Uddhav Thackeray News: निवडणुकांना अवघे ४१ दिवस उरले आहेत. त्यामुळे कामाला लागा. चांगले काम करा. पुढील ४१ दिवसांत आचारसंहिता लागेल, त्यामुळे जोमाने काम करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ५ कलमी कार्यक्रम दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या कालावधी दरम्यान भगवा सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची आहे. विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी बैठका घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील ४ महिन्यात १५ दिवसांतून दोन दिवस विधानसभा क्षेत्रात संपर्कप्रमुखांनी स्वतः उपस्थितीत राहून आढावा घ्यावा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले.
उद्धव ठाकरेंनी दिलेला पाच कलमी कार्यक्रम काय?
सर्व विधानसभा संपर्क प्रमुखांनी मतदारसंघात दौरा करणे आवश्यक. सोबत संबंधित उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख असणे आवश्यक आहे. सदर मोहिमेत प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये बैठक आयोजित करणे आवश्यक आहे. बैठकीसाठी स्थानिक विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख (पुरुष-महिला), युवासेना शाखा युवा अधिकारी आदी पदाधिकारी अपेक्षित आहेत. विभागात कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांची यादी मोबाईल क्रमांकासहित जोडावी, असे उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. विधानसभा निवडणुका जवळ यायला लागल्या आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फसव्या घोषणा केल्या जात आहेत. 'लाडका मित्र' किंवा 'लाडका कॉन्ट्रॅक्टर' योजनेबद्दल बोलतो आहे. धारावीवासीयांचे पुनर्वसन कसे होणार आहे? अनेकांचे उद्योग-धंदे आहेत, ती लोक कुठे जाणार? याबाबत माहिती दिली पाहिजे. धारावीवासीयांना तिथल्या तिथे ५०० फुटाचे घर मिळालेच पाहिजे, त्यांच्या उद्योगधंद्याची सोय झाली पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. फक्त धारावीच नव्हे तर मुंबईतील ज्या-ज्या ठिकाणी पुनर्वसनाचे काम होणार आहे, त्याठिकाणी आम्ही मुंबईकराच्या पाठिशी आहोत. मुंबई अदानींच्या घशात टाकण्याचा डाव, धारावी उद्ध्वस्त करण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. अदानींना झेपत नसेल तर हे टेंडर रद्द करा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले.