Uddhav Thackeray Melava: आज दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदारांवरही निशाणा साधला. 'गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मेळावे झाले, असा मेळावा पहिल्यांदाच झाला. तुमचे प्रेम पाहून शब्द सूचत नाहीये. हे प्रेम विकत मिळत नाही, हे ओरबाडून घेता येत नाही. ही कोरडी गर्दी नाही, ही माझ्या जीवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'एकही माणूस भाड्याने आणला नाही'ते पुढे म्हणाले, 'मला तुमच्या प्रेमाचे संरक्षण मिळाले आहे. आपल्या पक्षात गद्दारांनी गद्दारी केली, हा गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही. अनेकांना प्रश्न पडला की, शिवसेनेचे काय होणार. माझ्या मनात चिंता नव्हती. ज्यांनी हे कार्य सोपवले आहे, तो बघून घेईल. आज शिवतीर्थ पाहून त्यांना वाटतंय गद्दारांचे आता काय होणार. इथे एकही माणूस भाड्याने आणला नाही. कोणालाही विचारा, एकही माणूस विकत आणला नाही. इथे आलेले सर्व एकनिष्ठ आहेत. हीच ठाकरे कुटुंबाची खरी कमाई आहे.'
'हा 50 खोक्यांचा 'खोकासूर' आलाय'ते पुढे म्हणाले, 'दरवर्षी परंपरेप्रमाणे मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. याळेस रावन वेगळा आहे. काळ बदलो, तसा रावन बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता, आता 50 खोक्यांचा रावण झालाय. हा 50 खोक्यांचा 'खोकासूर' आहे. माझी शस्त्रक्रिया झाली, तेव्हा माझी बोटही हालत नव्हती. तेव्हा मी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती, तेव्हा हा 'कट्टपा'(एकनाथ शिंदे) कट करत होता. पण, त्यांना कल्पना नाही, हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. माझ्या शक्तीशी पंगा घेतलेला आहात, देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही. तेजाचा शाप आहे. आई जगदंबा माझ्या पाठीशी आहे. '