मुंबई - देशातील सर्व गावे वीज‘युक्त’ झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 एप्रिलला केला. मात्र, असे काहीही न झाल्याचा विरोधकांचा प्रतिदावा आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.''‘युक्त’ आणि ‘मुक्त’च्या मंथनात सध्या संपूर्ण देशच घुसळून निघत आहे. त्यातून अनेक ‘रत्ने’ निघाली, असा सरकारचा दावा आहे. आता सर्व खेडी प्रकाशमान केल्याचे ‘अमृत’ही निघाले असे राज्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विरोधक मात्र ते ‘हलाहल’ असल्याचा दावा करीत आहेत. राज्यकर्त्यांचा वादा खरा की विरोधकांचा दावा, या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल. तूर्त सामान्य जनता मात्र या मंथनातून ‘चौदावे रत्न’ कधी बाहेर येते आणि ते या मंडळींना कधी दाखवायला मिळते याच्या प्रतीक्षेत आहेत. कारण प्रकाशाचे अमृत आणि अंधाराचे हलाहल या मतलबी राजकारणात विजेखाली ‘अंधारा’चा अनुभव शेवटी जनतेलाच घ्यावा लागत आहे'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याच्या दाव्यावर टीका केली आहे.
- काय आहे आजचे सामना संपादकीय?आपल्या देशाचे राजकारण मागील तीन-चार वर्षांपासून ‘युक्त’ आणि ‘मुक्त’ या दोन शब्दांभोवतीच फिरताना दिसत आहे. सरकारचे सगळेच दावे आणि विरोधकांचे त्यावरील प्रतिदावे कधी ‘युक्त’कडून ‘मुक्त’कडे, तर कधी ‘मुक्त’कडून ‘युक्त’कडे हेलकावे घेत असतात. देशातील सर्व गावे वीज‘युक्त’ झाल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा आणि तसे काही नसल्याचा विरोधकांचा प्रतिदावा सध्या असाच इकडून तिकडे फिरत आहे. १५ ऑगस्ट २०१५ रोजी बोलताना वीज न पोहोचलेल्या देशातील १८ हजार ४५२ गावांत एक हजार दिवसांत वीज पोहोचविण्याचा संकल्प पंतप्रधानांनी जाहीर केला होता. त्याला अनुसरून २८ एप्रिल २०१८ रोजी मणिपूर राज्यातील लिसांग हे गाव ‘वीजयुक्त’ झाल्याचे जाहीर झाले आणि देशातील सर्व खेडी प्रकाशमान करण्याच्या संकल्पाची पूर्तता झाली असा दावा पंतप्रधानांनी केला. मात्र त्यांचा हा दावा नेहमीप्रमाणे आक्षेपांच्या कचाटय़ात सापडला आहे. मोदी सरकार सत्तेत आले त्याचवेळी देशातील ५ लाख ८० हजार खेडी वीजयुक्त झाली होती असे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तीन वर्षांच्या कारकीर्दीत १८ हजार गावे विजेने जोडल्याचा ढोल पिटणारे केंद्र सरकार देशातील सर्व खेडी ‘प्रकाशमान’ केल्याचे श्रेय कसे घेऊ शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अर्थात विद्यमान केंद्र सरकारच्या बहुतेक सर्वच दाव्यांबाबत यापेक्षा वेगळे घडलेले नाही. तेव्हा सर्व खेडी वीजयुक्त केल्याचा दावादेखील आक्षेपांच्या तावडीत सापडावा यात आश्चर्यकारक असे काही नाही. बरं, केंद्र सरकारचा हा दावा खरा मानला आणि सर्व खेडी वीजयुक्त झाली हे गृहीत धरले तरी त्याचा अर्थ प्रत्येक ‘अंधारमुक्त’ झाले असा होत नाही. खुद्द सरकारलाही ते बहुधा मान्य असावे. कारण त्यासाठीच ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ देशभरात राबवली जात आहे. एका अधिकृत माहितीनुसार ग्रामीण भागातील १७ कोटी ९२ लाख घरांपेक्षा १३ कोटी ८७ लाख घरांना वीज जोडणी झाली आहे. म्हणजेच उर्वरित सुमारे ४ कोटी ५ लाख घरे आजही विजेशिवाय अंधारात चाचपडत आहेत. महाराष्ट्रापुरता विचार केला तर वीज जोडणीबाबत तुलनेने प्रगती असली आणि सुमारे ९८ टक्के घरांना वीज कनेक्शन मिळाले असले तरीही अडीच लाख घरे विजेपासून वंचित आहेत. म्हणजे खेडी वीजयुक्त झाल्याचा सरकारचा दावा खरा मानला तरी त्याच खेडय़ांमधील लाखो घरे अद्याप ‘वीजमुक्त’च आहेत आणि सरकारच हे मान्य करीत आहे. पुन्हा जी खेडी आणि घरे प्रकाशमान झाली आहेत त्यातील किती खेडी आणि घरांना २४ तास वीजपुरवठा होतो हादेखील प्रश्नच आहे. देशभरातील फक्त सहाच राज्यांत सरासरी २४ तास वीजपुरवठा होतो असे सरकारी आकडेवारीच सांगते. म्हणजे उर्वरित सर्व राज्ये आणि त्यातील लाखो खेडय़ांत ‘विजेखाली अंधार’ अशीच परिस्थिती आहे. तरीही देशातील सर्व खेडी वीजयुक्त झाल्याचे दावे केले जात आहेत. त्याच्या समर्थनासाठी थेट ‘नासा’चे फोटो सोशल मीडियावर टाकले जात आहेत. सर्वच बाबतीत फक्त ‘युक्त’ आणि ‘मुक्त’ या शब्दांचाच दांडपट्टा फिरत असल्यावर वेगळे काय होणार? ‘युक्त’ आणि ‘मुक्त’च्या मंथनात सध्या संपूर्ण देशच घुसळून निघत आहे. त्यातून अनेक ‘रत्ने’ निघाली, असा सरकारचा दावा आहे. आता सर्व खेडी प्रकाशमान केल्याचे ‘अमृत’ही निघाले असे राज्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विरोधक मात्र ते ‘हलाहल’ असल्याचा दावा करीत आहेत. राज्यकर्त्यांचा वादा खरा की विरोधकांचा दावा, या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल. तूर्त सामान्य जनता मात्र या मंथनातून ‘चौदावे रत्न’ कधी बाहेर येते आणि ते या मंडळींना कधी दाखवायला मिळते याच्या प्रतीक्षेत आहेत. कारण प्रकाशाचे अमृत आणि अंधाराचे हलाहल या मतलबी राजकारणात विजेखाली ‘अंधारा’चा अनुभव शेवटी जनतेलाच घ्यावा लागत आहे.