मंडळीचे भुजबळांशी पटत नव्हते. म्हणून ही मंडळी भाजपात गेली. आता भुजबळांना बळ देण्यासाठी दत्तक मांडी फोडून ती पुन्हा राष्ट्रवादीत आली. - सध्या जगात ‘सरोगसी मदर’ या नव्या माध्यमातून अपत्यप्राप्ती केली जाते. म्हणजे एखाद्या विवाहितेला गर्भधारणा होणे अशक्यच असेल तर दुसर्या स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ वाढवला जातो. अर्थात त्यासाठी अनेक कायदेशीर सोपस्कार आणि बंधने पाळावी लागतात. - सध्याच्या राजकारणात मात्र सर्रास बेकायदेशीर आणि अनैतिक ‘राजकीय दत्तक’ विधान केली जात आहेत. राजकीय पक्षांमधील ‘जिंकून येणार्यां’ची घाऊक पळवापळवी केली जात आहे. एकीकडे पक्षांतर बंदीचे कायदे करायचे आणि दुसरीकडे राजकीय दत्तक विधानांसाठी राजकीय ‘मांड्या’ भाडेपट्टीवर उपलब्ध करून द्यायचा असा सगळा प्रकार सुरू आहे.