मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ६२ वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत आहेत. गावाखेड्यातील शिवसैनिक सोशल मीडियातून शुभेच्छा देत आहे. तर, राजकीय पक्षाचे नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून येतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तर, माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही शिवसेना पक्षप्रमुख म्हणत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला शिवसैनिकांसह सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर 'मातोश्री' निवासस्थानी येतात. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी 'मातोश्री'बाहेर रांगा लागतात. यातच आता शिवसैनिकांकडून रात्री १ वाजता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. त्यानंतर, शुभेच्छांचा ओघ सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशमध्ये शिवसेना पक्षप्रमुख हा शब्द जाणीवपूर्वक टाळला असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना शिवसेना पक्षप्रमुख हा उल्लेख टाळला. मात्र, बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री असे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे, शिंदे गटातील मतभिन्नता दिसून आली आहे.
रामदास कदम यांनी दिल्या खोचक शुभेच्छा
''मी उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन, कारण त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व ठेवलं असतं तर त्यांना मी निश्चितपणे शिवसेनेचे प्रमुख म्हटलं असतं. मात्र आज ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम पाहत नाहीत, तर ते शरद पवार यांच्या मांडीवर बसून त्यांच्या विचारांशी सहमत होऊन काम करताहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमाई, बाळासाहेबांच्या पाठीत खंजिर खुपसण्याचं काम, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी ही दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडून झाली आहे, अशी खरमरीत टीका रामदास कदम यांनी केली.
सामनाने जाहिराती नाकारल्या
दरवर्षी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी सामनात जाहिरात देतो. परंतु यावर्षी आमच्या जाहिराती घेऊ नये असं कर्मचाऱ्यांना वरून कळवण्यात आले होते. त्यामुळे यंदा आम्ही जाहिरात देत होतो परंतु ती सामनातून नाकारण्यात आली. उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला आदर, दरवर्षी आम्ही वाढदिवस साजरा करत असतो. प्रत्येक खासदाराला जाहिरात नाकारण्याचा अनुभव आला असेल अशी माहिती शिंदे गटातील शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी दिली.
फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको
कोरोना काळानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर मोठी सजावट करण्यात आली आहे. मातोश्रीचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर फुलांनी धनुष्यबाणाची प्रतिमा साकारण्यात आली आहे.