Join us

Uddhav thackeray : 'उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवून पंढरपूरला गेल्याने महाराष्ट्रातून कोरोना गेला का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:02 AM

Uddhav thackeray : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान पाऊस असताना, समोरची दृष्यमानता कमी असतानाही, मुख्यमंत्र्यांनी सफाईदारपणे गाडी चालवत पंढरपूर गाठले. यावेळी, मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी ठाकरेही शेजारच्या सीटवर होत्या.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवून पंढरपूरला जाणे यात कौतुक काय?, स्वत: गाडी चालवल्यामुळे महाराष्ट्राला पैसे मिळाले, की महाराष्ट्रातून कोरोना गेला?, असा प्रश्न निलेश राणेंनी विचारला आहे.

मुंबई - आषाढी एकादशीनिमित्ती विठूरायाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात पार पडली. यावेळी चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. मुंबईतून पंढरपूरला मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत गेले. यानंतर तेथील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावाही घेतला. मात्र, यावरून आता भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणेपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्याच्या स्वत: गाडी चालविण्याचं काय कौतुक? असा प्रश्न विचारला आहे. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान पाऊस असताना, समोरची दृष्यमानता कमी असतानाही, मुख्यमंत्र्यांनी सफाईदारपणे गाडी चालवत पंढरपूर गाठले. यावेळी, मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी ठाकरेही शेजारच्या सीटवर होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ९ च्या सुमारास पंढरपुरात पोहोचले. मुख्यमंत्री विमानानं मुंबईतून सोलापूरला जाऊ शकत होते. मात्र सध्याचं हवामान आणि दृश्यमानता कमी असल्याने ते रस्ते मार्गे पंढरपूरकडे पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या या प्रवासानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवून पंढरपूरला जाणे यात कौतुक काय?, स्वत: गाडी चालवल्यामुळे महाराष्ट्राला पैसे मिळाले, की महाराष्ट्रातून कोरोना गेला?, असा प्रश्न निलेश राणेंनी विचारला आहे. तसेच, राज्यातील पूरपरिस्थिती, मुंबई तुंबलीय, दुर्घटना याचं डॅमेज कंट्रोल कसं होतंय, याची माहिती काढण्यासाठी तरी मुख्यमंत्र्यांनी मागच्या सीटवर बसायला हवं होतं. तुम्हाला रिझल्ट देण्यासाठी खुर्चीवर बसवलंय, गाडी चालविण्यासाठी नाही, अशी टीका राणेंनी केली. विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही कारण इतक्या सहजपणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही, असेही राणेंनी म्हटले. 

तर लोटांगण घातलं असतं

स्वतः ड्रायव्हिंग करत शनिवारी चेंबूरपर्यत गेले असते तर लोटांगण घातलं असतं, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. तसेच याआधी, मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..., असे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन टीका केली होती. 

चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना

मुंबईत पावसाच्या रौद्ररुपामुळे चेंबूर येथे मोठी दुर्घटना घडली. यासह उपनगर आणि जवळच्या पालघर, रायगड जिल्ह्यांनाही पावसाने झोपडले. मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. बहुतेक नागरिकांचा मृत्यू दरड आणि भिंत कोसळून झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले. यारून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनानिलेश राणे पंढरपूर