"उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना नक्कीच २ पाऊलं पुढे नेली"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 12:41 PM2023-08-10T12:41:39+5:302023-08-10T13:06:19+5:30
संजय राऊत म्हणतात की, मराठी माणूस ज्याला तुम्ही घाटी, कोकणी म्हणून हिणवत होता त्या माणसाला प्रतिष्ठा म्हणून शिवसेना स्थापन झाली.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाच्या पोडकास्टसाठी गेल्या महिन्यात मुलाखत घेण्यात आली. या पॉडकास्टमध्ये संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी, राऊत यांनी शिवसेना आणि शिवसेनेतील बंडावरही प्रश्न विचारले होते. आता, स्वत: संजय राऊत या पॉडकास्टचे पाहुणे आहेत. या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात राऊत बेधडकपणे भाष्य करताना दिसतात. त्यात, ते शिवसेना पक्षाबद्दलही बोलत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी नक्कीच दोन पाऊले पुढे नेलीय, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणतात की, मराठी माणूस ज्याला तुम्ही घाटी, कोकणी म्हणून हिणवत होता त्या माणसाला प्रतिष्ठा म्हणून शिवसेना स्थापन झाली. मित्रपक्षाने फसवले म्हणून शिवसेना थांबली का? संपली का?, हे जे कोणी बोलातयेत ते माझ्या भाषेत चुXX आहेत असंही त्यांनी म्हटलं. तसेच, शिवसेनेतील बंडाचा पक्षावर काहीही परिणाम झाला नाही. याउलट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात बाळासाहेबांची शिवसेना दोन पाऊले पुढे गेली, असेही राऊत यांनी म्हटल्याचं टीझरमध्ये दिसून येते.
शिवसेना अग्निकुंड आहे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून त्यांनी बाळासाहेबांची संघटना नक्कीच दोन पाऊले पुढे नेली, असे राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षात मोठी फूट पडली असून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ४० आमदार आणि १३ खासदारांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्त्व सोडून शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासह अनेक नगरसेवक व कार्यकर्त्यांनीही शिंदेंच्या नेतृत्त्वात पक्षप्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत खिंडार पडल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, शिवसैनिकांचा दाखला देत राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेना दोन पाऊले पुढे गेल्याचं म्हटलं आहे.
भाजपावर टीका
भाजपानं ज्यापद्धतीने आमच्याशी वर्तवणूक केली त्यांना क्षमा नाही. महापालिका निवडणुका नाहीत. लोकसभा घेतील का नाही माहिती नाही. हे लोक जनतेला घाबरतात आणि जे जनतेला घाबरतात तो नेता नाही, असा टोलाही राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.