'मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचा विसर, विधानसभेत काहीच भूमिका मांडली नाही'
By महेश गलांडे | Published: March 4, 2021 04:46 PM2021-03-04T16:46:14+5:302021-03-04T16:48:24+5:30
मुख्यमंत्री आजच्या भाषणामधून सगळीकडे फिरून आले. मात्र अखेरपर्यंत त्यांच्या भाषणात महाराष्ट्र आलाच नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
मुंबई- राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला होता. (CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha) मात्र आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेल्या भाषणाची चिरफाड केली आहे. मुख्यमंत्री आधी नवखे होते. आता, त्यांना पद सांभाळून बरेच दिवस झाले आहेत. मात्र अजूनही त्यांना चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातील फरक कळलेला नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तर, दुसरीकडे आमदार नरेंद्र पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणात मराठा आरक्षण विषयच आला नसल्याचं त्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री आजच्या भाषणामधून सगळीकडे फिरून आले. मात्र अखेरपर्यंत त्यांच्या भाषणात महाराष्ट्र आलाच नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. (Devendra Fadanvis Criticize CM Uddhav Thackeray's Speech in Assembly ) विधिमंडळामध्ये राज्यपालांच्या अभिषाणावर झालेल्या चर्चेवेळी विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढत मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले होते. त्यानंतर सभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. तसेच भाजपा आणि केंद्र सरकारला लक्ष्य करत सरकारवरील आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या उत्तराला जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच इतरही भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर बोचरी टीका केली. आता, शिवसेना नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन मुख्यमंत्र्याना प्रश्न विचारला.
मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी खंबीर पाठींबा दिला होता. पण आज मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मराठा आरक्षण व इतर समांतर योजना तसेच MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नेमणुकी बद्दल काहीच भूमिका मांडली नाही.@CMOMaharashtra@OfficeofUT
— Narendra Patil (@NarendraMathadi) March 3, 2021
पाटील यांनी आणखी एक ट्विट करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा आरक्षण आणि एसईबीसी संदर्भात विधानसभेत बोला, असे सूचवले आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांना विसर पडला, आता तुमच्याकडूनच अपेक्षा आहे, असेही त्यांनी म्हटलंय.
आदरणीय दादा @AjitPawarSpeaks
— Narendra Patil (@NarendraMathadi) March 4, 2021
मुख्यमंत्र्यांना तर विधानसभेत विसर पडला,
असो हरकत नाही!
पण किमान तुम्ही तरी विधानपरिषदेत मराठा SEBC आरक्षण, MPSC विद्यार्थी, समांतर योजना यावर बोलाल, अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे! @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
भाषणात महाराष्ट्र आला नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता पद सांभाळून बरेच दिवस झाले आहेत. मात्र अजूनही त्यांना चौकातलं भाषण आणि सभागृहातलं भाषण यातील फरक कळलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सगळे उल्लेख केले. ते पंजाबमध्ये गेले, चीनमध्ये गेले, दिल्लीत गेले, अमेरिकेत गेले, दक्षिणेतही पोहोचले. मात्र त्यांच्या भाषणात महाराष्ट्र आला नाही.