मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदारांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये एकत्र येत शपथ घेतली. संविधानाला साक्ष घेऊन आमदारांनी पक्षाविरोधात कोणतंही कृत्य करणार नाही अशी शपथ घेतली. यावेळी बोलताना शरद पवारांनी नवीन आमदारांना सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका, तुमची जबाबदारी माझी वैयक्तिक आहे, व्हिपचा अधिकार पक्षातून बाजूला केलेल्याला नाही असं सांगत आमदारांना शब्द दिला. तर, उद्धव ठाकरेंनीही आपण आलोय, असे म्हणत सत्ता स्थापनेचा दावा केलाय.
आपली लढाई केवळ सत्तेसाठी नाही. सत्यमेव जयते होऊ द्यायचे. त्यांनी, मी पुन्हा येईन म्हटले. पण आता, आम्ही आलेलो आहोत, आमचा रस्ता मोकळा करा. आडवे आलात तर ओलांडून वगैरे काय करायचे ते दाखवू. एकजुटीने आलो आहोत. केवळ पुढच्या पाच वर्षासाठी नाही तर पाचचा पाढा सुरू करण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनीकाँग्रेस-भाजपा आणि शिवसेनेच्या आमदारांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. तसेच, हे दृश्य बघून आता त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन भूमिका घेतली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ज्या व्यक्तीला पक्षात दूर करण्याचा, अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला त्यांना पक्षाला कोणताही आदेश देण्याचा अधिकार नाही, घटनातज्ज्ञ, संसदेतील दिग्गज तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली. आदेश देण्याचा अधिकार अजित पवारांना नाही, जे अशा गोष्टी करतायेत ते संभ्रम निर्माण करण्याचा काम करत आहेत. याबाबत नवीन आमदारांनी निश्चिंत राहा असं त्यांनी सांगितले.