मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा शिवसैनिकांच्या मनात होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वत: मुख्यमंत्री होऊन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं नव्हतं असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझाने घेतलेल्या विशेष मुलाखतीत केला आहे.
शरद पवार म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसवणार असल्याचा शब्द दिला होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शिवसैनिक हवं ते करायला तयार होते. त्याचप्रमाणे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा आहे असं अनेक कट्टर शिवसैनिकांच्या डोक्यात होतं. मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंतु शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्र धरुन चालायचे असेल तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा असे मी आदेश दिले. त्यानंतर त्यांनी विचार करुन मुख्यमंत्रिपद स्वीकरण्याचा निर्णय घेतला असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेची खात्री पटली त्याच दिवशी मी काँग्रेसच्या इतर नेत्यांशी न बोलता थेट सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. आणि हे करण्याची गरज असल्याचे सांगितले. माझ्या सभांचा लाभ काँग्रेसच्या उमेदवारांनाही झाला. जर वेगळी भूमिका घेतली तर त्याचे तोटे त्यांना होते. यामुळे भाजपा वगळून सरकार स्थापन होत असेल तर तात्विक कारणांना विरोध करू नये, त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे अशी चर्चा केल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.