शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व आणि घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या भाजपावर जोरदार हल्ला चढवला. मुंबईतील रंगशारदा येथे शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेट पदाधिकाऱ्यांना संयुक्त मेळाव्यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना ज्यांना घराण्यांचा आगापिछा नाही ते घराणेशाहीवर टीका करतात, असा टोला लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हापासून मी शिवसेनेची सूत्रं हाती घेतली. जे संस्कार असतात घरामध्ये. त्याला मग ज्यांना घराण्याचा आगापिछा नाही त्यांनी घराणेशाही म्हणत टीका करू देत. मला त्याची पर्वा नाही. निदान मी म्हणेन की आमच्या घराण्याचा इतिहास तरी आहे. पण जे आमच्यावर टीका करतात, त्यांना विचारायचं आहे की, तुमचा इतिहास काय आहे? आमच्या सहा-सात पिढ्या महाराष्ट्राच्या चरणी समर्पित होऊन जनसेवा करताहेत. म्हणून आणि म्हणूनच भाजपा अख्खा समोर उभा राहिला तरी तो उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे नव्हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संपवू शकत नाही, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आणि तुम्हीही म्हणालात की प्रबोधनकारांचं हिंदुत्व. आहेच आमचं हिंदुत्व हे असंच आहे. प्रबोधनकारांचं हिंदुत्व, बाळासाहेबांचं हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व, आदित्य ठाकरेंचं हिंदुत्व आणखी कोणाचं हिंदुत्व हे वेगवेगळं नाही. हिंदुत्व हे हिंदुत्वच आहे. ते बदलूच शकत नाही. पण काळानुरूप आपल्याला काही भूमिका घ्याव्या लागतात. तशा त्या प्रबोधनकारांनी घेतल्या, बाळासाहेबांनी घेतल्या. तशा त्या आता मी घेतोय, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मुळात आम्ही हिंदू हिंदू म्हणजे आहोत कोण. भाजपाला आज मी पुन्हा आव्हान देतोय की, मला वाडवडलांनी शिकवलंय की, आपलं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. आम्हाल केवळ देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, तर आम्हाल अतिरेक्यांना बडवणार हिंदू हवाय, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे. पण गेली नऊ वर्षे झाली. जगातील सर्वात शक्तिशाली नेता, विश्वगुरू राज्य करत असताना हिंदूंना जनआक्रोश मोर्चे काढावे लागतात, मग तुमचं हिंदुत्व गेलं कुठे, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.